Thursday, September 6, 2012

माहिती-तंत्रज्ञानाची असांज-महिमा

प्रसारमाध्यमे आणि जनतेतील असंतोष यांचे नाते खुप जुने आहे. काळ बदलला, वेळ बदलली तरी प्रसार माध्यमांचा उपयोग  व्यवस्थेविरोधात रान पेटवण्यासाठी करण्याची प्रथा कायम  आहे आणि अधिक बळकट होत आहे. वर्तमानपत्रे आणि मासिके प्रचलीत होण्याच्या काळात जगभरातील सुधारणावाद्यांनी पद्धतशीरपणे त्यांचा उपयोग जनजागृतीसाठी केला होता. त्याचप्रमाणे आजच्या इंटरनेटच्या युगात, सगळ्या देशांमध्ये या नव्या प्रसार माध्यमाचा उपयोग प्रस्थापितांविरुद्धच्या असंतोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी करण्यात येत आहे. मात्र, ज्युलिअन असांज नावाच्या व्यक्तीने जे साध्य करून दाखवले त्याची कल्पनाही भल्याभल्यांनी केली नव्हती. या असांज नावाच्या वादळाने पश्चिमी देशांना पुरते हैराण केले आहे. मात्र, तो स्वत: लैंगिक गैर-व्यवहार आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेला असल्याने त्याच्यावर पलटवार करण्याची संधी पाश्चिमात्य देशांना मिळाली आहे.  त्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी असांज ने इक्वेडोर  देशाच्या लंडन दूतावासात शरण घेण्याची शक्कल लढवत, या लढाईतील  पेच अधिक वाढवला आहे.        
ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या असांज ने संगणक प्रणालींचे हैकिंग करण्याच्या तंत्रात विद्वत्ता प्राप्त केली आहे. सन २००६ मध्ये त्याने आपल्या मित्रांच्या आणि धनाढ्य समर्थकांच्या मदतीने विकीलिक्स ही वेबसाईट तयार केली.  लोकशाहीचा मिथ्या अभिमान बाळगणाऱ्या अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये माहितीच्या अधिकारांची होणाऱ्या गळचेपी विरुद्ध आवाज उठवणे  आणि जागतिक स्तरावर या देशांकडून रचली जाणारी कट-कारस्थाने उघड करणे हे विकीलिक्सचे उद्दिष्ट आहे.  असांजच्या 'टीम विकीलिक्स' मध्ये ५ पूर्ण वेळ कार्यकर्ते आणि ८०० ते १००० गरज असेल त्याप्रमाणे पाचारण करता येतील असे कार्यकर्ते आहेत. या टीम विकीलिक्सने, विविध देशातील सरकारे, लष्कर, बहुराष्ट्रीय कंपन्या इत्यादींच्या संगणक प्रणाली मध्ये शिरून  त्यांचे गोपनीय अहवाल आणि पत्राचार हस्तगत केले.  प्रचंड प्रमाणात मिळवलेले महत्वपूर्ण ई-दस्तावेज सुरक्षित साठवून ठेवण्याचे  तंत्र विकीलिक्सने विकसित केले आहे. त्यामुळे, सरकार आणि त्यांचे भाडोत्री ई-तज्ञ यांनी कितीही प्रयत्न केले तरी ते दस्तावेज विकीलिक्सच्या ताब्यातून परत मिळवणे किव्हा नष्ट करणे शक्य झालेले नाही.  
विशिष्ट विषयांवरचे सनसनीखेज दस्तावेज जाहीर करण्याची पूर्वसूचना प्रसारमाध्यमांमार्फत  देत, दिलेल्या वेळेत जगात सर्वत्र असे दस्तावेज इंटरनेटवर उपलब्ध करून देण्यात विकीलिक्सचा हातखंडा आहे.  अमेरिकेचे सरकार आणि त्यांची जगभरातील दुतावासे यांच्यात जवळपास रोज संदेशांची देवाण-घेवाण होत असते. या संदेशांचे सुमारे साडे सात लाख केबल्स विकीलिक्सने हस्तगत करत खळबळ उडवून दिली. आंतरराष्ट्रीय राजकारणातील शिष्टाचारानुसार, सर्वच देशांचे नेते आणि अधिकारी एकमेकांशी बोलतांना संयम राखतात आणि आपले खरे हेतू स्पष्ट करत नाहीत. मात्र, विकीलिक्सने मिळवलेल्या केबल्स मधून शिष्टाचारामागे नेमक्या काय भावना आणि हेतू दडलेले असतात याची स्पष्ट कल्पना येते. उदाहरणार्थ, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत-भेटीवर आले असतांना त्यांनी भारताच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यत्वाच्या दाव्याला समर्थन व्यक्त केले होते. मात्र, याच सुमारास त्यांच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी दूतावासाला पाठवलेल्या एका संदेशात भारताची  'सुरक्षा परिषदेचा स्वयं-घोषित दावेदार' अशी अवहेलना केली होती. या प्रमाणे जगातील प्रत्येक देश, त्या देशांतील राजकीय पक्ष आणि विविध संस्था याबद्दलची अमेरिकेची खरी मते या केबल्स मधून सर्वांना कळल्याने अमेरिकेच्या राजनैतिक प्रतिष्ठेस मोठा धक्का बसला आहे. सन २००९ मध्ये भारतातील सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर मोन्टेक सिंग अहलुवालिया यांना अर्थमंत्री बनवण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न केल्याचे या केबल्स द्वारे उघड झाले आहे. त्यांच्या ऐवजी प्रणब मुखर्जी यांना अर्थमंत्रीपद बहाल केल्याबद्दल अमेरिकेने घोर आश्चर्य व्यक्त केले होते, हे सुद्धा या केबल्स मधून दिसून आले आहे. सन २००८ मध्ये मनमोहन सिंग सरकार विरुद्ध अविश्वास प्रस्तावाच्या प्रसंगी मोठ्या प्रमाणात खासदारांची खरेदी करण्यात येत असल्याचे अमर सिंग यांनी अमेरिकेच्या नवी दिल्ली  दुतावासातील वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगितले असल्याची केबल दुतावासाने वाशिंग्टनला पाठवली होती, हे सुद्धा विकीलिक्सने उघडकीस आणले आहे. विकीलिक्सने या केबल्स इंटरनेटवर जाहीर केल्यानंतर अमेरिकेची एवढी नालस्ती झाली की हिलरी क्लिंटन यांना सर्व देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांना तात्काळ दूरध्वनी करत स्पष्टीकरण देणे भाग पडले होते.   विकीलिक्सच्या हरकती बंद पाडण्यासाठी अमेरिकी आणि मित्र राष्ट्रांच्या सरकारांनी शक्य ते सगळे प्रयत्न केले. विकीलिक्सला मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा ओघ थांबवण्यासाठी व्हिसा, पे-पाल इत्यादी आर्थिक देवाण-घेवाणीच्या  मध्यस्थ संस्थांवर दबाव आणत त्यांचे विकीलिक्सशी असलेले सगळे व्यवहार बंद पाडण्यात आले. या गळचेपीला उत्तर देण्यासाठी असांज समर्थकांनी  'एनोनिमस' नावाने या संस्थांच्या वेब साईटवर हल्ला चढवत त्या हैक केल्या आणि त्यांचे सर्व व्यवहार काही काळासाठी  बंद पाडण्यात यश मिळवले होते. अमेरिका आणि त्याचे मित्र राष्ट्र विकीलिक्स-विरोधात साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर करत आहेत, हे स्पष्ट आहे. या नीतीनुसार सर्व मार्ग अपयशी ठरल्यानंतर असांज विरुद्ध २ युवतींकडून बलात्कार आणि लैंगिक गैर-व्यवहाराची तक्रार स्वीडेन मध्ये दाखल करण्यात आली असे विकीलिक्सचे म्हणणे आहे. विकीलिक्सने उजेडात आणलेल्या संदेश-केबल्स आणि युद्ध दस्तावेज विकीलिक्सला मिळवून देण्याच्या आरोपाखाली ब्रेडली मैनिंग या अमेरिकी सैनिकाला इराक मध्ये अटक करण्यात आली. ब्रेडलीचा आता नाना प्रकारे छळ करण्यात येत असल्याच्या अनेक बातम्या प्रचलीत आहेत. याच प्रकारचा गुप्त छळ असांजच्या वाटेला येऊ शकतो असे विकीलिक्स आणि त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळे, लैंगिक-गैर व्यवहार प्रकरणात न्यायालयीन लढाईस सामोरे न जाता भूमिगत राहण्याच्या किव्हा इक्वेडोर दुतावासात शरण मागण्याच्या असांज-कृत्याचे ते समर्थन करत आहेत.   प्रगत आणि सामर्थ्यवान देशांतील सरकारी व्यवस्थांचा तीव्र रोष ओढून घेणाऱ्या असांज ला इक्वेडोर सारख्या दक्षिणी अमेरिकेतील चिमुकल्या गरीब देशाने तरी का शरण द्यावी, याचे गुपित विकीलिक्सने उघड केलेल्या केबल्स मध्ये दडलेले आहे.  सन २०१० मध्ये, अमेरिकेच्या इक्वेडोर मधील त्यावेळच्या राजदूत हिथर होग्स यांनी वाशिंग्टनला पाठवलेल्या एका केबल मध्ये इक्वेडोरचे निर्वाचित राष्ट्राध्यक्ष राफेल कोरिया यांची भर्त्सना केली होती. कोरिया यांनी मुक्तहस्ताने भ्रष्टाचार करता यावा यासाठी अयोग्य व्यक्तीची पोलीस-प्रमुख पदावर नियुक्ती केल्याचे केबल द्वारे अमेरिकेला कळवण्यात आले होते. विकीलिक्सने ही केबल उघड केल्यानंतर कोरिया यांचा अमेरिका-द्वेष उफाळून आला होता. आता असांज ला शरण देण्याचा निर्णय घेत कोरिया यांनी अमेरिकेने त्यांच्याविरुद्ध चालवलेल्या दुष्प्रचाराला जोरदार उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय, मागील दशकामध्ये दक्षिण अमेरिकेत अमेरिका विरोधी डाव्या सरकारांची लहर आली आहे. कोरिया यांचे सरकार सुद्धा डाव्या विचारसरणीचे आहे, मात्र इक्वेडोर बाहेर त्यांची फारशी लोकप्रियता नाही.  आता कोरिया यांनी, वेनेझुएलाचे हुगो चावेझ आणि क्युबाचे फिडेल कैस्त्रो यांच्याप्रमाणे संपूर्ण दक्षिणी अमेरिकी जनतेमध्ये मानाचे स्थान मिळवण्याचा प्रयत्न  असांज प्रकरणाच्या माध्यमातून केल्याचे विश्लेषकांचे मत आहे.   असांज इक्वेडोरच्या लंडन दुतावासात असल्याने आता ब्रिटेन, स्वीडेन आणि इक्वेडोर यांच्या दरम्यान पेच-प्रसंग निर्माण झाला आहे. सन १९६१ च्या विएन्ना करारानुसार, यजमान देश इतर देशांच्या दुतावासात कोणत्याही कारणाने परवानगी शिवाय प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे, इक्वेडोर दुतावासात पोलीस पाठवून असांज ला ताब्यात घेण्यात येईल असे संकेत ब्रिटेनने देताच जगभरात सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. अश्या कृत्याने  अत्यंत चुकीचा पायंडा पडू शकतो याची जाणीव अखेर ब्रिटेन ला झालेली दिसते आणि अशी घुसखोरी करण्यात येणार नाही असे आश्वासन ब्रिटेनने इक्वेडोरला देऊ केले आहे. मात्र, दूतावासातून बाहेर पडता क्षणी असांजला ताब्यात घेण्याचा ब्रिटेनला अधिकार आहे. त्यामुळे, ४१-वर्षीय असांज च्या उर्वरीत भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापुढचे सगळे आयुष्य लंडनच्या इक्वेडोर दुतावासात नजरकैदेत असलेल्या अवस्थेत काढायचे हा सरळ पण मानसिकदृष्ट्या तेवढाच कठीण पर्याय असांजकडे आहे. याशिवाय, इक्वेडोर असांज ला नागरिकत्व बहाल करत त्याची नेमणूक देशाचा संयुक्त राष्ट्रातील विशेष अधिकारी म्हणून करू शकते. हा दर्जा असांज ला मिळाल्यास, ब्रिटेन सरकार त्याला अटक करू शकणार नाही. मात्र, सध्या हा पर्याय इक्वेडोर किव्हा असांज च्या विचाराधीन नाही. इक्वेडोर ने असांजच्या वतीने प्रस्ताव ठेवला आहे की, ब्रिटेन आणि स्वीडेन यांनी असांज ला अमेरिकेच्या हवाली करण्यात येणार नाही असे लेखी आश्वासन द्यावे. मात्र, या साठी हे दोन्ही देश तयार नाहीत. त्यामुळे, आणखी बराच काळ हा तिढा कायम राहण्याची चिन्हे आहेत.  
असांज ने अमेरिका आणि इतर बलाढ्य राष्ट्रांचा दुटप्पीपणा सातत्याने उजेडात आणला आहे. त्याच्या प्रभावामुळे अमेरिका आणि संपूर्ण युरोपमध्ये 'ऑक्यूपाय' आंदोलनाने जोर पकडला होता, ज्यामध्ये माहिती-तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करत हजारो तरुण-तरुणींनी विविध देशातील सरकारांच्या तोंडचे पाणी पळवले होते. मात्र, असांज वर झालेल्या गंभीर आरोपाची दखल पाश्चिमात्य देशातील नागरी समाजाने घेतली आहे. या आरोपांनंतर विकीलिक्स चे समर्थन काही प्रमाणात कमी झाले आहे. तेव्हा, या आरोपांची शहानिशा होत कायदेशीर मार्गाने न्याय होण्यासाठी असांज ने स्वीडेन पुढे समर्पण करणे हे त्याच्यासाठी आणि त्याच्या प्रेरणेने पेटून उठलेल्या आंदोलनासाठी योग्य ठरणार आहे. मात्र, ब्रिटेन आणि स्वीडेन यांनी त्याला अमेरिकेच्या सुपूर्द करण्यात येणार नाही अशी ग्वाही देण्यास नकार दिल्याने या  राष्ट्रांच्या खऱ्या हेतुंबाबत असांज, विकीलीक्स आणि इक्वेडोर ने उपस्थित केलेल्या शंका निराधार नाहीत हे स्पष्ट होते. या परिस्थितीत असांज च्या भवितव्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली असली तरी,  माहिती-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रस्थपितांविरुद्ध लढण्याच्या त्याने दाखवलेल्या मार्गावर यापुढे जगभरातील आंदोलनकारी चालत राहणार हे निश्चित!      

No comments:

Post a Comment