Sunday, July 29, 2012

लॉर्ड ऑफ द 'रिंग्स'


एकेकाळी संपूर्ण जगाचे 'लॉर्ड', म्हणजे साहेब, असलेल्या इंग्लंड देशी सन २०१२ च्या ऑलम्पिकच्या निमित्त्याने जागतिक क्रीडा जत्रा भरते आहे. जागतिक ऑलम्पिक आंदोलनाचे मानचिन्ह असलेल्या, एकात एक गुंफलेल्या ५ रिंग्स, ज्या पृथ्वीवरील पाच खंडांचे प्रतिनिधित्व करतात, लंडन शहरास सुशोभित करत आहेत. गत शतकाच्या मध्यापर्यंत पाची खंडी दरारा असलेल्या इंग्लंडला आपले वैभव आणि संपन्नता यांचे जगाला दर्शन घडवण्याची संधी ऑलम्पिक खेळांच्या आयोजनाने लाभली आहे. आधुनिक ऑलम्पिक स्पर्धांचे तीनदा आयोजन करणारे लंडन हे एकमात्र शहर आहे. सन १९०८ मध्ये पहिल्यांदा इथे ऑलम्पिक भरले होते. त्यानंतर सन १९४८ साली लंडन ने दुसऱ्यांदा जागतिक खेळांचे यजमानत्व केले होते. द्वितीय विश्व-युद्धामुळे सलग दोनदा ऑलम्पिकचे आयोजन चुकल्याने या जागतिक क्रीडा मंचाला पुनर्जीवित करण्याचे आव्हान लंडनने स्वीकारले होते. अवघ्या ४ वर्षे आधीपर्यंत हिटलरच्या लढाऊ विमानांच्या भीषण हल्ल्यांमुळे लंडन शहराचे अतोनात नुकसान झाले होते. तरी सुद्धा सन १९४८ मध्ये ऑलम्पिकचे यशस्वी नियोजन करत साहेबांनी जगाची वाहवा लुटली होती. सन २०१२ च्या ऑलम्पिक आयोजनाच्या स्पर्धेत लंडनने,  मोस्को, न्यू यॉर्क, माद्रिद आणि पैरीस या ४ शहरांचे आव्हान मोडीत काढत यजमानत्व पटकावले आहे.  

२७ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान, २०४ राष्ट्रांचे सुमारे १०,५०० क्रीडापटू २६ खेळांच्या एकूण २०६ प्रकारातील पदकांसाठी जमीन-अस्मान एक करणार आहेत. कतार आणि ब्रुनेई या आखातातील देशांनी आपल्या चमुंमध्ये एकाही महिला खेळाडूला सहभागी केलेले नाही. सुरुवातीला सौदी अरेबियाच्या संघात देखील महिलांचा समावेश नव्हता, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील टीकेनंतर  सौदी ने २ महिला खेळाडूंना लंडन ऑलम्पिकमध्ये भाग घेण्यास पाठवले आहे. बांगला देशचा एकही स्पर्धक पात्रता फेरी पार करू शकला नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीच्या 'वाइल्ड कार्ड' प्रवेश सुविधेचा लाभ घेत या देशाचे ४ स्पर्धक ऑलम्पिकमध्ये सहभागी होत आहेत. ज्या देशांतील खेळांच्या मुलभूत सुविधा अगदी कमकुवत आहेत, अशा देशांमध्ये विविध क्रीडा प्रकारांबाबत उत्साह आणण्यासाठी ऑलम्पिक समिती काही खेळाडूंना वाइल्ड कार्ड द्वारे स्पर्धेच्या अनुभवाची संधी देत असते. बांगला देशने आतापर्यंत ऑलम्पिक स्पर्धेत एकही पदक जिंकलेले नाही, आणि असे एकूण ८० राष्ट्र आहेत ज्यांचे संघ आतापर्यंत ऑलम्पिकमधून रिकाम्या हाती परतले आहेत. यात भारताचे आणखी दोन शेजारी, नेपाळ आणि म्यानमारचा समावेश आहे.        

दुसरीकडे 'बडी राष्ट्रे' नेहमीच जास्तीत जास्त पदक जिंकून आपले जगातील श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी झुंजत असतात. शीत युद्धाच्या काळात अमेरिका आणि सोविएत संघादरम्यान पदक तालिकेत क्रमांक १ पटकावण्यासाठी नेहमीच जीवघेणी स्पर्धा असायची. या साठी दोन्ही देशांतील सरकारे आपापल्या खेळाडूंना भरपूर सुविधा उपलब्ध करवून देत. गेल्या २० वर्षांपासून चीनने पदक तालिकेत सगळ्यात वरचा क्रमांक पटकावण्याचा चंग बांधला आहे. या साठी चीन ने नोठ्या प्रमाणात खेळासंबंधीच्या मुलभूत सुविधा निर्माण करत नव्या पिढीला विविध क्रीडा प्रकारांकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न चालवला आहे. फ्रांसने सुद्धा पदक तालीकेतील आपले स्थान वर सरकवण्यासाठी गेल्या दशकभरात कंबर कसली आहे. फ्रांसने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आपल्या खेळाडूंना प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळी असू शकणाऱ्या वातावरणाचा सराव देण्याचा प्रयत्न केला आहे. बिजींग ऑलम्पिकमध्ये भारताने आपला सुवर्ण पदकांचा दुष्काळ संपवला होता, त्यामुळे आता भारतीय खेळाडूंकडून मोठ्या आशा निर्माण झाल्या आहेत. सन २०१० च्या आशियाई आणि राष्ट्रकुल खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी आधीच्या तुलनेत अधिक चमकदार कामगिरी केल्याने, लंडन ऑलम्पिकबाबत सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. भारताने १६ क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जिमनैस्टीक, तायकांडो आणि सेलिंगच्या पात्रता फेऱ्या पार करण्यात अपयश आल्याने भारतीय खेळाडू एकूण २६ पैकी १३ क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहेत. यंदाच्या ऑलम्पिक तयारीसाठी प्रथमच भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने भरघोस रक्कमेची तरतूद केली आहे. 'ऑपरेशन एक्षलन्स लंडन २०१२' या मोहिमेंतर्गत खेळाडूंच्या सरावासाठी रु. २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या मोहिमेस थोडी उशीराच, म्हणजे मागील वर्षी, सुरुवात करण्यात आली असली तरी या अंतर्गत खेळाडूंना आधुनिक सुविधा आणि तज्ञ प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बिजींग ऑलम्पिक आणि दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धांच्या दूरचित्रवाणीवरील प्रक्षेपणाला बऱ्यापैकी दर्शक वर्ग लाभला होता, त्यामुळे आता खेळाडूंना खाजगी प्रायोजकसुद्धा मिळू लागले आहे. याशिवाय, काही माजी खेळाडू आणि औद्योगीक संस्थानांनी ट्रस्ट उभारत, प्रतिभावान खेळाडूंमध्ये ऑलम्पिकमध्ये पदक  जिंकण्याची इर्षा उत्पन्न करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. यंदा पदक पटकावण्याची संधी असलेल्या सगळ्याच प्रमुख खेळाडूंना, 'मित्तल चैम्पियंस ट्रस्ट' आणि 'ऑलम्पिक गोल्ड क्वेस्ट' या दोन संस्थांनी भरीव मदत केली आहे. 'ऑलम्पिक गोल्ड क्वेस्ट' ची स्थापना बिलीयर्ड खेळाडू गीत सेठी आणि टेनिसपटू प्रकाश पदुकोन यांनी केली असून, ऑलम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकू शकणाऱ्या संभावित स्पर्धकांना शक्य ती मदत करण्याचा त्यांचा हेतू आहे. खुद्द भारतात ऑलम्पिक आयोजनाचा दावा करण्यासाठी पदक तालीकेतील कर्तुत्व सिद्ध करणे आवश्यक असल्याने, आता या दिशेने सरकारी, खाजगी आणि गैर-सरकारी प्रयत्नांना वेग येऊ लागला आहे.

ऑलम्पिकचे आयोजन हा आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रतिष्ठेचा मुद्दा आहे. सन २००८ साली बिजींग ऑलम्पिकच्या निमित्त्याने याची प्रचीती आली होती. चीनने स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात कुठलीही कसर सोडली नव्हती आणि दैदिप्यवान उद्घाटन आणि अंतिम सोहळ्याने सर्व जगाला प्रभावीत केले होते. चीनच्या आंतरराष्ट्रीय उत्कर्षाचा तो चरमबिंदू होता. मात्र, चीनने 'प्रतिष्ठेच्या' नादापायी दूरगामी सुविधांचे निर्माण करण्याऐवजी, केवळ ऑलम्पिक स्पर्धेस उपयोगी ठरतील अशा मुलभूत सुविधा उभारल्याने त्याच्या संसाधनांची नासाडी जास्त झाली असा टीकेचा सूर नंतर आंतरराष्ट्रीय समुदायातून उठू लागला. या पार्श्वभूमीवर, लंडन ऑलम्पिकच्या आयोजकांनी 'शाश्वत विकास' हे स्पर्धेचे ध्येय ठेवत 'इन्स्पाइरिंग अ जनरेशन' हे ब्रीद वाक्य घोषित केले आहे. लंडन शहराच्या मूळ स्वरूपात फार फेरफार न करता, आणि शक्य असतील तेवढ्या सध्या अस्तित्वात असलेल्या सुविधांचा उपयोग करत ऑलम्पिकची तयारी करण्यात आल्याचे आयोजक आवर्जून सांगतात. शिवाय, नव्याने निर्मित सुविधा भविष्यातील उपयोगाच्या दृष्टीने आकारण्यात आल्याचे इंग्लिश मनावर, तसेच जगातील पर्यावरण प्रेमींवर ठसवण्यात येत आहे. असे असले तरी, स्पर्धेच्या आयोजनाचा खर्च मूळ अंदाजापेक्षा आता दुप्पट झाला आहे, आणि त्यामुळे लंडनकरांची कुरकुर सुद्धा वाढली आहे. बिजींग आणि लंडन, तसेच सन २०१६ मध्ये ब्राझीलची राजधानी रिओ-डी-जेनेरिओ मध्ये होऊ घातलेल्या ऑलम्पिक आयोजनातून, भारताने भविष्यात लॉर्ड ऑफ द 'रिंग्स' होण्याचा ध्यास घ्यावा का आणि घेतल्यास कशा प्रकारे आयोजन करावे याबद्दल बरेच काही शिकता येईल. पदकांच्या लयलुटीसोबत ही शिकवणसुद्धा शिदोरीस बांधणे आवश्यक आहे.    

No comments:

Post a Comment