Sunday, January 8, 2012

किम इज डेड; लॉंग लिव्ह द किम

(Published in daily Tarun Bharat (Nagpur) on 8th Jan. 2012)

उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते 'किम जोंग इल' यांच्या निधनाने सदैव अस्थिरतेच्या छायेत असलेल्या कोरियन द्विप समुहात अस्वस्थता पसरली आहे. किम जोंग इल हे डेमोक्रेटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया, म्हणजेच उत्तर कोरियाचे, संस्थापक किम इल सुंग यांचे सुपुत्र होते आणि आता त्याच्या निधनानंतर वर्कर्स पार्टी ऑफ कोरिया या सत्ताधारी पक्षाने इल यांचे तिसऱ्या क्रमांकाचे सुपुत्र किम जोंग उन यांचे नाव त्यांचे 'महान वारस' (Great Successor) म्हणून जाहीर केले आहे. उत्तर कोरियाने आपल्या 'हर्मिट किंग्डम' (Hermit Kingdom), म्हणजे बाह्य जगाशी संबंध ठेवण्याची अनिच्छा असलेला आत्ममग्न असा देश, या उपाधीशी सुसंगत पद्धतीनेच जोंग इल यांच्या निधनाची वार्ता जाहिर केली. कोरियन केंद्रीय वृत्त संस्था या सरकारी संस्थेने सोमवार, दिनांक १९ डिसेंबरला उत्तर कोरियातील २३ मिलियन नागरिकांना उद्देशून प्रसारित केलेल्या संदेशात सांगितले की शनिवार, दिनांक १७ डिसेंबर २०११ रोजी सकाळी 'प्रिय नेते' किम जोंग इल यांचे रेल्वे प्रवासादरम्यान हृदय-विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. किम जोंग इल यांना हवाई प्रवासाची भीती वाटत असल्याने ते नेहमीच रेल्वेने प्रवास करायचे. २ दिवस त्यांच्या मृत्यूबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. उत्तर कोरियातील प्रत्येक घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असणाऱ्या दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या गुप्तचरांनासुद्धा कुठलाही सुगावा लागला नाही की मित्र देश चीनला काही कळवण्यात आले नाही. उत्तर कोरियाच्या बाबतीत असे तोंडावर आपटण्याची वेळ अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या गुप्तचर यंत्रणेवर पहिल्यांदाच आलेली नाही. जोंग इल यांचे वडील किम इल सुंग यांच्या मृत्यूची बातमीही २२ तासांनी उत्तर कोरियाच्या सरकारी सुत्रांमार्फतच जगाला कळली होती. २००७ मध्ये उत्तर कोरियाने पूर्ण तांत्रिक मदत पुरवत सिरीयाचा अणु-प्रकल्प जवळ जवळ पूर्णत्वास आणला होता. यासाठी उत्तर कोरियन अधिकारी वारंवार सिरीयाला भेटीही देत होते. मात्र हे सगळ्यात आधी लक्षात आले ते इस्राएलच्या. अमेरिका आणि दक्षिण कोरियाला याची काहीही कल्पना नव्हती. इस्रायलने सिरियातील प्रकल्प हल्ला चढवून नष्ट करण्यात यावा असा अमेरिकेकडे आग्रह धरला. मात्र अमेरिकेने असमर्थता व्यक्त केल्यावर इस्रायलनेच हवाई हल्ला करत सिरीयन अणु-प्रकल्प क्षणात जमीनदोस्त केला.

किम जोंग इल यांच्या मृत्यनंतर २ दिवस उत्तर कोरियातील उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांनी पुढील वाटचालीची रूपरेषा निश्चित केली आणि जोंग इल यांनी मनोनीत केल्याप्रमाणे त्यांचे २८ वर्षीय पुत्र जोंग उन यांना उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. 'जोंग उन यांच्या नेतृत्वात या दु:खद प्रसंगाचा धैर्याने आणि मनोबलाने प्रतिकार करत कठीण मार्गातून वाट काढता येईल' असा आशावादही राष्ट्राला दिलेल्या संदेशात वक्त करण्यात आला. सरकारी वृत्त संस्था हे सांगायला विसरली नाही की 'देशाच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन करण्याच्या कामात किम जोंग इल यांनी स्वत:ला इतके झोकून दिले होते की त्यामुळे मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शाररीक ताण पडल्याने त्यांना हृदय-विकाराचा झटका आला'. किम इल सुंग प्रमाणेच किम जोंग इल यांचे पार्थिव रासायनिक प्रक्रियाकरून सरकारी इतमामात नेहमीकरता सांभाळून ठेवण्यात येणार आहे. उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी २९ डिसेंबरला रोजी झालेल्या किम जोंग इल यांच्या अंतिम निरोप समारंभात कोणत्याही देशाच्या शिष्टमंडळाला आमंत्रित केले नाही की कोणत्याही देशाने आपले शिष्टमंडळ पाठवण्याचा आग्रह केला नाही. दक्षिण कोरियातून २ खाजगी शिष्टमंडळे मात्र या दरम्यान प्योंगयांगला जाऊन आलीत आणि त्यांनी उत्तर कोरियाचे नवे प्रमुख जोंग उन यांच्याकडे जोंग इल यांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले. यातील पहिले शिष्टमंडळ होते ते दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष किम दे-जुंग यांच्या पत्नीच्या नेतृत्वातील. किम दे-जुंग यांनी जोंग इल यांच्या सोबत २ शिखर परिषद केल्या होत्या आणि दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या मृत्यूनंतर उत्तर कोरियाने देखील आपले शिष्टमंडळ सेउल ला पाठवून शोक-संवेदना व्यक्त केली होती. दुसरे शिष्ट-मंडळ होते ह्युंडाई उद्योग समूहाच्या प्रमुख ह्युंग जीयोंग-इउन यांच्या नेतृत्वातील. या उद्योगसमुहाचे उत्तर कोरियाशी व्यापारिक संबंध आहेत आणि ह्युंग यांच्या पतीच्या मृत्यूनंतर देखील उत्तर कोरियाने अधिकृत शिष्टमंडळ दक्षिण कोरियाला पाठविले होते. जोंग इल यांच्या अखेरच्या निरोप समारंभातच जोंग उन आता उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते आहेत असे जाहीर करण्यात आले आणि दुसऱ्याच दिवशी उत्तर कोरियन सैन्याचे सरसेनापतीपद त्यांना बहाल करण्यात आले.

जोंग इल यांच्या निधनावर जागतिक समूहाची प्रतिक्रियासुद्धा, अपवाद चीनचा, 'सावधानतेची आणि सतर्कतेची' होती; न कसली श्रद्धांजली न शोक ना २ चांगले शब्द जोंग इल यांना वाहण्यात आले. दक्षिण कोरियाने आपल्या सेनेला अति-सतर्कतेचा इशारा दिला आणि नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली ल्युंग-बाक यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत अस्थिरता निर्माण होऊ नये ही अमेरिकेची प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले. अमेरिकेचे २८,५०० जवान दक्षिण कोरियाच्या रक्षणासाठी तैनात आहेत. जपान, ब्रिटेन आणि जर्मनीने जोंग इल यांच्या निधनाने उत्तर कोरियात अंतर्गत कलह माजल्यास धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी प्रतिक्रिया दिली. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की-मून यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देणेच पसंद केले. थोडक्यात उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग इल यांच्याबद्दल कुठलाही सन्मान आणि आत्मीयता जागतिक समूहाच्या मनात नाही, तसे असण्याचे कारणही नाही, आणि तरीही त्यांच्या निधनाने सर्वत्र अस्वस्थता पसरली आहे. त्याला कारणही तसेच आहे. जर जोंग इल यांचे उत्तराधिकारी अनुनभवी जोंग उन यांना सत्तेत लवकर जम बसवता आला नाही तर ते दक्षिण कोरियाची खुरापत काढून युद्धरत स्थिती निर्माण करून देशांतर्गत स्वत:चे स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करतील या शंकेने हे सगळे देश त्रस्त झाले आहेत.

चीनने मात्र उत्तर कोरियाशी असलेली मैत्री निभवत किम जोंग इल यांच्या निधनाने धक्का बसला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. जोंग इल हे चीनी जनतेचे मित्र होते असेही चीनने आपल्या अधिकृत संदेशात म्हटले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष हु जिंतावो यांनी बीजिंग स्थित उत्तर कोरियाच्या दुतावासात जाऊन जोंग इल यांना श्रद्धांजलीही वाहिली आणि त्यांचे उत्तराधिकारी किम जोंग उन यांना पूर्ण सहकार्य देण्याचा मनोदय व्यक्त केला. अमेरिका आपली सर्व बाजूंनी घेरेबंदी करत असल्याची चीनची भावना आहे आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी चीनला उत्तर कोरियाची साथ असणे गरजेचेही आहे. शिवाय अमेरिका तैवानला आर्थिक मदत पुरवते याचा राग चीनला आधीपासून आहेच. याचा बदला घेण्याच्या भूमिकेतूनही चीन उत्तर कोरियाला मदत पुरवत असतो. असे असले तरी चीनला सुद्धा कुठल्याही कारणाने कोरियन द्वीप समूहात अस्थिरता नको आहे. उत्तर कोरियाशी चीनचे घनिष्ट संबंध असले तरी त्याच्या कारवायांवर चीनचे नियंत्रण नाही हे आता स्पष्ट झाले आहे. अलीकडेच उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाच्या ताब्यातील एका बेटावर बमबारी करत ४ जणांना ठार केले होते. त्या पुर्वी दक्षिण कोरियाची युद्धनौका बुडून त्याचे ४६ जवान मारले गेले होते आणि उत्तर कोरियाने युद्धनौका बुडवली असा आरोप करण्यात आला होता. या दोन्ही घटनांनी चीन अस्वस्थ होता.

किम जोंग इल यांच्याबाबत सर्व देशांच्या अविश्वासात भर पडली ती मागील ५ वर्षात उत्तर कोरिया अण्वस्त्रधारी झाल्याने. उत्तर कोरियाने १९९४ मधेच अण्वस्त्र प्रसारबंदी करार आपणावर या पुढे बंधनकारक असणार नाही असे जाहीर केले होते आणि तेव्हापासूनच उत्तर कोरियाने अण्वस्त्र चाचणी करू नये म्हणून आंतरराष्ट्रीय दबाव वाढला होता. त्याच वर्षी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांनी मध्यस्थी करत जोंग इल यांचे पिता आणि उत्तर कोरियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष किम इल सुंग यांची मनधरणी करत अण्वस्त्र कार्यक्रम स्थगित करण्यासाठी त्यांना राजी केले होते. मात्र महिनाभरातच इल सुंग यांचे निधन झाले आणि जोंग इल यांच्या हाती सत्ता आली. त्यांनी आपल्याच वडिलांनी मृत्यूपुर्वी केलेल्या महत्वाच्या कराराला हरताळ फासत अण्वस्त्रसज्ज होण्याचा कार्यक्रम राबवण्यास परत सुरुवात केली. याच काळात, म्हणजे १९९० च्या दशकात पाकिस्तानने अवैध मार्गाने मदत पुरवीत उत्तर कोरियाची अण्वस्त्र बनवण्याबाबतची सज्जता वाढवली होती. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ आणि माजी पंतप्रधान शौकत अझीझ यांनी २००५ मध्ये गौप्य स्फोट केला होता की पाकिस्तानचे ए के खान यांनी उत्तर कोरियाला अण्वस्त्र बनवण्यासंबंधी तांत्रिक माहिती पुरवली आहे.

दरम्यानच्या काळात म्हणजे सन २००० मध्ये दक्षिण कोरियाने 'सनशाईन' धोरणाचा पुरस्कार करत उत्तर कोरियाशी सलगी वाढवण्याचे धोरण पुढे केले होते. या अंतर्गत उत्तर कोरियाला पुरेशी आर्थिक मदत पुरवून त्याच्या नागरिकांच्या मनात दक्षिण कोरियाबद्दल आपुलकी निर्माण करणे आणि दोन्ही देशांतील नागरिकांचा संपर्क वाढवून एकीकरणाची भूमिका तयार करणे महत्वाचे मानले होते. या धोरणाच्या परिणामी कोरियन युद्धानंतर पहिल्यांदाच दोन्ही देशाच्या प्रमुखांची शिखर परिषद झाली. किम जोंग इल यांनी स्वत: प्योंगयांग इथे या शिखर परिषदेचे यजमानत्व केले. दक्षिण कोरियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष किम दे-जुंग यांना 'सनशाईन' धोरण राबवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सन २००० चे नोबेल शांतता पारितोषिकही मिळाले होते . मात्र अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष बुश यांनी या धोरणाला पाठिंबा न दिल्याने 'सनशाईन' नीती बारगळली. पुढे सन २००१ नंतर बुश यांनी किम जोंग इल यांचा 'पिग्मी' असा उल्लेख करत इराक-इराण-उत्तर कोरिया ही ३ दुष्ट राष्ट्रांची धुरी (Axis of Evil) आहे असे म्हटले होते. यानंतर अमेरिकेच्या अफगाणिस्तान आणि इराक मधील लष्करी कारवायांच्या व्यस्ततेचा फायदा उठवत उत्तर कोरियाने २००६ मध्ये अणु चाचणी केली आणि अमेरिकाच नाही तर मित्र देश असलेल्या चीनच्या तोंडचेही पाणी पळवले. उत्तर कोरियाने अण्वस्त्र मार्ग सोडून द्यावा म्हणून सुरु करण्यात आलेल्या अमेरिका, चीन, रशिया, जपान आणि दोन्ही कोरिया अश्या ६-पक्षीय चर्चेमध्ये सुद्धा जोंग इल यांनी कुणालाच दाद दिली नाही आणि २००९ मध्ये चर्चेचा मार्ग सोडून दुसरी अण्वस्त्र चाचणीही केली. सध्या उत्तर कोरियाकडे कमीत कमी ६ ते ८ अण्वस्त्र असतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अण्वस्त्रे बनवण्याचा कार्यक्रम सोडून दिल्यास किव्हा तहकूब केल्यास उत्तर कोरियाची गतही मुअम्मार गद्दाफी यांच्या लिबिया प्रमाणे अथवा सद्दाम हुसेनच्या इराक प्रमाणे होणार नाही याची काय खात्री आहे अशी भूमिका किम जोंग इल यांच्या सरकारने उघडपणे घेतली. उत्तर कोरियाची किम जोंग इल यांना किती काळजी होती हे सांगणे कठीण आहे मात्र आपली गत सद्दाम किव्हा गद्दाफी प्रमाणे होऊ नये असे त्यांना नक्कीच वाटत असणार. मागील काही महिन्यांमध्ये उत्तर कोरियाने पुन्हा चर्चेची तयारी दाखवली होती. अन्नधान्याच्या कमतरतेवर मात करण्यासाठी परकीय मदत स्वीकारण्याशिवाय उत्तर कोरियाकडे पर्यायच उरला नसल्याने त्याने स्वत: पुढाकार घेतला होता आणि अमेरिकी प्रशासनही धान्याची सनद पुरवण्याला राजी होण्याची चिन्हे होती. जोंग इल यांना चर्चेला बसवणे ही ओबामा प्रशासनासाठी एक मोठी उपलब्धी ठरणार होती. आता मात्र अण्वस्त्र नष्ट करण्याच्या अटीवर धान्य पुरवठा ही योजनाच अनिश्चित काळासाठी थंड बस्त्यात गेली आहे.

जोंग इल यांनी अधिकृतपणे 'लष्कर प्रथम' हे धोरण अवलंबित १.२ मिलियन संख्येचे सशक्त सैन्य बळ तयार केले. दक्षिण कोरियाचे सैन्य बळ याच्या अर्धे म्हणजे ६.५ लाख इतकेच आहे. पण युद्ध झालेच तर अमेरिकेचे ६५०००० अतिरिक्त सैन्य आणि १६० युद्ध नौका तसेच २००० वायू दलाची विमाने दक्षिण कोरियाच्या मदतीला धावून जातील. उत्तर कोरियाच्या अंदाजे १३६०० तोफा आणि अत्याधुनिक रणगाडे हल्ला चढविण्यासाठी सदैव सज्जच असतात. या शिवाय जोंग इल यांनी २ लाखाचे सशस्त्र विशेष कारवाई दल तयार करून त्याची युद्धबंदी रेषेनजीक पेरणी केली आहे. आज उत्तर आणि दक्षिण कोरियातील युद्धबंदी रेषा ही जगातील सर्वाधिक तणावाची आणि सर्वाधिक सशस्त्र अशी जागा आहे. उत्तर कोरियाने पहिला हल्ला चढविल्यास दक्षिण कोरियाची अपरिमित हानी होऊ शकते आणि थोड्याच अवधीत युद्धबंदी रेषेपासून अवघ्या ३० मैलावर असलेले सेउल हे राजधानीचे शहर उत्तर कोरियाच्या ताब्यात जाऊ शकते असा खुद्द अमेरिका आणि दक्षिण कोरियाचा कयास आहे. १९५० मध्ये सुद्धा उत्तर कोरियाने युद्धाच्या सुरुवातीलाच जवळपास संपूर्ण दक्षिण भाग पादाक्रांत केला होता. या वेळी तैवानमधील अमेरिकीधार्जिण्या सरकारला सरकारला डावलून बीजिंगमधील माओ-त्से-तुंग यांच्या साम्यवादी सरकारला चीनचे कायदेशीर सरकार म्हणून मान्यता देत संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे सभासदत्व देण्याच्या मुद्द्यावरून सोविएत संघाने सुरक्षा परिषदेचा बहिष्कार केला होता. अनुपस्थितीमुळे सोविएत संघ व्हेटो वापरूच शकणार नाही याचा फायदा उठवत अमेरिकेने सुरक्षा परिषदेच्या ठरावाद्वारे संयुक्त राष्ट्राच्या झेंड्याखालीच आपले आणि मित्र राष्ट्रांचे सैन्य उत्तर कोरियाविरुद्ध मैदानात उतरवले. त्यांनी उत्तरेचे आक्रमण तर रोखलेच पण त्यानंतर उत्तर भाग ताब्यात घेत त्यांचे सैन्य चीनच्या सीमारेषेवर पोहोचले. यानंतर चीनने आपली सैन्यशक्ती पणास लावत दक्षिण कोरिया आणि मित्र देशांना परत मागे लोटले आणि १९५३ मध्ये दोन्ही बाजूंमध्ये युद्धबंदी होत ३ वर्षांपूर्वी ज्याच्या ताब्यात जो भाग होता तीच परिस्थिती कायम राहिली. युद्धबंदीसाठी २ वर्षे वाटाघाटी सुरु होत्या. अखेर भारताने युद्धबंदींच्या देवाणघेवाणीच्या मुद्द्यांवर दिलेला तोडगा संयुक्त राष्ट्राने मान्य केल्यानंतर युद्धबंदी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दक्षिण कोरियाचे सरकार कराराचा अधिकृतपणे भाग झालेच नाही कारण त्यांच्या बाजूने संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली तर दुसऱ्या बाजूने उत्तर कोरिया आणि चीनच्या प्रतिनिधींनी स्वाक्षऱ्या केल्या. १९५३ मध्ये शांतता करार न होता केवळ युद्धबंदीच झाल्याने तांत्रिक दृष्ट्या दोन्ही देश नेहमीच युद्धासाठी तयार असतात.

आज उत्तर कोरिया सर्वाधिक सैनिक असलेले जगातील ५ व्या क्रमांकाचे राष्ट्र आहे. साहजिकच याचा भार सर्वसामान्य नागरिकांवर पडतो आहे. संपूर्ण उत्तर कोरियात धान्याची प्रचंड कमतरता आहे. येत्या वर्षी अंदाजे १० मिलियन टन धान्याची आवश्यकता असतांना उत्तर कोरियाकडे ४.७४ मिलियन टनच्या आसपासच धान्याची उपलब्धता आहे असे चीनच्या पीपल्स डेली या वर्तमानपत्राने म्हटले आहे. देशाची राजधानी प्योंगयांग वगळता इतर ठिकाणी संसाधनांची भारी कमतरता आहे. मागे नासाच्या एका उपग्रहाने रात्री काढलेल्या एका छायाचित्रानुसार राजधानी वगळता बाकी कुठेही रात्री वीज उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले होते. याच छायाचित्रात चीन, जपान आणि दक्षिण कोरियातील विजेचा झगमगाट स्पष्ट दिसत होता. अशा खडतर परिस्थितीला वैतागून देशातून पळ काढणाऱ्या उत्तर कोरियाच्या नागरिकांच्या कथा बी बी सी आणि सी एन एन तत्परतेने जगापुढे मांडत असतात. या उलट उत्तर कोरियाच्या सरकारी आणि एकमेव दूरचित्रवाणीवर मात्र किम जोंग इल यांच्या निधनाचा शोक व्यक्त करणारे नागरिकांचे लोंढे सतत दाखवण्यात येत आहेत. शिक्षित आणि 'बुद्धिवंतांच्या' शोक व्यक्त करणाऱ्या श्रद्धांजलींचे प्रसारण होत आहे. जोंग इल यांनी नाही म्हटले तरी आपला करिष्मा उत्तर कोरियातील जनतेवर निर्माण केलाच होता. त्यांच्या धोरणांना आणि सत्तेला कधीही संघटित स्वरुपात विरोध झाला नाही की सरकार विरोधी प्रदर्शनांच्या काही घटना घडल्याचे वृत्त कधी बाहेर आले नाही. लष्करी परेडसला जनतेची प्रचंड गर्दी होत असल्याचे चित्रच सरकारी वृत्त संस्थांनी बाहेरच्या जगाला दिले. जोंग इल यांनी १० लाखांच्या सभांना संबोधित केल्याची चित्रेही प्रसारित करण्यात आलीत. देशातून पळ काढलेल्या काही नागरिकांनी सुद्धा जोंग इल प्रभावी वक्ता आणि करिष्माई वलयाचे व्यक्तिमत्व असल्याचे सांगितले आहे. जेष्ठ पत्रकार निकोलस क्रिस्टोफ यांनी अलीकडेच एका लेखात सरकारी यंत्रणेच्या प्रपोगंडा प्रणालीबद्दल लिहितांना म्हटले आहे की त्यांना एकदा उत्तर कोरियाच्या ग्रामीण भागात जाण्याची परवानगी मिळाली आणि तिथे त्यांनी २ शाळकरी मुलींना काही प्रश्न विचारले. त्यावर दोघींनीही थक्क करणारी आणि अगदी सारखी अशी सरकार धार्जिणी उत्तरे दिलीत. याशिवाय त्यांनी लिहिले आहे की राजधानीतील प्रत्येक घरात रेडियो लावलेला असतो जो बंद करता येत नाही आणि त्यावर दिवसभर किम घराण्याचे गुणगान सुरु असते. अलीकडच्या काळात दक्षिण कोरियात भारताच्या राजदूत म्हणून कार्यरत असलेले श्री स्कंद त्याल यांनी म्हटले आहे की 'उत्तर कोरियातील लोकांसाठी जोंग इल फक्त नेतेच नव्हते तर समाज, पार्टी आणि देश यांची एकत्रित प्रतिमा होते. त्यांच्या सुरक्षेची आणि जीविताची हमी होते. जोंग इल यांचे निधन झाले असले तरी त्यांचे पुत्र जोंग उन यांच्या सुरक्षित हाती त्यांचे भवितव्य आहे यात जनता समाधान सुद्धा मानत आहे'. किम घराण्याची अशी प्रतिमा तयार होण्याला त्यांची तालीम आणि वारसा या दोन्ही गोष्टी जबाबदार असू शकतात.

जोंग इल यांना वारसा लाभला तो त्यांचे पिता आणि उत्तर कोरियाचे संस्थापक किम इल सुंग यांचा. १९१२ साली जन्मलेल्या किम इल सुंग यांनी दुसऱ्या महायुद्धात जपानी आक्रमणाचा मुकाबला करतांना मोठ्या प्रमाणात जनतेचा विश्वास जिंकला होता. चीनी आणि कोरियन शरणार्थ्यांचा समावेश असलेल्या सोविएत सैन्याच्या ८८व्या ब्रिगेडमधील पहिल्या बटालियनचे नेतृत्व सुंग यांच्याकडे होते. दुसऱ्या महायुद्धानंतर सोविएत सेनेच्या प्रभावाखालील उत्तर कोरियाची कमान साहजिकच त्यांच्याकडेच आली. या नंतरच्या भीषण कोरियन युद्धात त्यांनीच उत्तर कोरियाचे नेतृत्व केले. १९५० ते ६० च्या दशकात जोंग सुंग यांनी उत्तर कोरियाचा विकास दरही दक्षिण कोरियापेक्षा जास्त ठेवण्यात यश मिळवले होते. त्यांच्या कारकिर्दीत झालेल्या जमीन सुधारणांमुळे मर्यादित काळाकरता हे शक्य झाले होते. शिवाय सोविएत मदतीचा ओघही होताच. या सर्व गोष्टींमुळे उत्तर कोरियाच्या जनतेत त्यांना मोठ्या काळाकरता मानाचे स्थान होते यात वादच नाही. मात्र एकदा त्यांचे शासन स्थिर झाल्यावर किम इल सुंग यांनी समाजवादाशी फारकत घेण्यास सुरुवात केली. १९५५ मध्ये त्यांनी 'जुचे' म्हणजेच आत्म-निर्भरता हे राष्ट्रीय धोरण म्हणून जाहीर केले. त्यांनी केवळ आर्थिकच नाही तर वैचारिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही आत्म-निर्भर होण्यावर भर दिला आणि उत्तर कोरियाचे बाहेरच्या जगाशी संबंध पूर्ण विकसित होण्याआधीच कमी होऊ लागले. त्यांचे वारस किम जोंग इल यांनी तर १९९६ मध्ये स्वत:चा आत्म-निर्भरतेचा जाहीरनामा प्रकाशित करून मार्क्सवाद-लेनिनवादाशी अधिकृतपणे फारकत घेतली आणि २००९ मध्ये लिहिण्यात आलेल्या नव्या राज्यघटनेतून समाजवादाचा उल्लेखही गाळून टाकला. पिता-पुत्रांनी लोकशाही मार्गाचा स्वीकार करत जन-समर्थनाने आपले स्थान बळकट करणे तर दूरच पण आपल्या पक्षाच्या नियमित बैठका/परिषदा घेणे ही बंद केले. अर्थात दक्षिण कोरियातसुद्धा सन १९८७ पर्यंत लोकशाही नव्हतीच आणि मोठ्या प्रमाणात मानवी हक्कांचे उल्लंघन होत होते. मात्र १९७० च्या दशकात दक्षिण कोरियाने आर्थिक भरारी घेतली आणि १९८८ मध्ये सेउलने ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजनही केले.

उत्तर कोरियाची आर्थिक वाढ खुंटल्याने किम पिता-पुत्रांनी जनतेचे समर्थन कायम ठेवण्यासाठी आपल्या घराण्यासंबंधित अनेक (दंत)कथा रुजवल्या. त्यात महत्वाची होती ती १९व्या शतकात कोरियाशी व्यापार करण्याच्या नावाखाली आलेल्या अमेरिकी युद्ध नौकांचा किम परिवाराने केलेला मुकाबला. याचप्रमाणे सन २००२ मध्ये प्रकाशित किम जोंग इल यांच्या अधिकृत चरित्रात दावा करण्यात आला की त्यांचा जन्म कोरियन लोकांसाठी पवित्र मानण्यात येणाऱ्या पेकाटू पर्वतावर १९४२ साली झाला आणि त्या वेळी आकाशात २ इंद्र धनुष्य आणि एक नवा तेजस्वी तर झळाळला. मात्र सोविएत संघाच्या अधिकृत नोंदींमध्ये म्हटले आहे की किम इल सुंग यांना १९४१ साली सायबेरियाच्या एका मासेमारी करणाऱ्या खेड्यात पुत्र प्राप्ती झाली आणि त्याच्या नावाची नोंद युरी इरसेनोवीच किम अशी करण्यात आली. जोंग इल यांच्या मृत्युनंतर आता जोंग उन यांच्याबद्दल ही कोरियन वृत्त संस्थेने असेच म्हटले आहे की त्यांचा जन्म पवित्र पेकाटू पर्वतावर झाला आहे.

किम इल सुंग यांनी १९७४ साली सोयीस्करपणे आपल्या ३३ वर्षीय मुलाला म्हणजेच किम जोंग इल यांना पोलिट ब्युरोत स्थान दिले आणि इल आपला उत्तराधिकारी असेल असे सूचित केले. असे म्हणतात की १९६४ साली प्योंगयांग विद्यापीठातून पदवी मिळवल्यानंतर जोंग इल यांनी १० वर्षे मौज-मजा करण्यातच घालवली. १९७४ मध्ये पोलिट ब्युरोत स्थान मिळाल्यानंतर त्यांनी गुप्तचर विभागाच्या कामाची जबाबदारी स्वीकारली आणि २० वर्षे फारसे प्रसिद्धीच्या झोकात न येता उच्च पदस्थांमध्ये आपले स्थान मजबूत केले. जगाने १९९२ मध्ये पहिल्यांदा किम जोंग इल यांचा आवाज ऐकला ज्या वेळी त्यांनी लष्करी कवायतीस सलाम ठोकतांना 'उत्तर कोरियाच्या क्रांतिकारक सैन्याचा विजय असो' अशी घोषणा केली होती. या काळातील अनेक कुख्यात घटनांशी जोंग इल यांचे नाव जोडले गेले आहे. १९८३ मध्ये त्यांनी ब्रह्मदेशातील दक्षिण कोरियाच्या दुतावासात बॉम्ब स्फोट घडवून आणल्याचा तसेच १९८७ मध्ये दक्षिण कोरियाचे जेट विमान बॉम्ब पेरून उडवून लावण्याचा त्यांनी आदेश दिल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या घटनांमध्ये अनुक्रमे दक्षिण कोरियाचे १७ अधिकारी आणि ११५ प्रवासी मारले गेले होते. त्यांनी श्रीलंकेतील लिट्टे सारख्या अतिरेकी संघटनांना शस्त्र-पुरवठा केल्याचाही अनेकांना संशय होता. दक्षिण कोरियाच्या एका चित्रपट दिग्दर्शकाने असाही धक्कादायक आरोप केला की ७० च्या दशकाच्या अखेरीस जोंग इल यांनी त्याचे आणि त्याच्या अभिनेत्री पत्नीचे अपहरण केले आणि सिनेमे बनवण्यासाठी त्यांना सुमारे एक दशक उत्तर कोरियात ठेवले. पुढे ऑस्ट्रियाला गेले असतांना त्यांनी काही हस्तकांच्या मदतीने पळ काढला. पाश्चात्य संस्कृतीपासून उत्तर कोरियाला दूर ठेवण्यावर विश्वास असणाऱ्या किम घराण्याच्या या वारसदाराला हॉलीवूडचे प्रचंड वेड होते. संपूर्ण बॉन्डपटांसह त्यांच्याकडे सुमारे २०००० परदेशी सिनेमांचा संग्रह होता आणि स्वत: त्यांनी उत्तर कोरियाच्या इतिहासावर १०० भागांची मालिका बनवली होती असे सांगण्यात येते.

पहिले किम, म्हणजे किम इल सुंग, यांनी ४६ वर्षे अनभिषिक्त राज्य केले होते. त्यांच्या हाताखाली दुसरे किम, म्हणजेच किम जोंग इल, यांची २० वर्षे तालीम झाली. १९९४ साली किम इल सुंग यांच्या निधनानंतर सर्व सत्ता-सूत्रे जोंग इल यांच्या हाती आली. त्यांनी मात्र ३ वर्षे सुतक पाळत अधिकृतपणे कोणतेही पद स्वीकारले नाही. १९९७ मध्ये ते पक्षाचे सरचिटणीस आणि राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे अध्यक्ष झालेत. तसेच उत्तर कोरियाच्या लष्कराचे सर्वोच्च कमांडरपद त्यांनी स्वीकारले. या नंतर ते 'द जनरल' आणि 'डियर लिडर' म्हणून ओळखले जाऊ लागले. मात्र वडिलांच्या सन्मानार्थ त्यांनी राष्ट्राध्यक्षपद ४ वर्षे रिकामेच ठेवले आणि १९९८ मध्ये घटना दुरुस्तीद्वारे ते पदच संपुष्टात आणले. पुढे २००९ मध्ये त्यांनी उत्तर कोरियाच्या राज्यघटनेत स्वत:ची नोंद 'सुप्रिम लिडर' अशी करवून घेतली.

किम जोंग इल यांनी राज्य करतांना ज्या ऐशोरामी जीवनाचा आनंद लुटला त्याच्या कथा थक्क करणाऱ्या आहेत. त्यांनी प्योंगयांग मध्ये स्वत:च्या परिवारासाठी आलिशान स्वप्नवत प्रसाद बांधला. दक्षिण कोरियाने उपग्रह छायाचित्रांचा हवाला देत दावा केला आहे की भूमिगत समुद्र दर्शनाची सोय असलेला आणि सुसज्ज स्पा रेसोर्ट तसेच खाजगी रेल्वेची सोय असलेल्या या महालाच्या बांधणीसाठी अंदाजे ८.२ बिलियन डॉलर्स खर्च करण्यात आला. जोंग इल रेल्वेने प्रवास करत असतांना हवाई मार्गाने ताजे मासे त्यांच्या भोजनासाठी पोचवले जायचे. एकदा तर त्यांची मेजवानी पूर्ण ४ दिवस चालली होती आणि अशा अनेक मेजवान्या त्यांच्या महालात झडत होत्या. परदेशातील वेगवेगळे पदार्थ बनवणे शिकण्यासाठी मोठी रक्कम खर्च केली जायची. त्यांच्या दालनात अंदाजे १०००० उच्च प्रतीच्या मदिरा उपलब्ध होत्या. सन २००८ मध्ये जोंग इल यांना हृदय विकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या फ्रेंच डॉक्टरांनी एका मुलाखतीत सांगितले की जोंग इल त्यांचाशी वेगवेगळ्या फ्रेंच वाईन मधील फरकांवर चर्चा करायचे. जोंग इल यांचे फ्रेंच भाषेवर प्रभुत्व होते हे सुद्धा या डॉक्टरांनी सांगितले. कोरियन डॉक्टर्स जोंग इल यांच्यावर उपचार करतांना खुप भाउक होऊन चुकीचाही निर्णय घेऊ शकतात या भीतीने उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी सरळ फ्रांसहून डॉक्टरांची चमू प्योंगयांगला आणली होती.

हॉलीवूड मधील अनेक सिनेमांचे खलनायक जोंग इल यांच्या या प्रतिमेवर आधारित आहेत. मात्र जोंग इल यांच्याशी वाटाघाटी केलेल्या अनेक राजनैतिकांचे म्हणणे आहे की जोंग इल मूर्ख अथवा बावळट अजिबात नव्हते. वाटाघाटीच्या विषयांची त्यांना नीट कल्पना असायची आणि आपले म्हणणे ते मुद्देसूदपणे मांडायचे. अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री मैन्डेलीन अलब्राईट यांनी त्यांचे वर्णन 'हुशार आणि माहिती असणारा' असे केले आहे. या दुसऱ्या किम ने, म्हणजेच किम जोंग इल यांनी, वयाच्या ६९ वर्षापर्यंत आणि एकूण १७ वर्षे शासन केले. सोविएत संघाच्या पतनानंतर उत्तर कोरियाची राज्यव्यवस्थाही कोसळेल अशा अनेकांच्या आशावादावर त्यांनी पाणी फेरले आणि अनेक बिकट परिस्थितींना ते पुरून उरले. अर्थात त्यांच्या कारकिर्दीत आम कोरियन जनतेने खास काहीच कमावले नाही. लष्करी यंत्रणा मात्र फोफावली आणि काही प्रमाणात समृध्दही झाली. मात्र अनेक निरीक्षकांच्या मते जोंग इल यांच्या कारकिर्दीत उत्तर कोरियात एक समांतर अर्थव्यवस्थाही उभी राहिली ज्याचा एका छोट्या वर्गाला आर्थिक सुबत्ता मिळवण्यात फायदा झाला. या वर्गाने जोंग इल यांच्या लष्करशाहीला विरोध न करता खाजगी व्यापाराच्या माध्यमातून आपले आर्थिक हितसंबंध मजबूत केलेत. यालू नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर म्हणजेच चीनमध्ये होत असलेल्या आर्थिक भरभराटीची मलाई या छोट्या व्यापारी वर्गाने मिळवण्यास सुरुवात केली. अनेक कोरियन मजुरांनी चीनमध्ये येन केन प्रवेश मिळवीत तिथल्या विकसित होत असलेल्या उद्योग धंद्यांमध्ये रोजगारही मिळवला आणि बचत घरी पोचवण्यास प्रारंभ केला. पैट्रिक चेवोनेक नावाच्या एका अमेरिकी पत्रकाराला अलीकडेच उत्तर कोरियाच्या दूरवरच्या आणि सहसा परवानगी मिळणे कठीण असलेल्या प्रदेशाचा दौरा करण्याची संधी मिळाली. त्याने म्हटले आहे की 'सगळ्यात विस्मयकारक होते रस्त्यांवरील लक्ष वेधून घेतील अशा बी एम डब्लू आणि सेडान या परकीय गाड्यांची रेलचेल. याचा अर्थ कुणाकडे तरी पैसा आहे आणि तो खर्च होतो आहे.' या पैसा खुळखुळनाऱ्या वर्गाच्या प्रगतीशी राज्यकर्त्या जमातीचा आणि त्यांच्या धोरणांचा संबंध नाही; पण महत्वाचे आहे ते जोंग इल या कणखर समजल्या जाणाऱ्या शासकाच्या कारकिर्दीत प्रशासनाची पकड ढिली झाली आणि शासकीय धोरणावर अवलंबून नसलेला उद्दमी वर्ग तयार झाला. आज चीनला लागून असलेल्या उत्तर कोरियन प्रदेशात चीनी बनावटीचे व्ही सी डी प्लेयर्स इतर इलेक्ट्रोनिक्स उपकरणे आणि पाश्चात्य सिनेमांच्या डी व्ही डी घर लक्षवेधी प्रमाणात आढळतात असे उल्लेख काही अभ्यासकांनी आणि पत्रकारांनी या भागांना भेटी दिल्यानंतर केले आहेत. या बदलत्या परिस्थितीची जाणीव जोंग इल यांना कदाचित होती आणि त्यामुळेच त्यांनी आपल्या शेवटच्या चीन दौऱ्यात आपल्या वारसदाराला जोंग उन ला सोबत नेले होते. उत्तर कोरियाने चीन प्रमाणे खुल्या व्यापाराचे आणि खाजगी गुंतवणुकीचे धोरण स्वीकारावे असा चीनच्या राज्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी जोंग इल हे स्वत: आपल्या पुत्राबरोबर आणि उत्तर कोरियाच्या इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह चीनच्या औद्योगिक क्षेत्रातून फिरलेत. आता त्यांच्या निधनाने उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेत जान फुंकण्यासाठी खाजगी गुंतवणुकीचे मार्गही लगेच उघडले जाण्याची शक्यता मावळली आहे.

जोंग इल यांचा उत्तराधिकारी किम जोंग उन वयानेच लहान नसून त्याचा अनुभवही अगदीच खिजा आहे. २००८ साली जोंग इल यांना हृदय विकाराचा पहिला झटका आल्यानंतर त्यांनी जोंग उन ला राज्य सोपवण्याची तयारी सुरु केली. स्वित्झरलैंडच्या एका विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या जोंग उन ला सन २०१० मध्ये पहिल्यांदा शासकीय यंत्रणेत स्थान देण्यात आले. त्याला सरळ ४-तारांकित जनरल आणि पक्षाच्या केंद्रीय लष्करी समितीचे उपाध्यक्ष करण्यात आले. जोंग उन चा अनुनुभव लक्षात घेता सत्तेची सूत्रे जोंग इल ची पत्नी, बहिण आणि साळा या त्रिमूर्तींच्या हाती जाण्याची शक्यता आहे. जोंग इल चा ६५ वर्षीय साळा जांग सोंग थाक याला प्रशासनाचा गाडा हाकण्याचा प्रदिर्घ अनुभव आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली जोंग उन ला राज्य कारभाराचे धडे मिळणे अपेक्षित आहे. उत्तर कोरियाचे संरक्षण मंत्रीसुद्धा जोंग उन च्या पाठीशी उभे राहतील कारण ते जोंग उन च्या स्वर्गीय आईचे निकटचे सल्लागार होते. जोंग उन च्या सावत्र भावांनी तक्रारीचा सूर आरवला असल्याच्या बातम्या अधूनमधून प्रसारित होत असल्या तरी ते ऐशोरामी जीवन जगण्यात मश्गुल असल्याने जोंग उन ला आव्हान देण्याचे कष्ट ते करणार नाहीत असेही म्हटल्या जाते. राज्य यंत्रणेवर पकड बसविणे, अण्वस्त्रांचा तिढा सोडवणे आणि अन्न धान्याची कमतरता दूर करणे या काही समस्या जोंग उन यांच्या समोर ताटात वाढून ठेवलेल्या आहेत. मात्र किम जोंग उन यांची खरी डोकेदुखी वेगळीच आहे. सन २०१२ हे त्यांच्या आजोबांचे, म्हणजेच किम इल सुंग, यांच्या जन्म शताब्दीचे वर्ष आहे. या प्रित्यर्थ उन यांच्या वडिलांनी, म्हणजेच किम जोंग इल यांनी, घोषणा करून ठेवली आहे की २०१२ मध्ये उत्तर कोरिया एक बलशाली आणि समृद्ध राष्ट्र होणार आहे. सन २०१२ सुरु होण्याच्या २ आठवडे आधीच जोंग इल यांनी जगाचा निरोप घेतला आणि उत्तर कोरियाला एवढ्या कमी काळात बलशाली आणि समृद्ध राष्ट्र करण्याची जबाबदारी किम जोंग उन यांच्यावर टाकली. किम जोंग इल यांनी आतापर्यंत लपवून ठेवलेली आणि २०१२ मध्ये वापरात येऊ घातलेली जादुई छडी तर आता त्यांच्या मृत्यूने एक रहस्यच बनून राहिली आहे. किम जोंग उन यातून मार्ग काढण्यासाठी कोणती जादुई उक्ती काढतात हे लवकरच बघायला मिळेल.

No comments:

Post a Comment