एके काळी समुद्र उल्लंघन निषिद्ध मानणाऱ्या भारताने स्वातंत्र्यानंतर कात टाकत विज्ञान आणि तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीच्या जोरावर आता मंगळ ग्रहाला गवसणी घालण्याचे ध्येय निश्चित केले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था, म्हणजे इस्रोच्या मंगळायानाच्या प्रस्तावाला सरकारने मान्यता देत, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी स्वतंत्रता दिनी केलेल्या भाषणात भारताच्या मंगळ मोहिमेचा शंखनाद केला. अमेरिका, रशिया, जापान, चीन आणि युरोप पाठोपाठ मंगळावर संशोधनासाठी मानव-विरहीत यान पाठवणारा भारत सहावा देश ठरणार आहे. चंद्रायनच्या यशस्वी झेपेनंतर इस्रोचे संशोधनयान आता मंगळाच्या घिरट्या घालण्यासाठी नोव्हेंबर २०१३ मध्ये अवकाशात झेपावणार आहे. चंद्राच्या ध्रुवावर पाण्याचे पुरावे शोधण्यात चंद्रयान मोहिमेला ऐतिहासिक यश मिळाले होते. इस्रोचे मंगळायन यापेक्षा अधिक यशस्वी होऊन, माणसाच्या पाऊलखुणा उमटवण्याच्या मोहिमेतील मैलाचा दगड ठरेल अशी अपेक्षा करूया!
अगदी अलीकडे, अमेरिकी संशोधन संस्था, नासाच्या 'क्युरॉसिटी' रोव्हरने मंगळ ग्रहावर, अत्यंत कठीण परीक्षांचा सामना करत, यशस्वीरीत्या लंगर टाकल्याने भारतासह जगभरातील शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास बळावला आहे. क्युरॉसिटी' ला मंगळावर उतरवण्याचा उपक्रम नासाचा असला, तरी यात भारतासह अनेक देशांच्या वैज्ञानिकांचे भरघोस योगदान आहे. यापैकी, शास्त्रज्ञ अमिताभ घोष हे नासाच्या त्या महत्वपूर्ण चमूत सहभागी होते, ज्याने क्युरॉसिटीची मंगळावरील गेल विवरातील उतरण्याची नेमकी जागा निश्चित केली होती. घोष यांनी सांगितले की, पृथ्वीपासून २४,७८,३८,९७६ किमी दूरीवर असलेल्या या जागेचा भूतकाळ ओलाचिंब असण्याची शक्यता असल्याने त्या जागेची निवड करण्यात आली. निरीक्षणांतून असे आढळले होते की या ठिकाणी माती आणि सल्फेटचे थर आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागावर अश्या प्रकारचे थर पाण्यामुळे निर्माण झाले आहेत. मंगळावरील अशा जागेचे परीक्षण केल्यास या ग्रहावर पूर्वी पाणी उपलब्ध होते की नाही याबाबत निश्चित पुरावे मिळू शकतील. गेल विवराच्या मध्यभागी मंगळाचा पृष्ठभाग पर्वतासारखा उंचावला असून, क्युरॉसिटी कालांतराने यावर चढाई करणार आहे. या पर्वताच्या माथ्यावर वेगवेगळे थर वैज्ञानिकांना आढळले असून, प्रत्येक थर हा मंगळावर विविध काळखंडातील वातावरणाची साक्ष देणारा ठरू शकतो.
क्युरॉसिटी प्रत्यक्ष मंगळावरील जीवनाचा शोध घेणार नाही, पण जीवनाच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेली रसायने काही मात्रेत तरी उपलब्ध आहेत का याबाबत संशोधन करणार आहे. मंगळ संशोधनाच्या सुरुवातीच्या काळात, म्हणजे सन १९७६ मध्ये नासाच्या वायकिंग मिशनने या ग्रहावर जीवनाच्या शक्यतेबाबत प्रयोग केले होते. या प्रयोगांमधून मंगळावर सध्या कुठल्याही प्रकारे जीवन अस्तित्वात असल्याचे सिद्ध झाले नाही असे नासाने अधिकृतरीत्या स्पष्ट केले होते. मात्र, या मोहिमांतील प्रयोगांची रूपरेखा तयार करणाऱ्या चमूचे प्रमुख, गिल्बर्ट लेवीन अजूनही दावा करतात की त्यांना मंगळावर जीवनाचे प्रमाण सापडले होते. सन १९७६ च्या मोहिमांमध्ये २ अवकाशयाने एकाचवेळी मंगळावर उतरली होती आणि त्यांनी बरेच प्रयोग केले होते. यापैकी एका प्रयोगामध्ये पृथ्वीवरून नेलेली प्रोटीनची मात्रा मंगळाच्या मातीत मिसळण्यात आली आणि मातीतील जीवाणू त्याचे प्राशन करून कार्बन डायऑक्षाइड सोडतात का हे तपासण्यात आले. आश्चर्य म्हणजे, शास्त्रज्ञांना कार्बन डायऑक्षाइड सोडण्यात येत असल्याचे ध्यानात आले. ती माती तापवल्यानंतर ही प्रक्रिया बंद पडली. मात्र, वायकिंगच्या इतर कोणत्याही प्रयोगांना इतपत यश मिळू शकले नाही. त्यामुळे, अत्यंत अत्यल्प प्रमाणात सोडण्यात आलेला कार्बन डायऑक्षाइड हा जीवाणूंनी सोडला होता की विशिष्ट प्रकारच्या मातीत प्रोटीन मिसळल्याने झालेली रासायनिक प्रक्रिया होती हे नक्की कळू शकले नाही. मंगळावरील मातीचे संपूर्ण ज्ञान नसल्याने याबाबत तर्क लावणे सुद्धा शक्य नाही. त्यात, 'जीवनाच्या' व्याख्येबद्दल शास्त्रज्ञांमध्ये अजूनही एकमत नाही, आणि जीवनाचे किती विविध प्रकार विश्वात अस्तित्वात असू शकतील याबाबत अनेकानेक मते आहेत. त्यामुळे, यानंतर नासाने मंगळावर प्रत्यक्ष जीवनाचा शोध घेणे थांबवले.
मंगळाला जवळीक करणारे वातावरण पृथ्वीवर ज्या ठिकाणी आहे, तिथे कशा प्रकारचे जीवन अस्तित्वात आहे याचा सुद्धा शास्त्रज्ञांनी शोध लावण्याचा प्रयत्न करत, तसाच काही प्रकार मंगळावर असू शकेल का असा प्रश्न उपस्थित केला. मंगळ अत्याधिक थंड आणि कोरडा ग्रह आहे. यापैकी कोरडेपणा हा जीवनाच्या अस्तित्वातील जास्त मोठा अडथळा आहे, कारण पाण्याशिवाय जीवन अस्तित्वात असू शकत नाही या संकल्पनेस तडा जाईल असे कुठलेही पुरावे अद्याप शास्त्रज्ञांकडे नाहीत. चिली देशातील अटाकामा वाळवंट हे पृथ्वीवरील सर्वात कोरडे स्थान म्हणून ओळखले जाते. गेली कित्येक वर्षे अंतराळ-जैवशास्त्रज्ञ अटाकामाच्या जमिनीत काही जीवाणू तग धरून आहेत का याचा शोध घेत होते. त्यांना यश मिळत नसल्याने मंगळावर जीवाणूंच्या अस्तित्वाची शक्यता सुद्धा जवळपास मावळली होती. पण, सन २००६ मध्ये स्पेनच्या विद्यापीठातील एका रसायनतज्ञांना तिथल्या मिठाच्या खडकासारख्या मातीत जीवाणूंचे अनेक नवे प्रकार आढळलेत आणि याप्रमाणे मंगळावरसुद्धा जीवाणू कुठल्या ना कुठल्या स्वरूपात सापडू शकतील या धारणेस बळ मिळाले.
अणुउर्जेवर कार्यान्वित क्युरॉसिटी किमान १ वर्षे ९ महिने मंगळावर अहोरात्र कार्यरत असणार आहे. मंगळावरील जीवनसापेक्षतेचा शोध लावण्याच्या दृष्टीने क्युरॉसि टीचे प्रयोग किती मदतगार सिद्ध होतात हे काही वर्षांनीच कळू शकेल. मात्र, सुमारे ८९० किलो वजनाची ही कारच्या आकाराची प्रयोगशाळा यशस्वीपणे मंगळावर उतरवण्यात यश आल्याने, भविष्यात मानवजातीने या ग्रहावर तंबू ठोकण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल पुढे पडले आहे. सन २०३० पर्यंत मंगळ जिंकण्याच्या नासाच्या महत्वकांक्षेला ओबामा प्रशासनाने नुकताच हिरवा कंदील दिला आहे. मंगळावरील मानवाची स्वारी ही चंद्रावरील यात्रेसारखी अगदी कमी काळाची न राहता तो एक प्रदीर्घ प्रयोग ठरणार आहे. मानवी यानाला मंगळावर पोचायला किमान ६ महिने लागतील आणि तिथले अंतराळवीरांचे वास्तव्य तब्बल १८ महिन्याचे असण्याचे संकेत नासाकडून देण्यात येत आहेत. आजपासून १८ वर्षांनी होऊ घातलेल्या प्रस्तावित मंगळ - यात्रेतील प्रवाश्यांच्या भोजनाबाबत आधीच संशोधन सुरु झाले आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन केंद्रात ठाण मांडून बसणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी नासाच्या मेनूकार्ड वर १०० हुन अधिक पदार्थ आहेत. पण, हा मेनू मंगळावर निरुपयोगी ठरेल कारण ते सर्व पदार्थ पृथ्वीवर तयार करून अंतराळ केंद्रात नियमितपणे पोचवण्यात येतात. ही सुविधा मंगळावरील वैज्ञानिकांना उपलब्ध नसेल. मात्र, आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्राप्रमाणे मंगळ पूर्णपणे गुरुत्वाकर्षण-रहित नाही. त्यामुळे, तिथे प्रेशर कुकरच्या वापरासह भाज्या-फळे चिरायचे पर्याय विकसित करण्याच्या प्रयत्नात नासाचे तज्ञ आहेत. सध्या नासाच्या १७ बिलियनच्या आर्थिक तरतुदींपैकी मंगळ ग्रहावर अंतरीक्ष यात्रींच्या खाण्या-पिण्यासंबंधीत मेनू तयार करण्यावर १ मिलियन एवढी रक्कम खर्च होते आहे.
येत्या दिवसांमध्ये मंगळावर वसाहत निर्माण करण्याच्या दृष्टीने अमेरिका, युरोप, रशिया आणि चीन हे देश प्रयत्नांची पराकाष्ठा करतील यात शंका नाही. या शर्यतीत जपान सुद्धा उतरला आहे आणि भारताने आपण मागे राहणार नाही याचा सुतोवाच केला आहे. मात्र, मंगळ मोहिमांवर होणारा अवाढव्य खर्च ध्यानात घेता, मंगळावर कूच करण्याबाबत आंतरराष्ट्रीय स्पर्धा निर्माण होणे मानव जातीच्या हिताचे नाही. त्या ऐवजी संयुक्त राष्ट्राच्या नियंत्रणाखाली सर्वदेशीय सहकार्याने मंगळावर पोहोचणे सोयीस्कर आणि हितावह आहे. अन्यथा, पृथ्वीवरील विविध देशातील शत्रुत्व मंगळावर पोहोचण्यात वेळ लागणार नाही. यापूर्वी, पृथ्वी भोवतालच्या अंतरिक्षाचा व चंद्राचा उपयोग अण्वस्त्रे तैनात करण्यासाठी करू नये, तसेच फक्त शांततापूर्ण मानवी हिताच्या प्रयोगांसाठी करण्यात यावा यासाठी आंतरराष्ट्रीय दबावातून बड्या राष्ट्रांना करार करावा लागला होता. आता पुन्हा त्याच प्रकारचा करार मंगळाच्या बाबतीत करण्याची वेळ आली आहे. माणसाला पृथ्वीतलावरील कारभारात सामंजस्य दाखवणे अद्याप तेवढेसे जमले नसले, तरी मंगळाबाबतच्या व्यवहारात सर्व देश परिपक्वता दाखवतील अशी आशा करूयात!
No comments:
Post a Comment