मागील वर्षी, मे महिन्यात, अमेरिकेने शिताफीने ओसामा बिन लादेनचा काटा काढल्यानंतर सामोरे आलेले अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. अब्बोताबाद इथे लादेनला शरण देण्याच्या कारस्थानात पाकिस्तानी व्यवस्थेतील किती पदाधिकारी सहभागी होते? याबाबत चौकशीचे पुढे काय झाले? लादेन ६ वर्षे पाकिस्तानी लष्कराच्या नाकावर टिच्चून लष्करी छावणीच्या शहरांत वास्तव्यास होता ही पाकिस्तानसाठी लाजिरवाणी बाब आहे; की अमेरिकेने बेधडकपणे पाकिस्तानचे सार्वभौमित्व भंग करत लादेनला ठार केले आणि पाकिस्तानचे लष्कर काहीही करू शकले नाही ही त्यांच्यासाठी अपमानास्पद बाब आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळायची आहेत. या प्रकरणाचा न्यायिक तपास करण्यासाठी पाकिस्तान सरकारने गठित केलेल्या अब्बोताबाद कमिशनने आतापर्यंत १२० प्रत्यक्षदर्शी, नागरी आणि लष्करी अधिकारी, तसेच ओसामाच्या ३ पत्नींची चौकशी केली आहे. मात्र, तपासाची अंतिम तारीख निर्धारित करण्यात आलेली नसल्याने अद्याप हे कमिशन कोणत्याही निष्कर्षाप्रत आलेले नाही. पाकिस्तानमध्ये सोयीस्करपणे या मुद्द्यांवर चर्चा टाळण्यात येत असली, तरी लादेनच्या हत्येला एक वर्षे पूर्ण होण्याच्या आत त्याच्या ६ वर्षाच्या तिथल्या अस्तित्वाच्या खाणा-खुणा मिटवण्याचे शक्यतो सगळे प्रयत्न पाकिस्तानच्या प्रशासनाने केले आहेत. लादेनच्या बायका-मुलांना सौदी अरेबियाला पाठवून देण्यात आले, तसेच अब्बोताबाद इथले 'लादेन-गृह' जमीनदोस्त करण्यात आले. पण लादेनचा खरा वारसा, म्हणजेच सशस्त्र जिहादची शिकवण, याला कितपत मिटवण्यात आले आहे हे सर्वाधिक महत्वाचे आहे.
लादेन-हत्येनंतर काही विश्लेषकांचे मत होते की, तथाकथित अज्ञातवासामुळे ओसामाचे अस्तित्व अल-कायदासाठी निरर्थक झाले होते. अमेरिकेने सुद्धा वेळोवेळी अल-कायदाचे कंबरडे मोडण्यात आल्याचे दावे केले होते. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या अब्बोताबाद धाडीमध्ये हस्तगत करण्यात आलेले अल-कायदाचे अनेक कागदी आणि डिजिटल दस्तावेज हे प्रत्यक्ष लादेन मिळण्याएवढेच महत्वाचे होते. या हजारो पानांपैकी १७५ पानांचे एकूण १७ दस्तावेज अलीकडे अमेरिकेच्या वेस्ट पौइंट मिलिटरी अकॅडेमीच्या दहशतवाद-विरोधी केंद्राने प्रसिद्ध केले. या प्राथमिक पुराव्यांवरून प्रथमदर्शी असा निष्कर्ष निघतो की, अखेरच्या ५ वर्षांमध्ये ओसामा, अल-कायदा आणि सलग्न इस्लामिक संघटनांवर प्रभाव कायम ठेवण्यासाठी धडपडत होता. या काळात, अमेरिकेमध्ये कशा प्रकारे हल्ले करता येतील याच्या अनेक योजनांवर ओसामा विचार करत होता, मात्र ९/११ नंतर अल-कायदाचे जाळे विस्कळीत झाल्याने अंमलबजावणी करण्याचे मार्ग त्याला सापडत नव्हते. ९/११ च्या अतिरेकी हल्ल्यानंतर जिहादी संघटनांनी अमेरिकेला लक्ष्य न करता, इतर छोट्या-मोठ्या देशांमध्ये कारवाया करण्याचे धोरण अमंलात आणले होते. ओसामाला हे मान्य नव्हते. अमेरिका शत्रू क्र. १ असून सगळी शक्ती त्याच्याविरुद्ध
एकवटली पाहिजे हे आपल्या साथीदारांवर बिंबवण्याचा प्रयत्न ओसामा करत होता. जिहादी हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लीम जनता मारली जात असल्याने, उदाहरणार्थ पाकिस्तान आणि इराक मधील अतिरेक्यांचे बॉम्ब हल्ले, मुस्लिमांना अल-कायदा विषयी सहानुभूती उरलेली नाही हे ओसामाने ताडले होते. त्यामुळे, सामान्य मुस्लीम मनाला आवाहन करण्यासाठी जिहादी धोरणाला वैचारिक चौकट देण्याचे प्रयत्न ओसामाने चालवले होते. मुस्लीम समाजाची सहानुभूती जिंकण्यासाठी अल-कायदाचे नामांतर करण्याचा ओसामाचा विचार होता. पण याचा अर्थ हा नाही की ओसामाला हिंसक अतिरेकी संघटनेचे रुपांतर लोकप्रिय आंदोलनात करायचे होते.
९/११ नंतर अल-कायदाचा विस्तार झाला नसला तरी, अनेक भागातील कट्टर इस्लामिक गटांनी अल-कायदाशी व्यवस्थित संधान बांधले होते. त्यांची कार्यप्रणाली आणि उद्दिष्ट अल-कायदापेक्षा फार वेगळे नाहीत. तहेरिक-ए-तालिबान ऑफ पाकिस्तान, तालिबान ऑफ अफगाणिस्तान, हक्कानी नेटवर्क ऑफ अफगाणिस्तान, लष्कर-ए-तोईबा, लष्कर-ए-झान्गवी ऑफ पाकिस्तान, येमेन मधील अल-कायदा इन अरेबियन पेनिन्सुला, अल्जेरिया आणि माली मधील अल-कायदा इन इस्लामिक माघ्रेब, सोमालियातील अल-शबाब आणि नाइजेरियातील बोको-हरम या अल-कायदाचा प्रभाव असलेल्या आणि अल-कायदाच्या मदतीने उभ्या ठाकलेल्या इस्लामिक कट्टरपंथी संघटना आहेत. ओसामा या संघटनांबाबत साशंक होता असे नवे दस्तावेज सूचित करतात. हे गट स्थानिक यशामुळे होरपळून जाऊन शत्रू क्र. १, म्हणजे अमेरिकेविरुद्ध, कारवाई करण्यात कुचराई करतील अशी ओसामाची रास्त भीती होती. असे दिसते की मागील दोन वर्षांमध्ये अमेरिकेला तालिबानमध्ये फुट पाडण्यात जे आंशिक यश मिळाले आहे त्याची खबरबात ओसामाला होती. वरील इस्लामिक संघटनांबाबत ओसामा आशावादी नव्हता, पण त्यांचे अस्तित्व ओसामाच्या नेतृत्वात अल-कायदाला मिळालेले यश दर्शविते. अल-कायदाचा अर्थ होतो 'पाया', द बेस. इस्लामिक जगताच्या स्थापनेसाठी विविध संघटनांना वेगवेगळे स्त्रोत पुरवणे हे अल-कायदाचे मूळ उद्दिष्ट आहे, आणि मागील दशकभरात अल-कायदाचा हेतू बऱ्याच प्रमाणात साध्य झाला आहे. परिणामी, मुख्यत: अफगाणिस्तानातून अल-कायदाचा नायनाट करण्यासाठी सुरु करण्यात आलेले 'आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरुद्धचे युद्ध', आता पाकिस्तानचे सीमावर्ती भाग, सोमालिया, येमेन, आणि काही प्रमाणात माली आणि अल्जेरिया या देशांमध्ये पसरत आहे.
ओसामाच्या ताब्यातील दस्तावेजांची उकल होण्याआधी असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता की सन २०१० पासून उदयास आलेल्या 'अरब स्प्रिंग' आंदोलनामुळे अल-कायदा सारख्या अती-जहाल इस्लामिक संघटनांचा पाया कमकुवत होईल. अरब देशातील तेलाच्या मोहामुळे अमेरिकेने तिथल्या जुलमी राजवटींना नेहमी शह दिला. परिणामी लोकशाहीच्या माध्यमातून लोकांची गाऱ्हाणी कधी पुढे आली नाहीत आणि लोकांच्या असंतोषाचा फायदा अल-कायदा सारख्या जहाल संघटनांनी घेतला. 'अरब स्प्रिंग' च्या जन-उठावांनी अरब आणि इतर देशातील मुस्लीम युवकांमध्ये लोकशाही प्रती असलेली ओढ ठळकपणे दिसून आली. महत्वाचे म्हणजे, लोकांच्या एकजुटीने, आपल्या देशातील राज्यकर्त्यांना
पाय-उतार होण्यास भाग पाडले जाऊ शकते याचा अनुभव इस्लामिक देशांनी घेतला. मात्र. ओसामा सुद्धा या क्रांत्यांबाबत आशावादी असल्याचे, जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांतून, स्पष्ट होते आहे. आपल्या मृत्युच्या एक आठवडा आधी लिहिलेल्या एका पत्रात ओसामाने म्हटले होते, " होस्नी मुबारक आणि झेन अल-बेदिन बेन अली यांच्या सारखी इतर राज्यकर्त्यांची
गत होणे अटळ आहे. आपण जर मुस्लीम समाजाला अर्धवट उपायांविरुद्ध सुनियोजितपणे शिक्षित केले तर यानंतर त्या देशांमध्ये खऱ्या अर्थाने इस्लामचा विजय होणे अशक्य नाही." इजिप्त आणि ट्युनिशियामध्ये सार्वत्रिक निवडणुकांमध्ये इस्लामिक पक्षांना लक्षणीय यश मिळाले आहे. या पक्षांचा आणि अल-कायदाचा प्रत्यक्ष संबंध नसला तरी त्यांच्या यशाने अल-कायदाला नव्या संधींचा वास येतो आहे. 'अरब स्प्रिंग' मुळे ओसामाच्या जिहादी दु:स्वप्नांना तिलांजली मिळाली की अल-कायदाला राजकीय पाठबळ मिळाले या बद्दल राजकीय विश्लेषक संभ्रमात आहेत. मात्र, एक गोष्ट स्पष्ट आहे की, या पूर्वी, अमेरिकेने ओसामाचा भस्मासुर उभा केला होता. आज परत अमेरिका आणि अल-कायदा 'अरब स्प्रिंग' च्या मुद्द्यावर एकाच बाजूला आहेत. 'अरब स्प्रिंग' च्या आंदोलनांतून ओसामा बिन लादेनचा राजकीय वारसा मजबूत होतो की लोकशाहीची पाळे-मुळे खोलवर जाऊन इस्लामिक जिहादच्या ओसामी योजनांना मुठ-माती मिळते हे येणारा काळच ठरवेल. सध्या तरी, ओसामाच्या दस्तावेजातून त्याच्या रहस्यमयी कुट-कारस्थानांबद्दल
कितपत माहिती प्रसिद्धीस येते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment