इजिप्त मधील, संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतलेली, लोकशाहीकरणाची प्रक्रिया महत्वपूर्ण वळणावर आली आहे. खरे तर, या प्राचीन देशाच्या इतिहासातील पहिल्या-वहिल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीचे निकाल जाहीर होताच, लष्कर-केंद्रित हुकुमशाहीला पूर्णविराम मिळावयास हवा होता. मात्र निवडणूक काळात, लष्कर आणि न्यायालयाच्या संगनमताने, राष्ट्राध्यक्ष तसेच निवडून आलेल्या संसदेच्या अधिकारात लक्षणीय कपात करण्यात आली आणि अलीकडेच स्थापित संसदेला भंग करण्यात आले. लष्करी प्रतिनिधींच्या 'सुप्रीम कौन्सिल ऑफ आर्म्ड फोर्सेस' या संस्थेने, जन-प्रतिनिधींच्या रास्त अधिकारांची लुट करत, स्वत:स सर्व-शक्तिमान करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांनी, लष्कर आणि संरक्षण मंत्री, राष्ट्राध्यक्षीय अधिकारांच्या अखत्यारीत येणार नाही याची तरतूद करून घेतली आहे. शिवाय, संसद भंग झाल्यानंतर लगेच, नवी घटना लिहिण्यासाठी १०० सदस्यीय पैनेलची नियुक्ती केली आहे. १६ महिने पूर्वी, ऐतिहासिक जन-उठावापुढे नमते घेत, २९ वर्षे राष्ट्रध्यक्ष पदावर बसलेल्या होस्नी मुबारक यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी लष्कराने, १ जुलै २०१२ पर्यंत लोक-नियुक्त सरकारकडे देशाची धुरा सोपवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मुबारक-काळातील 'मार्शल-लॉ' संपुष्टात आल्यानंतर, पंधरवाड्याच्या आत तो पुनश्च लागू करत लष्कराने आपले हेतू स्पष्ट केले आहेत.
गेल्या ६ दशकांपासून सत्तेचे सर्वोच्च अधिकार उपभोगत असलेले लष्कर आपला वरचष्मा कायम ठेवण्यासाठी येन-केन प्रकारे प्रयत्नांची शिकस्त करत आहे. मात्र, लोकशाहीच्या स्थापनेत अडथळा आणणारा लष्कर हा एकमात्र घटक नाही. इजिप्तमधील लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेतील विसंगती अशी आहे की निवडणुकांमध्ये लोकांचा विश्वास प्राप्त केलेला सर्वात मोठा पक्ष, म्हणजे 'मुस्लीम ब्रदरहूडच्या' अधिपत्यातील 'फ्रीडम एंड जस्टीस पार्टी'बाबत जागतिक मत साशंक आहे. मुबारक यांच्या राजीनाम्यानंतर घेण्यात आलेल्या संसदेच्या निवडणुकांमध्ये, 'मुस्लीम ब्रदरहूडच्या' या राजकीय शाखेला घवघवीत यश मिळाले होते. संसदेच्या निवडून आलेल्या एकूण ४९८ जागांपैकी, 'फ्रीडम एंड जस्टीस पार्टी'ला २३५ जागा मिळाल्यात. त्यामुळे संसदेने हाती घेतलेल्या नव्या राज्यघटना निर्मितीवर 'मुस्लीम ब्रदरहूडच्या' विचारधारेची छाप राहणार हे स्पष्ट होते. सन १९२८ मध्ये स्थापन 'मुस्लीम ब्रदरहूडने' सातत्याने इस्लामिक कायद्यांचा पुरस्कार केला आहे. सुरुवातीच्या काळात, आपले उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी त्यांनी जहाल मार्गांचा प्रयोग केल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्यामुळे, राजसत्तेने वेळोवेळी त्यांच्यावर बंदी आणत त्यांच्याविरुद्ध दडपशाहीचा वापर केला. सन १९५२ मध्ये अब्देल नासेर गामेल यांच्या नेतृत्वात, लष्कराने राजेशाहीस उखडून टाकण्याच्या कृत्याचे 'मुस्लीम ब्रदरहूडने' समर्थन केले होते. मात्र, नासेर यांनी लागू केलेल्या धर्मनिरपेक्ष राज्यघटनेला त्यांनी विरोध दर्शविला होता. नासेर यांच्या हत्येच्या प्रयत्नांच्या आरोपाखाली 'मुस्लीम ब्रदरहूडचे' मोठ्या प्रमाणात दमन करण्यात आले. इजिप्तचे पहिले पंतप्रधान, तसेच मुबारक यांच्या आधीचे राष्ट्राध्यक्ष सदात या दोघांच्याही खुनाचे आरोप 'मुस्लीम ब्रदरहूड'वर ठेवण्यात आले होते. दमन काळात या इस्लामिक संघटनेने सामाजिक आणि धार्मिक कार्यावर लक्ष केंद्रित करत लोकांच्या मनात स्थान निर्माण केले. नासेर यांनी इजिप्तमध्ये धर्मनिरपेक्ष राजपटलाची पायाभरणी केली, पण त्यावर लोकशाहीची इमारत बांधली नाही. परिणामी, शासकीय धोरणांना विरोध करायला राजकीय मंच उपलब्ध नसल्याने लोकांचा ओढा 'मुस्लीम ब्रदरहूड' आणि त्यांच्याशी संबंधीत संघटनांकडे वाढला.
अलीकडे पार पडलेल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत मुस्लीम ब्रदरहूडचे नेते महंमद मोर्शी ५१ टक्क्यांहून अधिक मतांनी विजयी झालेत. सुमारे ५०% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यांच्या विरोधातील लष्कर-पुरस्कृत उमेदवार आणि मुबारक यांचे अखेरचे पंतप्रधान अहमद शफीक यांना मिळालेली सुमारे ४८% मते ही 'मुस्लीम ब्रदरहूडच्या' इस्लामिक धोरणांना इजिप्तमध्ये असलेला विरोध दर्शवितात. आधुनिक विचारसरणीच्या लोकशाहीवादी गटांचा संघटनात्मक आधार कमकुवत असल्याने इजिप्तमधील जनतेची स्थिती 'इकडे आड तिकडे विहीर' अशी झाली आहे. प्रशासनिक अधिकारांवर एकाधिकार ठेऊ इच्छिणाऱ्या लष्कराची धर्मनिरपेक्षता मान्य करावी की इस्लामिक कायद्यांचा आग्रह धरणाऱ्या 'मुस्लीम ब्रदरहूडच्या' लोकशाहीवरील निष्ठेस मान्यता द्यावी या कात्रीत इजिप्तचे मतदार सापडले आहेत. राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीच्या पहिल्या फेरीत २ उदारमतवादी नेत्यांना एकत्रितपणे ५० टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती, जे इजिप्तचे जनमत धर्मनिरपेक्ष लोकशाही व्यवस्थेकडे झुकलेले असल्याचे दर्शविते. मात्र, सुधारणावाद्यांमधील फुटीचा फायदा 'मुस्लीम ब्रदरहूड' आणि लष्कराला मिळाला आहे.
पश्चिम आशियाच्या आधुनिक इतिहासातून धडा घ्यावयाचा झाल्यास एक बाब ठामपणे मांडता येईल, की लोकशाहीमार्गाने निवडून आलेल्या सरकारला, भले ही ते सरकार इस्लामिक मतांचे किव्हा धर्मनिरपेक्ष तत्वांच्या विरोधातील असेल तरी, आंतरराष्ट्रीय समुदायाने मान्यता देत सहकार्य करणे आवश्यक आहे. अन्यथा, हिंसक कट्टरपंथी गटांना बळ मिळून आंतरराष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकते. इजिप्तमधील 'मुस्लीम ब्रदरहूड' कुराण आणि शरिया कायद्यांप्रती आग्रही असले, तरी सन १९७० नंतर त्यांनी जाहीरपणे हिंसक मार्गांचा त्याग केला आहे. आपले उद्दिष्ट लोकशाही मार्गाने साध्य करण्याचा दुर्दम्य आत्मविश्वास त्यांनी दाखवला आहे. नेमक्या याच मुद्द्यावरून अल-कायदा आणि 'मुस्लीम ब्रदरहूड' यांच्या दरम्यान शत्रुत्व आहे. 'मुस्लीम ब्रदरहूड' ने जिहादचा मार्ग सोडून दिल्याने ते इस्लाम विरोधी आहेत असा अल-कायदाचा आरोप आहे. 'मुस्लीम ब्रदरहूड' ने शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात केलेल्या रचनात्मक कार्यांमुळे अल-कायदाला इजिप्तमध्ये विशेष थारा मिळाला नाही हे सुद्धा वास्तव आहे. मात्र, सद्द परिस्थितीत 'मुस्लीम ब्रदरहूड' ला मिळालेले जनमत नाकारल्यास अल-कायदा सारख्या जहाल संघटनांचे आयते फाऊ शकते.
निवडणुकीतून सामर्थ्य प्राप्त केल्यावर 'मुस्लीम ब्रदरहूडने' सत्ता हस्तगत करण्यासाठी तिहेरी धोरणाची घोषणा केली आहे; एक, लष्कराला वाटाघाटीसाठी पाचारण करायचे; दोन, लष्कराला न्यायालयात आव्हान द्यायचे; आणि तीन, लष्कर-विरोधी जन आंदोलन उग्र करायचे. या संघर्षात 'मुस्लीम ब्रदरहूड'चा निर्विवाद विजय झाला, तरी इजिप्तचे इस्लामीकरण करणे वाटते तेवढे सोपे असणार नाही. एक तर, इजिप्त मध्ये सुधारणावाद्यांची शक्ती दुर्लक्षित करण्याजोगी नाही. मुबारक-विरोधी आंदोलनाची ठिणगी पाडण्याचे आणि आंदोलनाची मशाल तेवत ठेवण्याचे श्रेय अशा सुधारणावादी गटांना जाते. या पुढील लढाईत लष्कराला मात द्यावयाची असल्यास, ब्रदरहूडला सुधारणावाद्यांची मदत घेणे गरजेचे आहे आणि त्यासाठी त्यांना काही जहाल तत्वे सोडावी लागतील. दोन, इजिप्तच्या लष्कराचे इस्लामीकरण झालेले नाही. त्यामुळे, ब्रदरहूडने लष्कराशी जुळवून घेतले, तरी त्यांच्या मदतीने समाजाचे इस्लामीकरण करणे जमणार नाही आणि लष्करातूनच याला विरोध होण्याची शक्यता आहे. तीन, इजिप्तमधील इसाई अल्पसंख्यकांचे प्रमाण लक्षणीय आहे आणि त्यांच्या एकत्रित प्रभावाकडे दुर्लक्ष करणे सोपे नाही. चार, सगळ्यात महत्वाचे, इजिप्तच्या अर्थव्यवस्थेची मदार आंतरराष्ट्रीय गुंतवणूक व व्यापार आणि पर्यटनावर आहे. इराण आणि सौदी अरेबिया सारखे तेलाचे साठे किव्हा इतर मौल्यवान वायू अथवा खनिजांचा साठा इजिप्तमध्ये नाही. त्यामुळे, आंतरराष्ट्रीय समुदायाला दुखावून इजिप्तवर सुखासुखी राज्य करणे सोपे नाही. या पार्श्वभूमीवर, इजिप्तमधील लोकांच्या हुकुमशाही विरोधी भावना आणि निवडणुकीत त्यांनी दिलेला कौल लक्षात घेता. 'मुस्लीम ब्रदरहूडला' सरकार चालवण्याची संधी देणे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने त्यांच्याशी सहकार्य करणे हितकर आहे. त्याचप्रमाणे, 'मुस्लीम ब्रदरहूड'ने जहाल आणि स्त्री-विरोधी मतांचा त्याग करत, निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार, सर्वसमावेशक धोरणांचा पुरस्कार केला तरच त्यांना इजिप्तमधील क्रांतीच्या पिरॉमिडची रचना साध्य होऊ शकेल.
No comments:
Post a Comment