Thursday, November 15, 2012

जुनी वाईन - नवी बाटली


चीनमधील नेतृत्व-बदलाची प्रदीर्घ प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. नोवेंबर ७ ते १४ या कालावधीत झालेल्या साम्यवादी पक्षाच्या १८ व्या पंचवार्षिक कॉंग्रेसमध्ये, २२६८ पक्ष-प्रतिनिधींनी ३७६ सदस्यांच्या केंद्रीय समितीची गुप्त मतदान पद्धतीने निवड केली आहे. चीनच्या अधिकृत वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नि:वर्तमान केंद्रीय समितीने शिफारस केलेल्या नव्या सदस्य सूचीतील ८% प्रतिनिधींना गुप्त-मतदान प्रक्रियेत बहुमत मिळवण्यात अपयश आले. मात्र, त्यांच्या ऐवजी निवड झालेल्या सदस्यांची शिफारस सुद्धा वरूनच करण्यात आली होती की काही पक्ष-प्रतिनिधींनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत केंद्रीय समितीत स्थान पटकावले, हे अद्याप कळालेले नाही. या नव-निर्वाचित केंद्रीय समितीने पोलीट-ब्युरो आणि पोलीट-ब्युरोच्या स्थायी समितीची निवड केली आहे. स्थायी समितीच्या ९ पैकी ७ सदस्यांना 'सक्तीची निवृत्ती' देण्यात आली आहे, यात विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान यांचाही समावेश आहे. तसेच, स्थायी समितीची सदस्य संख्या ९ वरून कमी करत ७ वर आणण्यात आली आहे. पोलीट-ब्युरोच्या एकूण २५ सदस्यांपैकी १० सदस्यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. नव्या केंद्रीय समितीने विद्यमान पोलीट ब्युरो स्थायी समितीचे सदस्य आणि उप-राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची साम्यवादी पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे.    

पक्षाच्या १८ व्या कॉंग्रेसमध्ये सहभागी एकूण पक्ष-प्रतिनिधींपैकी २३% महिला, तर ११% चीनमधील अल्पसंख्यांक समुदायाचे प्रतिनिधी होते. महत्वाचे म्हणजे, खाजगी क्षेत्रात व्यापारी-उद्योजक असलेल्या ३४ व्यक्तींची कॉंग्रेस मध्ये सहभागी होण्यासाठी निवड करण्यात आली होती. सन २००२ मध्ये, खाजगी क्षेत्रात कार्यरत मंडळींसाठी साम्यवादी पक्षाची दारे उघडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, त्या वर्षीच्या कॉंग्रेस मध्ये अशा ७ व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता, तर सन २००७ च्या १७ व्या कॉंग्रेस मध्ये १७ व्यापारी-उद्योजकांची वर्णी लागली होती. अर्थात, हे  आकडे फसवे आहेत कारण चीनमध्ये आर्थिक सुधारणा लागू करण्यात आल्यानंतर कित्येक पक्ष-कार्यकर्त्यांनी कुटुंबियांच्या नावे व्यापार-उद्योग सुरु करत सरकारी सवलती लाटल्या होत्या. या-पैकी अनेकजण कॉंग्रेस मध्ये पक्ष-प्रतिनिधी म्हणून सहभागी होत आले आहेत. पो क्षिलाई या अलीकडच्या काळात जनतेत लोकप्रिय ठरलेल्या, पण नंतर भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुंतलेल्या पोलीट-ब्युरो सदस्याची कॉंग्रेस सुरु होण्याआधीच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. पो क्षिलाई च्या पत्नीला एका ब्रिटीश व्यापाऱ्याची हत्या केल्याच्या आरोपावरून आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या पो क्षिलाई चे वडील सुद्धा साम्यवादी पक्षात उच्च-पदाधिकारी होते. त्याने माओ च्या विचारांचा प्राधान्याने प्रसार करणे सुरु केल्यापासून राजकीय निरीक्षकांच्या नजरा त्याचावर खिळल्या होत्या. मात्र, त्याची जाहीर लाजिरवाणी उचलबांगडी आणि बदनामीने एक गोष्ट सिद्ध झाली आहे, कि चीनचे विद्यमान आणि येऊ घातलेले नेतृत्व माओ च्या विचारांपेक्षा डेंग च्या विचारांना प्राधान्य देणारे आहे.

साम्यवादी चीनच्या स्थापनेनंतर पहिल्या पिढीच्या नेतृत्वावर माओ झेडॉंग चा वरचस्मा  होता. त्याचाच एकेकाळचा सहकारी पण वैचारिक मतभेदांमुळे दुरावला गेलेल्या डेंग क्षियोपिंगने दुसऱ्या पिढीला तारले होते. डेंग ने, सोविएत रशिया आणि दस्तरखुद्द चीन मध्ये त्याच्या डोळ्यांसमोर घडलेल्या सत्तासंघर्षातून धडा घेत, सत्तांतराची ढोबळ मार्गदर्शक तत्वे आखून दिली होती. साम्यवादी पक्षाच्या अमर्यादित सत्तेच्या निश्चितीसाठी सर्वोच्च स्थानी आरूढ नेत्यांचा कार्यकाळ मर्यादित करत सामुहिक नेतृत्वाची उभारणी करणे आवश्यक आहे, या निर्णयाप्रत डेंग पोचला होता. यानुसार, खऱ्या अर्थाने चीन मधील पहिला शांततापूर्ण नेतृत्वबदल सन २००२ मध्ये झाला होता, ज्यावेळी जियांग झेमिन ने सूत्रे हू  जिंताव या चौथ्या पिढीच्या नेत्याकडे सोपवली होती. डेंग च्या मार्गदर्शक तत्वानुसार, चीनच्या सर्वोच्च नेत्याकडे १० वर्षांच्या कालावधीसाठी ३ पदे सोपवण्यात येतात; पक्षाचे महा-सचिवपद, राष्ट्राध्यक्षपद आणि केंद्रीय लष्कर समितीचे अध्यक्षपद! या १० वर्षांपैकी ५ वर्षाचा कार्यकाळ झाल्यावर, त्याच्या उत्तराधिकारयाची नेमणूक करावयाची असते, जेणेकरून सत्तांतराची संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडावी आणि नव्या नेतृत्वाला अनुभवाचे भान यावे. यानुसार, सन २००७ मध्येच, साम्यवादी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्व-मंडळाने क्षी जिनपिंग यांची उप-राष्ट्राध्यक्षपदी नेमणूक करत, ते हू जिंताव यांचे उत्तराधिकारी असतील असे स्पष्ट संकेत दिले होते. आता सलग दुसऱ्यांदा नेतृत्वबदल पूर्वनिर्धारित  योजनेनुसार आणि शांततापूर्ण मार्गाने होत असल्याने, साम्यवादी शासन-पद्धतीला स्थैर्य प्राप्त झाल्याचे जगावर ठसवण्याचा चीन चा प्रयत्न असणार आहे. मात्र, क्षी जिनपिंगच्या नेतृत्वातील पाचव्या पिढीमध्ये, पहिल्या पिढीच्या क्रांतीकारी नेत्यांच्या वारसदारांनी मोठ्या प्रमाणात वर्णी लावल्यामुळे, साम्यवादी पक्षाच्या वटवृक्षाखाली चीनची वाटचाल सामुहिक घराणेशाहीच्या दिशेने होण्यास सुरुवात झाली आहे, असे टीकाकारांचे मत आहे. नव्या केंद्रीय समितीने निवडलेल्या ७ पोलीट-ब्युरो स्थायी सदस्यांपैकी ४ नेते राजकीय दृष्ट्या प्रभावशाली कुटुंबातून येतात. खुद्द, ५९-वर्षीय नवे सरचिटणीस क्षी जिनपिंग, यांच्या वडिलांनी डेंग च्या मार्गदर्शनाखाली आर्थिक सुधारणा राबवण्याचे बिकट काम कौशल्याने केले होते. 

नव्या स्थायी समितीवर माजी राष्ट्राध्यक्ष जिआंग झेमिन आणि नि:वर्तमान राष्ट्राध्यक्ष हू जिंताव यांचे वर्चस्व कायम आहे. मार्च २०१३ मध्ये ज्यांची पंतप्रधानपदी वर्णी लागणार आहे ते ली केकीयांग हे, हू जिंताव यांना जवळचे आहेत, तर इतर ३ सदस्य जिआंग यांच्याशी असलेल्या 'जवळकी' मुळे पुढे आले आहेत. ५७-वर्षीय ली केकीयांग नव्या स्थायी समितीतील सर्वात तरुण सदस्य आहेत. क्षी आणि ली वगळता इतर ५ सदस्य वयाच्या 'मध्य-साठी' मध्ये असल्याने त्यांचा कार्यकाळ पुढील ५ वर्षांपुरता मर्यादित असणार हे सुद्धा आता स्पष्ट झाले आहे. याचाच अर्थ, ५ वर्षानंतर क्षी आणि ली या जोडीला कोणी आव्हान देणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. नव्या नेतृत्व गटाची निवड करतांना, ज्या प्रमाणे पो क्षिलाई सारख्या 'माओवादी' म्हणवून घेणारया नेत्याला संपूर्ण बाजूस सारण्यात आले, त्याच प्रमाणे वांक यांक सारख्या आर्थिक सुधारणांसह राजकीय सुधारणा राबवण्यास उत्सुक नेत्यांना पदोन्नती देण्याचे टाळण्यात आले आहे. म्हणजेच, नव्या नेतृत्वाच्या कार्यकाळात आर्थिक सुधारणा सुरूच राहतील, पण राजकीय सुधारणांबाबत 'नरो वा कुंजरोवा' अशी भूमिका घेण्यात आली आहे. 

राजकीय सुधारणा राबवल्यास, आर्थिक सुधारणांचा फटका बसलेल्या कामगारांना आणि विस्थापित झालेल्या शेत-मजुरांना त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी व्यासपीठ मिळू शकते आणि त्यामुळे आर्थिक सुधारणांना खिळ बसू शकते ही भीती चिनी राज्यकर्त्यांच्या मनात आहे. आर्थिक सुधारणांमुळे चीन मधील सार्वत्रिक गरिबी लक्षणीय प्रमाणात कमी होऊन साम्यवादी पक्षाच्या समर्थनात वाढ झाली हे सत्य असले तरी, दुसरीकडे या सुधारणांमुळे बेरोजगारी, रोजगार गमावण्याचे भय आणि आर्थिक विषमता प्रचंड प्रमाणात वाढली हे सुद्धा तथ्य आहे. आर्थिक सुधारणांना लगाम लावल्यास निम्न:मध्यम वर्गीय, मध्यम वर्गीय आणि नव्याने श्रीमंत झालेल्या गटांचे समर्थन गमवावे लागेल, तसेच चीनच्या जागतिक अर्थसत्ता होण्याच्या महत्वकांक्षेवर पाणी फेरले जाईल असे साम्यवादी पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे. मात्र त्याच वेळी, गरीब, विस्थापित आणि कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्या रोषामुळे उत्पन्न होणाऱ्या सामाजिक अशांतीची झळ साम्यवादी पक्षास लागणार याची जाणीव सुद्धा साम्यवादी नेतृत्वाला आहे. यामध्ये संतुलन साधण्यासाठी, एकीकडे, सुधारणा धार्जीण्यांना खुश करण्याकरता भ्रष्टाचार चीन चा प्रमुख शत्रू असल्याची ग्वाही देत त्याविरुद्ध एल्गार पुकारण्याची भाषा वापरण्यात येत आहे, आणि दुसरीकडे, असंतुलीत विकासाला नियंत्रित करण्यासाठी धोरण-निर्मितीत जनतेच्या सहभागाला महत्व देण्याचे ठरवण्यात आले आहे. यासाठी, हू  जिंताव यांच्या 'विकासाचा वैज्ञानिक दृष्टीकोन' या तथाकथित सिद्धांताला, पक्ष-घटनेत समाविष्ट करून घेत मार्क्शिस्म-लेनिनिस्म, माओ चे विचार, डेंग क्षियोपिंग चे सिद्धांत आणि जिआंग झेमिन यांचा 'तीन प्रतीनिधीत्वाचा' सिद्धांत यांच्या पंगतीत बसवण्यात आले आहे. 'विकासाचा वैज्ञानिक दृष्टीकोन' या  सिद्धांतानुसार, लोकांमधील आर्थिक विषमता, शहरी-ग्रामीण भांगातील दरी आणि देशाच्या पूर्व-पश्चिम प्रदेशांतील विकास-असंतुलन या मुद्द्यांकडे साम्यवादी पक्षाला तत्काळ लक्ष देणे आवश्यक आहे. चीनमधील वास्तविक समस्यांची साम्यवादी नेतृत्वाला जाणीव आहे, ही १८ व्या कॉंग्रेसची जमेची बाजू म्हणता येईल. मात्र, या समस्या 'साम्यवादी पक्षाच्या' एककल्ली दृष्टीकोनातून सुटतील हा भाबडा आशावाद सुद्धा या कॉंग्रेस च्या निमित्त्याने पुन्हा स्पष्ट झाला आहे. वास्तविकता आणि आशावाद यांची सांगड घालण्याचे महत्कार्य नव्या नेतृत्वाला करायचे आहे. या कसौटीत, क्षी आणि ली यांची जोडी कितपत खरी उतरते यावर चीनच्या साम्यवादी पक्षाचे, चीनचे आणि जागतिक अर्थव्यवस्थेचे भवितव्य अवलंबून आहे.                        

No comments:

Post a Comment