Saturday, January 28, 2012

बांगला देशातील घडामोडींचे भारतीय संदर्भ

(Published in Marathi Daily Deshonnati on 28/01/2012)

बांगला देशातील लोकशाही मार्गाने निवडून आलेले शेख हसीना वाजेद यांचे सरकार उलथवण्याचा काही आजी आणि माजी लष्करी अधिकाऱ्यांचा कट वेळेतच उघडकीस आल्याने भारताच्या परराष्ट्र विभागाने निश्वास टाकला. शेख हसीना यांच्या लोकप्रिय सरकारविरुद्धचे कारस्थान यशस्वी झाले असते तर भारताची डोकेदुखी वाढण्याचीच शक्यता जास्त होती. भारताला आणि बांगला देशातील लोकशाहीप्रेमी नागरिकांना दिलासा देणारी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे बांगला देशच्या लष्करानेच या कारस्थानात सहभागी असल्याच्या आरोपावरून काही आजी आणि माजी सैनिकी अधिकाऱ्यांना अटक केली आणि जाहीर व्यक्तव्यातून अश्या लोकशाहीविरोधी प्रवृत्तींची निर्भत्सना केली. बांगला देशच्या लष्करी प्रवक्त्यांनी सरकार विरोधी कट फसल्याचे घोषित करतांना माहिती दिली की निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांना या संदर्भात अटक करण्यात आली असून एका पदासीन मेजर जनरलची कसून चौकशी केली जात आहे. या कटात १४ ते १६ आजी आणि माजी लष्करी अधिकारी सहभागी असल्याचा दाट संशय असल्याचेही या वक्तव्यात म्हटले आहे. लष्कराने गंभीर राजकीय टिप्पणी करत म्हटले की, ¨ बांगलादेशच्या भूतकाळात काही वाईट प्रवृत्तींनी लष्कराच्या खांद्यावर बंदूक ठेऊन अराजकता माजवली होती आणि लष्कराचा राजकीय हेतूंसाठी वापर केला होता. कधी अशा प्रवृत्तींचे डाव यशस्वी झाले तर कधी फसले. मात्र, यामुळे बांगला देश मुक्ती संग्रामातून जन्माला आलेल्या बांगला देशी लष्कराच्या गौरवशाली परंपरेला काळीमा फासली गेली. या व्यक्तव्यातून आम्ही, बांगला देश लष्कराचे सक्षम आणि शिस्तबद्ध सदस्य, जाहीर करू इच्छितो की अशा कुप्रवृत्तींनी केलेल्या कृत्यांचे ओझे आम्ही आमच्या खांद्यावरून वाहणार नाही

बांगला देशच्या लष्कराने हुकुमशाही प्रवृत्तींविरुद्ध अशी कठोर भूमिका घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. सन १९४७ ते १९७१ पर्यंत बांगला देश पाकिस्तानचा भाग असल्याने लष्करी कारस्थानांची परंपरा तिथेही लवकरच वाढीस लागली, नव्हे ती पाकिस्तानकडून जणू देणगी स्वरूपातच मिळाली. बांगला देशचे ´राष्ट्रपिता´ आणि पहिले राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रहेमान यांची १५ ऑगस्ट १९७५ ला काही लष्करी अधिकाऱ्यांनी निर्घुण हत्या करत सत्ता बळकावली आणि तेव्हापासूनच बांगला देशातील लोकशाही संस्था आणि लोकशाही प्रेमी नागरिकांची गळचेपी सुरु झाली. या लष्करी हुकुमशहांनी भारत आणि बांगला देश यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध नासवत दोन्ही देशांदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण करण्यात महत्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानात असलेली हुकुमशाही आणि धर्मांधता याच्या विरोधात शेख मुजीबुर रहेमान यांनी बांगला भाषिक राष्ट्रवाद आणि सर्वधर्मसमभाव या तत्वांवर बांगला देश मुक्ती संग्राम उभा केला आणि भारताच्या मदतीने स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती केली. सर्वधर्मसमावेशक भाषिक राष्ट्रवादाच्या तात्विक बैठकीमुळे नवनिर्मित बांगला देश आणि भारत हे वैचारिक आणि भावनिक पातळीवर एकमेकांना जवळचे वाटू लागले. याच भूमिकेतून बांगला देशने कवीवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्याच एका कवितेचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार सुद्धा केला. अशी समान ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या दोन देशांमध्ये सर्व क्षेत्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होणे अपेक्षित होते. मात्र बांगलादेशच्या निर्मितीनंतर वर्षात ´बंगबंधू´ मुजीबुर रहेमान यांना ठार करून बांगला देशच्या लष्करी अधिकाऱ्यांनी कळत नकळत पाकिस्तानचे अंधानुकरण करत लोकशाही आणि सर्वधर्मसमावेशकता या तत्वांना तिलांजली दिली. साहजिकच बांगला देशची जवळीक पाकिस्तानशी झाली आणि पाकिस्तानातील लष्करी अधिकाऱ्यांनी बांगलादेशचा वापर भारत विरोधी कारवायांसाठी करण्यात यश मिळवले. अशा प्रकारे १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून बिघडत जाणारे भारत आणि बांगला देश यांच्यातील संबंध १९९० च्या दशकात अगदीच रसातळाला गेले. १९८० आणि १९९० च्या दशकात भारतातील तथाकथित जहाल राष्ट्रवादी शक्तीच्या राजकीय उदयाचा सुद्धा भारत आणि बांगला देश यांच्यातील संबंधांवर विपरीत परिणाम झाला. पाकिस्तान द्वेशाप्रमाणेच बांगला देश द्वेषाची भूमिका घेत राजकीय पोळी भाजू पाहणाऱ्या भारतातील काही राजकीय पक्षांमुळे दोन्ही देशातील अविश्वास आणि विसंवाद वाढीस लागला. गेल्या वर्षात मात्र दोन्ही देशातील सरकारांनी जुनी जळमट काढून टाकत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी धैर्याने पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे.

सन २००८ मध्ये, खडतर संघर्षानंतर मुजीबुर रहेमान यांच्या जेष्ठ कन्या शेख हसीना यांच्या नेतृत्वातील अवामी लीगने इतर मित्र पक्षांच्या मदतीने तीन चतुर्थांश बहुमताने निवडणुकीत विजय संपादन केला आणि या सरकारने अनेक साहसी निर्णय घेत बांगला देशच्या राजकारणावरील मुलतत्ववाद्यांची पकड सैल करण्याची प्रक्रिया सुरु केली. या दिशेने हसीना यांच्या सरकारने अत्यंत महत्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतले. या मुळे बांगला देशातील लोकशाही प्रेमी जनता तर शेख हसीना यांच्या पाठीशी उभी राहिली पण त्याचबरोबर हसीना यांचे अनेक शत्रूही तयार झाले. यापैकी पहिला निर्णय म्हणजे, बांगलादेशमध्ये लोकशाही आणि सर्वधर्मसमावेशक मुल्यांची पुन्हा स्थापना करणे. मूळ राज्यघटनेत लष्करशहांनी वेळोवेळी केलेले बदल रद्द करत शेख मुजीबुर रहेमान यांना अपेक्षित असलेल्या सर्वधर्मसमावेशक लोकशाही मुल्यांना रुजवण्यासाठी हसीना सरकारने संसदेत वेगवेगळ्या घटना दुरुस्ती पारित करून घेतल्या. बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने देखील ´हुकुमशहांनी मूळ राज्य घटनेतील मुलभूत तत्वांना बदलणे चुकीचे होते´ असा निर्वाळा देत शेख हसीना यांनी केलेल्या दुरुस्त्यांना दुजोरा दिला. मात्र यामुळे धर्मांध शक्ती हसीना सरकारच्या विरुद्ध उभ्या ठाकल्या. दुसरा निर्णय म्हणजे, बांगला देश मुक्तीसंग्रामाच्या काळात जनतेवर जुलूम करणाऱ्या नागरी आणि सैनिकी अधिकाऱ्यांविरुद्ध खटले दाखल करणे. पाकिस्तानातून स्वतंत्र होण्यासाठी शेख मुजीबुर रहेमान यांनी ´मुक्ती वाहिनीची´ स्थापना केली होती. या मुक्ती वाहिन्याच्या सदस्यांचा आणि त्यांना सहानुभूती देणाऱ्या नागरिकांचा पाकिस्तानी सैन्याने अतोनात छळ केला आणि अनेकांना ठारही केले. हे अत्याचार करण्यात बांगला देशातील, म्हणजे तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानातील - अधिकारी सुद्धा सहभागी होते. बांगला देशच्या निर्मितीनंतर हे अधिकारी बांगलादेशच्या प्रशासनात आणि सैन्यात शामिल झाले, मात्र गरीब बांगलादेशी नागरीकांबाबतचा त्यांचा दृष्टीकोन बदलला नाही. लष्करी राजवटीने अशा अधिकाऱ्यांना अभय दिले आणि आपले वर्चस्व टिकवण्यासाठी त्यांचा उपयोग केला. साहजिकच बांगलादेश मुक्तीसंग्रामात पाकिस्तानची साथ देत बांगला नागरिकांवर अत्याचार करूनही त्यांना कुठलीच शिक्षा झाली नाही. आता हसीना यांच्या सरकारने अशा सर्व अधिकाऱ्यांविरुद्ध खटले दाखल करत त्यांना शिक्षा ठोठावण्याचा संकल्प जाहीर केला आणि त्या दिशेने ठोस पाउलेही उचललीत. मात्र यामुळे लष्करात हसीना यांचे अनेक शत्रू तयार झाले आणि त्यांनी हसीना यांचे सरकार पाडण्यासाठी हालचाली सुरु केल्या. हसीना यांनी घेतलेला तिसरा निर्णय म्हणजे भारताशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे. शेख हसीना यांच्या पुढाकाराला भारत सरकारनेही सकारात्मक पाठिंबा दर्शविला आणि दोन्ही देशांदरम्यान उच्चस्तरीय भेटीगाठी सुरु झाल्या. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांनी बांगला देशला भेट दिली. बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद दोनदा भारत भेटीला आल्या, एकदा नवी दिल्लीला तर एकदा शेजारच्या त्रिपुरा राज्याची राजधानी आगरतळा शहराला त्यांनी भेट दिली. आगरतळा विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट सुद्धा प्रदान केली. त्याचप्रमाणे बांगला देशाच्या परराष्ट्रमंत्री डॉ. दिपू मोनी या सुद्धा भारत भेटीवर आल्या होत्या. हसीना सरकारने बांगलादेशाच्या भूमीवर कार्यरत अनेक भारत विरोधी गटांविरुद्ध कारवाई केली, यात पूर्वोत्तर भारतातील अनेक फुटीरतावादी गटांचाही समावेश आहे. साहजिकच बांगला देशातील धर्मांध आणि हुकुमशाही प्रवृत्तीच्या गटांना हसीना यांचे भारताशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचे धोरण रुचलेले नाही. त्यामुळे हे गट, ज्यामध्ये लष्कराचेही काही अधिकारी सहभागी आहेत, येन केन प्रकारे शेख हसीना यांचे सरकार पाडण्याच्या तयारीला लागले आहेत. हसीना यांचे नेतृत्वही तेवढेच खंबीर आहे. शेख मुजीबुर यांच्या खुनानंतर लष्करी राजवटीने लादलेला विजनवास त्यांनी सहन केला आहे. सन १९८१ पासूनच त्या अवामी लीगचे नेतृत्व करत आहेत आणि लोकशाही मूल्यांसाठी झगडत आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांना मिळालेले तीन चतुर्थांश बहुमत ही बांगला देशच्या जनतेने त्यांच्या त्यागाला आणि संकल्पनांना दिलेली पावतीच आहे. या परिस्थितीत बांगला देशातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवणे तर भारतासाठी महत्वाचे आहेच पण शेख हसीना यांच्या द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांना योग्य प्रतिसाद देणे जास्त गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment