चीनमध्ये राजकीय नेतृत्व परिवर्तनाची प्रक्रिया नियमित आणि सुरळीत करण्याच्या साम्यवादी पक्षाच्या महत्वाकांक्षी योजनेत सतत व्यत्यय येत आहेत. चीनचे नवे मनोनीत अध्यक्ष, क्शी जीनपिंग, अचानक २ आठवड्यांसाठी सगळ्यांच्या नजरेआड झाल्याने पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांनी एकच खळबळ माजवली. २ सप्टेंबर ला 'भूमिगत' झालेले क्शी, काही घडलेच नसल्याच्या अविर्भावात १५ सप्टेंबरला पुन्हा अवतीर्ण झाले. मात्र, या दरम्यानच्या काळात, त्यांच्या असण्या-नसण्या विषयी शक्य ते सर्व तर्क-कुतर्क लावण्याची मोकळीक आणि त्यातून चीनच्या दुखत्या जखमेवर बोट ठेवण्याची संधी परकीय प्रसार माध्यमांना मिळाली. खरे तर, चीनचे विद्यमान उपाध्यक्ष असलेले क्शी २ आठवडे लोकांपुढे आले नसते तरी फारसे कुणाच्या ध्यानी सुद्धा आले नसते. पण या काळात त्यांनी ३ परदेशी नेत्यांसोबतच्या पूर्व नियोजित बैठका रद्द केल्यामुळे, पाश्चिमात्य जगाने त्यांच्या सार्वजनिक अनुपस्थितीची गंभीर दखल घेतली. सन २०१३ पासून १० वर्षे या व्यक्तीच्या हाती चीनची सत्ता सूत्रे राहणार असल्याने आता त्यांच्या प्रत्येक हालचालीवर आणि विधानावर विश्लेषकांची बारीक नजर आहे. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात पडद्यामागे काय घडामोडी घडल्यात हे निदान क्शी यांचा निर्धारित राजकीय कार्यकाळ संपेपर्यंत पडद्याआड राहण्याचीच जास्त शक्यता आहे. मात्र, चीनमधील सत्तांतराची प्रक्रिया अद्यापही विवादास्पद आहे हे या प्रकरणातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अशा विवादित प्रक्रियेदरम्यान अंतर्विरोधातून साम्यवादी पक्षाचा डोलारा कोसळू शकतो ही पाश्चिमात्यांची आशा मात्र केवळ भाबडेपणा आहे, हे सुद्धा तेवढेच खरे आहे.
चीनच्या साम्यवादी पक्षाच्या वाटेला जन्मापासूनच वैचारिक संघर्ष आणि त्यातून गटा-तटाच्या राजकारणाने ग्रासले आहे. क्रांती साठी संघर्षाच्या काळात आणि समाजवादी राज्य-व्यवस्थेची स्थापना केल्यापासून ते आज गायत, चीनच्या साम्यवादी पक्षात अनेक धोरणात्मक संघर्ष झालेत; ज्यांनी सांस्कृतिक क्रांतीच्या काळात हिंसक रूप सुद्धा धारण केले. मात्र पक्षाच्या अनेक धुरिणांनी राजकीय अत्याचाराच्या काळातही पक्ष न सोडता, पक्षांतर्गत संघर्ष जारी ठेवला होता. परिणामी, प्रत्येक वेळी साम्यवादी पक्ष वैचारिक संघर्षाच्या निखारयातून तावून-सलाखून बाहेर पडला; आणि चीन मधील समाजवादी राजवट कोसळेल असे भवितव्य वर्तवणाऱ्या पंडितांच्या आशेवर नेहमीच पाणी पडले. १९६०-७० च्या दशकात माओ च्या एककल्ली कारभाराला आव्हान देत हाल-अपेष्टा सहन करणारे डेंग क्शिओपिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सन १९७८ नंतर सत्तेत जम बसवल्यावर चीनमध्ये बहु-पक्षीय लोकशाहीला वाव मिळण्याची शक्यता निर्माण आली होती. मात्र, डेंग यांनी साम्यवादी पक्षाच्या लेनिनवादी पक्ष-प्रक्रियेला पुनश्च प्रस्थापित करत, बहुपक्षीय आणि सार्वत्रिक मतदानाच्या राजकीय व्यवस्थेच्या मागण्या धुडकावून लावल्यात. चीनच्या विकासासाठी साम्यवादी पक्षाचे एक छत्री राज्य आवश्यक असल्याचे त्यांनी जनमनावर ठसवले. आपल्या सिद्धांतावर कायम राहत त्यांनी, लोकशाहीच्या मागणीसाठी तियानमेन चौकात डोके वर काढत असलेले विद्यार्थांचे बंड चिरडून टाकले. मात्र, याच काळात डेंग यांनी साम्यवादी पक्षांतर्गत चर्चा, वाद-विवाद आणि नेतृत्व विकास या प्रक्रिया पद्धतशीर आणि चाकोरीबद्ध साच्यात सुरु करण्याची बीजे रोवलीत. डेंग यांना स्वत: आपल्या कार्यकाळात नेतृत्व परिवर्तनाच्या खाज-खळग्यातून मार्गक्रमण करावे लागले आणि आर्थिक सुधारणांचे समर्थक आणि साशंक यांच्या दरम्यान तारेची कसरत करावी लागली. परिणामी, डेंग यांना 'सर्वोच्च नेतेपद' प्राप्त झाले असतांनाही चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान यांच्या मानेवर कायम पदच्युत होण्याची टांगती तलवार असायची.
माओच्या निधनानंतर त्याने मनोनीत केलेल्या, पण फारशी नेतृत्व क्षमता नसलेल्या, हुआ गुओफेंगने सन १९७६ ते १९८१ असे चीनचे राष्ट्राध्यक्ष पद भूषवले. सन १९७८ नंतर सत्ता-सूत्रे डेंग च्या हाती असली, तरी माओ चा प्रतिनिधी आणि सर्व गटांमधील तडजोडीमुळे हुआ ला पदावर कायम राहता आले. पण पक्षात निर्णय मात्र बहुमताने होत असल्याने, या काळात खऱ्या अर्थाने चलती डेंग ची होती. सन १९८१ मध्ये डेंग ने पक्षांतर्गत संपूर्ण नियंत्रण मिळवल्यानंतर हुआ ला पायउतार व्हावे लागले आणि धडाडीने आर्थिक सुधारणा राबवणारे हू याओबांग राष्ट्राध्यक्ष झाले. हू च्या काळात, आर्थिक सुधारणांमुळे एकीकडे विषमता वाढीस लागली तर दुसरीकडे राजकीय स्वातंत्र्याचे वारे वाहू लागलेत. यामुळे निर्माण झालेल्या असंतोषामुळे साम्यवादी पक्षाला आव्हान मिळण्यास सुरुवात झाल्याने, सन १९८७ मध्ये पक्षातील 'कट्टरपंथीयांनी' हू ची उचलबांगडी केली आणि झायो झियांग सर्वसंमतीचे उमेदवार म्हणून राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले. मात्र, या बदलाने जमिनीवरील परिस्थितीत फार फरक न पडता नववर्गातील असंतोषाने 'तिआनमेनकडे' कूच केली. सन १९८९ मध्ये परिस्थिती हाताबाहेर गेल्याने झायो झियांग ला तत्काळ पदच्युत करण्यात आले आणि जियांग झेमिन यांची राष्ट्राध्यक्षपदी वर्णी लागली. या संपूर्ण काळात, डेंग ने 'मध्यवर्ती लष्कर समितीचे' प्रमुखपद स्वत:कडे राखून ठेवले आणि त्या माध्यमातून साम्यवादी पक्षावर आणि सरकारवर आपले प्रभुत्व कायम ठेवले.
'तियानमेन घटनेनंतर' डेंग-जियांग जोडीने, एकीकडे 'आर्थिक सुधारणांचे समर्थक पण बहु-पक्षीय लोकशाहीचे विरोधक' असलेल्यांना पक्ष आणि सरकारमध्ये वरचे स्थान देण्यास सुरुवात केली आणि दुसरीकडे नेतृत्व परिवर्तनाची काही मार्गदर्शक तत्वे बनवलीत. यात प्रामुख्याने समावेश होता: तुलनेत तरुण नेत्यांना संधी द्यायची; साधारण वयाच्या ७० व्या वर्षी त्यांना निवृत्त करायचे; पदाचा कार्यकाळ ५ वर्षांपुरता मर्यादित करायचा; मोठ्या पदावर दोन पेक्षा जास्त कार्यकाळ द्यायची नाहीत इत्यादी. डेंग-जिआंग यांच्या योजनेनुसार, राष्ट्राध्यक्ष, मध्यवर्ती लष्करी समितीचे प्रमुखपद आणि पक्षाचे महासचिव पद एकाच व्यक्तीकडे ठेवायचे असे अलिखितपणे ठरवण्यात आले. यानुसार, डेंग ने सन १९९२ पर्यंत मध्यवर्ती लष्करी समितीचे प्रमुखपद स्वत:कडे राखले आणि पक्षाच्या अधिवेशनात जिआंग च्या महासचिव पदावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर ते पद त्याच्या सुपूर्द केले. जिआंग ने राष्ट्राध्यक्षपद सोडल्यानंतर, २ वर्षे मध्यवर्ती लष्करी समितीचे प्रमुखपद आपल्याकडे ठेवले आणि सन २००४ मध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष हु जिंताव यांना हे पद मिळाले. सन २००२ मध्ये जिआंग झेमिन यांच्याकडून हु जिंताव यांच्याकडे झालेले सत्तार्पण, हे चीनच्या ५,००० हुन अधिक वर्षांच्या इतिहासातले पहिले सुनियोजित-शांततापूर्ण नेतृत्व परिवर्तन होते. हा अपवाद नसून, चीनचे राजकारण आता साम्यवादी पक्षाच्या प्रभुत्वात स्थिरावले आहे, हे जगापुढे ठसवण्यासाठी पुढील सत्तांतर तेवढ्याच सुबकपणे पार पाडण्याचे आव्हान सध्याच्या नेतृत्वापुढे उभे ठाकले आहे.
सन २००७ च्या १७ व्या पंचवार्षिक पक्ष अधिवेशनात क्शी जिनपिंग आणि ली केचीआंग यांचा पोलीट ब्युरोच्या ९-सदस्यीय स्थायी समितीमध्ये समावेश करत त्यांना सरकारमध्ये अनुक्रमे उप-राष्ट्राध्यक्षपद आणि उप-पंतप्रधानपद देण्यात आले. सन २०१२ च्या ऑक्टोबर मध्ये होऊ घातलेल्या पक्षाच्या १८ व्या अधिवेशनात क्शी पक्षाचे महासचिव होण्याचे आधीच निश्चित करण्यात आले आहे, आणि पुढील वर्षी मार्च मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय संसदेच्या अधिवेशनात क्शी राष्ट्राध्यक्षपदाची आणि ली पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. सध्याच्या ९-सदस्यीय स्थायी समितीतील हे दोघे वगळता इतर ७ नेते निवृत्त होणार आहेत आणि त्यांच्या जागी वर्णी लागण्यासाठी दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरु आहे. अशा क्षणी क्शी २ आठवडे 'नाहीसे' झाले होते आणि ऑक्टोबर मधील अधिवेशनाच्या तारखांची अधिकृत घोषणा सुद्धा अद्याप करण्यात आलेली नसल्याने या नेतृत्व बदलाबाबत अफवांना महापूर आला होता. क्शी यांनी आता स्वत:चे जनदर्शन घडवल्याने या अफवांना आहोटी लागली असली तरी शंकेची पाल अखेरपर्यंत मनात चुकचुकत राहणार हे नक्की!
No comments:
Post a Comment