सावरकरांच्या
जीवनाच्या विविध छटा आहेत. बहुरंगी-बहुढंगी; काळ्या आणि पांढऱ्या आणि तांबड्या. अंदमानात रवानगी होण्याआधीचे सावरकर
हे देशभक्तीने ओतप्रोत भरलेले आणि येन-केन-प्रकारेन ब्रिटिशांना भारतातून हिसकावून
लावण्यासाठी प्राणाची आहुती देण्यासाठी सदैव सज्ज असलेले प्रभावी तरुण व्यक्तीमत्व
होते. तोपर्यंत विचारधारेचे रंग त्यांच्यावर चढले नव्हते. त्यांच्या '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' मध्ये याची अनुभूती येते. अंदमानात हाल-अपेष्टा
सोसतांना त्यांच्यामध्ये आमुलाग्र परिवर्तन झाले. गोऱ्या-परक्यांविरुद्धची लढाई ही
'क्षण-भंगूरता' असल्याचे त्यांना जाणवले; आणि 'आपल्याच घरात आपलेच होऊन बसलेल्या आणि तरीही आपले नसलेल्या यमनांविरुद्धचा
यल्गार' हे शाश्वत सत्य असल्याचा साक्षात्कार त्यांना
झाला. त्यातून जन्म घेतला हिंदुत्वाच्या विचारधारेने; जी आजच्या तालिबान सारखी पुराणमतवादी नव्हती; तर अस्सल वैज्ञानिक दृष्टीकोनाचा पुरस्कार
करणारी भविष्यवादी विचारसरणी होती. जातीभेद तोडणारी; अंधःश्रद्धांवर प्रहार करणारी जीवनप्रणाली होती. सावरकरांनी आयुष्यभर
या हिंदुत्वाचा पुरस्कार केला. गायीला माता मानू नका; गायीकडे एक बहु-उपयोगी प्राणी म्हणून बघा; समुद्र-उल्लंघन केल्याने नाश होणार नाही तर त्यानेच प्रगती
साधेल अशा शिकवणी त्यांनी दिल्या आहेत. भाषा-समृद्धीचा कोरडा आग्रह न धरता बदलत्या काळातील नव-नव्या घटना
ध्यानात घेत मराठी-शब्द निर्मितीचा ध्यास सावरकरांनी घेतला होता. त्यातून माय-मराठी
केवढी तरी संपन्न झाली आहे.
सावरकरांच्या
अष्टपैलू व्यक्तीमत्वाची 'श्वेत-पत्रिका' बरीच मोठी आहे. मात्र त्यावर पर-धर्म द्वेषाचे
गडद काळे ढग सुद्धा जमलेले आहेत. सावरकरांच्या स्वप्नातील
भारतात मुस्लीम आणि
इसाई धर्माला आणि या धर्माचे पालन करणाऱ्या लोकांना कुठेही स्थान नाही. भारताच्या संमिश्र
संस्कृतीबद्दल कुठेही अभिमान नाही की 'एकीच्या बळाची' प्रचिती
नाही. सावरकरांच्या विचारांमध्ये धर्म-युद्धाच्या नावाखाली कधीही न संपणाऱ्या गृह-युद्धाची बीजे सर्वत्र
पेरलेली आहेत. 'त्यांच्या' पासून सुटका करून घेण्यासाठी 'त्यांच्या' स्त्रियांवर बलात्कार करण्यापासून ते 'त्या सर्वांना' हुसकावून लावण्यापर्यंतचे सर्व उपाय त्यांना
मान्य होते. हिंदू आणि मुस्लीम ही दोन राष्ट्रे आहेत आणि ती एकत्र नांदूच शकत नाहीत या निष्कर्षाप्रत पोहोचणारे सावरकर
हे पहिले भारतीय नेते होते. द्वि-राष्ट्रवादाचा मूळ सिद्धांत सावरकरांचा; जो सन १९४० मध्ये जिन्नांनी पाकिस्तानच्या
मागणीच्या समर्थनार्थ पुढे केला आणि अखेर नेहरू-पटेल यांनी फाळणीला मान्यता देऊन अप्रत्यक्षपणे स्वीकारला. जिन्नांच्या मुस्लीम
लीगने ओकलेल्या विषारी प्रचाराला सावरकर-हेगडेवार यांनी उभारलेल्या हिंदुत्वाच्या 'गुढीमुळे' बळच मिळाले. बहुसंख्यकांचा जातीयवाद आणि अल्पसंख्यकांचा जातीयवाद
एकमेकांना पूरक ठरलेत आणि अजूनही ठरत आहेत. पाकिस्तान वेगळा झाल्यावर देशातल्या सगळ्या
मुस्लिमांनी चालते व्हावे अशी मनोमन इच्छा सावरकरांची असणारच. तसे होणे शक्य नसेल तर
'दुय्यम' नागरिक म्हणून त्यांनी भारतात रहावे असे सावरकरांचे स्पष्ट मत होते.
मात्र; भारतीय राज्यघटनेने दिलेली 'एक व्यक्ती एक मत' आणि 'सर्व व्यक्ती समान अधिकार' ही तत्वे सावरकरांना मान्य नव्हती.
आपल्या
स्वप्नातील हिंदू-राष्ट्र साकारण्यासाठी सर्व ते प्रयत्न आणि सगळ्या तडजोडी करण्याची
सावरकरांची तयारी होती. पण अंदमानच्या चार भिंतींच्या आत जन्मठेप भोगतांना हे कसे शक्य
होते? वैज्ञानिक विचारसरणीमुळे त्यांचा पुनर्जन्मावर
विश्वास नसावा आणि त्यामुळे मिळाल्या जन्मीच कार्य सिद्धीस नेण्याची त्यांची तत्परता
होती. तेव्हा ब्रिटीशांशी तडजोड करून 'मायभूमी' परतण्याची किमया
त्यांनी साधली. त्यांच्यासोबतच्या अंदमानातील अनेक क्रांतीकारकांपुढे सुद्धा
हा पर्याय होता पण सावरकर वगळता अन्य कोणीही त्याला शरण गेले नाही. पण; अंदमानातील जन्मठेप पूर्ण भोगलेल्या
किव्हा तिथेच प्राण सोडलेल्या कोणत्या क्रांतिकारकाचे नाव जन-सामान्यास ठाऊक आहे? अंदमानात असतांना सावरकर आणि ब्रिटीश राज्यकर्त्यांमध्ये
प्रदीर्घ पत्र-व्यवहार झाला; ज्याबद्दल
१९७० च्या दशकाच्या मध्यापर्यंत
कुणासही ठाऊक नव्हते. एका संशोधकाला संशोधन कार्यादरम्यान या पत्रांचा छडा लागल्यावर
सावरकरांच्या जन्मठेपेची शिक्षा अर्धवट भोगून सुटका होण्याच्या घटनेमागील
तथ्ये पुढे आलीत. अंदमानहून सुटका होण्याच्या मोबदल्यात ब्रिटीशांचे प्रभुत्व मान्य
करण्याचे आश्वासन सावरकरांनी ब्रिटीश राज्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्राद्वारे दिले. राजकारणात भाग न घेण्याची
आणि काही वर्षांसाठी रत्नागिरी
जिल्हा न सोडण्याची अट सुद्धा सावरकरांनी मान्य केली. सन १९३९-४० पर्यंत त्यांनी 'करारानुसार' कोणतेही पद स्वीकारले नाही. ते अंदमानातून परत आल्यावर त्यांनी ब्रिटीशांविरुद्ध
एक तरी चळवळ उभारण्याचा दाखला आपणास ठाऊक आहे का? द्वितीय विश्वयुद्ध सुरु झाल्यानंतर गांधींसह कॉंग्रेसचे नेते ब्रिटीश
सैन्याशी सहयोग न करण्याचे आवाहन करत होते आणि सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटीशांविरुद्ध
सशस्त्र सैन्याची आघाडीच उघडली होती; त्या काळात सावरकर हिंदू तरुणांना 'ब्रिटीश सैन्यात' शामिल होऊन हिंदू-राष्ट्राच्या निर्मितीसाठी सुसज्ज होण्याचे आवाहन करत
होते.
स्वातंत्र्य
लढ्याच्या काळात कॉंग्रेस ने ब्रिटीशांशी बरेचदा तडजोडी केल्यात; वाटाघाटी आणि करार केलेत. मात्र; जे झाले ते सगळ्यांपुढे झाले. ब्रिटीश आणि
सावरकर यांच्या दरम्यान झालेल्या पत्र-व्यवहाराबद्दल सावरकरांनी स्वत: कधीही माहिती
दिली नाही; ती लपवूनच ठेवली. त्यांची पत्रे प्रसिद्धीस
आल्यानंतर ती 'सावरकरांची गनिमी चाल होती' असे हिंदुत्ववादी सांगतात. मात्र; 'गनिमी कावा' नेमका कशासाठी होता? कारण अंदमानातून सुटका झाल्यानंतर सावरकर
कधीही ब्रिटीशांविरुद्ध लढले नाहीत. अंदमानातील काळ्या पाण्याची शिक्षा भोगणे हे अत्यंत
कष्टप्रद काम होते आणि जर कुणास ते शक्य झाले नाही तर तो मानवी स्वभावातील मृदुपणा
म्हणून नक्कीच क्षम्य आहे. पण मग अशांचे पोवाडे आपण गावेत का?
No comments:
Post a Comment