भारतीय संस्कृतीची चीनी दूत आणि विख्यात
नर्तिका चांग जुन चे जानेवारीच्या
पहिल्या आठवड्यात बिजींग इथे निधन झाले. आपल्या ५ दशकांच्या कारकिर्दीत चांग
ने शेकडो चीनी तरुण-तरुणींना भारतीय संस्कृतीचे धडे दिले आणि शास्त्रीय नृत्याचे
वेड लावले. तिच्या संघर्षमय पण यशस्वी भारत-प्रेमाची गोष्ट सामान्य भारतीयांपर्यंत
कधी पोचलीच नाही, तसेच तिच्या मृत्यूची बातमीही प्रसारमाध्यमांकडून दुर्लक्षिली गेली. चांग
ने चिकाटीने आणि
प्रसिद्धीच्या मागे न लागता भरतनाट्यम, कथक
आणि ओडिसी या
नृत्य प्रकारांना पूर्व आशियातील कला प्रेमींपर्यंत अव्याहतपणे पोचवले. सन १९५४
मध्ये वयाच्या एकोणीसाव्या वर्षी चांग पहिल्यांदा भारत भेटीला
आली. त्या काळी, म्हणजे १९५० च्या दशकाच्या
पूर्वार्धात, शहरी चीनवर सोविएत कलेचा मोठा प्रभाव होता.
१९४९ मध्ये माओने चीनमध्ये समाजवादी गणतंत्राची स्थापना केल्यावर सोविएत संघाकडून
चीनला आर्थिक आणि तांत्रिक मदतीचा
ओघ येत होता. साहजिकच या काळात सोविएत साहित्य आणि कलेचा पगडा चीनी तरुणांवर अधिक
होता. चांग सुद्धा शांघाई शहरात सोविएत
नृत्याविष्कार "बैलेट" ची एक महत्वाकांक्षी विद्यार्थिनी होती. हा काळ
भारत-चीन दरम्यानच्या मैत्रीचा सुद्धा होता. चीनचे तत्कालीन पंतप्रधान चाऊ-एन-लाई
यांनी चांगला भारतीय संस्कृती आणि नृत्य यांचे शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले.
नव्याने स्थापित झालेल्या आशियातील दोन मोठ्या गणतंत्रांमध्ये साहित्य आणि कलेची
देवाणघेवाण व्ह्यावी असा चाऊ यांचा उदात्त हेतू होता. या साठी चाऊ यांनी चीनच्या
प्रतिभाशाली तरुणांचा एक गट निवडला आणि
आशियातील नृत्य प्रकारांवर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रम तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर
टाकली. सोविएत बैलेट ची आवड असल्याने चांग भारतात यायला फारशी इच्छुक नव्हती.
मात्र पहिल्याच भारत भेटीनंतर चांग
चे संपूर्ण मत परिवर्तन झाले. तिला तिच्या जीवनाचे उद्दिष्ट मिळाले. चांग ने
भारतात आल्यावर भारतीय नृत्य परंपरेचे आधुनिक गुरु मानले जाणारे श्री उदय शंकर
यांची भेट घेतली आणि अनेक शास्त्रीय नृत्यशाळांना भेट दिली. चीनमध्ये परत गेल्यावर
ती चाऊ एन लाई च्या आशिया मैत्री प्रकल्पाची महत्वपूर्ण भाग बनली. १९५५ मध्ये
झालेल्या विकसनशील देशांच्या ऐतिहासिक
बांडुंग परिषदेनंतर चाऊ एन लाई च्या प्रकल्पाला आणखीच गती आली आणि चांग च्या
पुढाकाराने चीन मध्ये १९६१ साली 'ओरिएन्टल
संगीत आणि नृत्य गटाची' स्थापना
करण्यात आली. हा गट अजूनही चीन आणि दक्षिण-पूर्व आशियातील अनेक देशांमध्ये जाऊन
भारतीय नृत्य कलेसह आशियातील इतर संगीत आणि नृत्यांवर आधारीत कार्यक्रम करत असतो. आधुनिक
यंत्र-तंत्रांचा चपखल उपयोग करत चांग ने
संपूर्ण नृत्य गटाला भारतीय शास्त्रीय नृत्यात नैपुण्य मिळवून दिले.
नेमके या नंतरच, म्हणजे सन १९६२
मध्ये झालेल्या भारत-चीन
युद्धामुळे दोन्ही देशातील संबंध रसातळाला गेले आणि चांगच्या भारतीय
संस्कृतीप्रसाराच्या मौल्यवान कार्याची महती भारतीयांपर्यंत पोहोचू शकली नाही. चांग
ने मात्र शक्य असेल तेव्हा भारतात येऊन नृत्यकलेचे शिक्षण घेणे सुरूच ठेवले. चांग
एकूण ८ वेळा भारतात येऊन गेली. बिरजू महाराजांकडून तिने पुढील नृत्यशिक्षण घेतले
आणि चेन्नई च्या कलाक्षेत्र या संस्थेत काही काळ घालवला.
चीन मधील सांस्कृतिक क्रांतीच्या काळात मात्र चांग
चे अतोनात हाल झाले. माओने सन १९६६
मध्ये केलेल्या सांस्कृतिक क्रांतीच्या घोषणेने पुढील एक दशक चीन मध्ये अनागोंदी
माजली होती. शास्त्रीय नृत्य आणि संगीत कलांना बुर्ज्वा ठरवण्यात येऊन त्यावर
अनधिकृत बंदीच आली. यामुळे चांग चे स्वत:चे शिक्षण
आणि ती इतरांना देत असलेल्या प्रशिक्षणाला केवळ खीळच
बसली नाही तर तिला आणि तिच्या पतीला शारीरिक परिश्रमांची शिक्षा ठोठावण्यात येऊन
त्यांची रवानगी दूरच्या ग्रामीण भागात करण्यात आली. या सुमारास चांग च्या एकमेव
पुत्राचा जन्म झाला. मात्र आई आणि मुलाला पहिले ७ वर्षे एकमेकांपासून दूर ठेवण्यात आले. चांग ला
क्वचितच मुलाला बघायला बीजिंगला जाण्याची परवानगी मिळत असे. या घटनेचा तिच्या मनावर खोलवर परिणाम होऊन
तिने आपल्या मुलाला आयुष्यात कधीही कोणतीही कला न शिकण्याचा कळवळीचा सल्ला दिला.
१९८० च्या दशकात डेंग च्या नेतृत्वात चीनमध्ये
मुक्त अर्थव्यवस्थेचे वारे वाहू लागले आणि चांग ने पुन्हा एकदा शास्त्रीय नृत्य
शिक्षण आणि प्रसाराचे आपले कार्य सुरु केले. चांग ला जशी सांस्कृतिक क्रांतीची झळ
पोचली होती तसाच छळ डेंग चा सुद्धा झाला होता. त्यामुळे सांस्कृतिक क्रांती
दरम्यान त्रास सोसलेल्या प्रतिभावंतांना डेंग राजवटीने उचलून धरले आणि मोठ्या
प्रमाणात राजाश्रय दिला. चीन ला भेट देणाऱ्या परदेशी पाहुण्यांपुढे सांस्कृतिक
कार्यक्रम सादर करण्याचे काम ओघाने चांग कडे आले. सन १९८८
मध्ये राजीव गांधी तसेच सन १९९२ मध्ये भारताचे तत्कालीन
राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांच्या चीन भेटीदरम्यान तिने भारतीय शास्त्रीय नृत्य कलेचे प्रदर्शन केले. चांग ने म्यानमार, कंबोडिया आणि विएतनाम च्या
नृत्यप्रकारांमध्येसुद्धा नैपुण्य प्राप्त केले. मात्र भारतीय शास्त्रीय नृत्य
प्रकार तिला सर्वात जवळचे होते. चीनी तरुणांच्या दोन पिढ्यांना तिने भरतनाट्यम, कथ्थक आणि ओडिसी चे प्रशिक्षण दिले. तिच्या प्रेरणेने तिच्या काही
विद्यार्थ्यांनी शास्त्रीय नृत्यप्रकारच्या स्वत:च्या शाळा काढल्या आहेत. ती भारत
आणि चीन मधील एक सांस्कृतिक दुवा बनून गेली.
सन १९९६ मध्ये चांग ला स्तनाचा
कर्करोग झाला आणि पुन्हा एकदा तिला नृत्य कलेपासून दूर होणे भाग पडले. कर्करोगाचा
यशस्वी मुकाबला केल्यानंतर थकलेल्या शरीरानेच तीने परत नृत्यकलेची साधना सुरु
केली. आपल्या बिजींगस्थित छोट्याशा घरातून तिने नृत्य प्रशिक्षण देणे सुरु केले.
मात्र सन २००६ मध्ये तिचा आजार परत उफाळून आल्याने चांग ने अखेर नृत्यकलेच्या
प्रसाराला विराम दिला आणि सन २०१२ च्या
सुरुवातीलाच वयाच्या ७९ व्या वर्षी या
जगाचा निरोप घेतला.
अशा या भारतीय नृत्यकलेच्या प्रसारासाठी आयुष्य
वेचणाऱ्या चांग जुन च्या कार्याचा यथोचित गौरव होणे आवश्यक आहे. भारत सरकारने
तिच्या कार्याची दखल घेऊन तिचा मरणोत्तर
सत्कार करणे अपेक्षित आहे. भारत आणि चीन या दोन
ऐतिहासिक संस्कृतींना जोडणारे फार कमी सेतू आहेत. चीन मध्ये रबिन्द्रनाथ टागोर आणि
डॉ. कोटणीस यांचे नाव आजही सन्मानाने घेतले जाते. चांग सुद्धा टागोर आणि कोटणीस
यांच्या भारत-चीन संबंध समृद्ध करणाऱ्या परंपरेतील एक महत्वाची कडी आहे. चीन सरकार
ज्या प्रमाणे भारत-चीन संबंध मजबूत करण्यात जे भारतीय उल्लेखनीय भूमिका बजावतात
त्यांचा वेळोवेळी जाहीर सत्कार करते, त्याचप्रमाणे भारताने
सुद्धा चांग जुन च्या नावाने भारताचे मित्र असणाऱ्या
चीनी नागरिकांसाठी पुरस्काराची स्थापना केल्यास ते यथोचित ठरेल आणि तीच
चांगला खरी श्रद्धांजली ठरेल.
No comments:
Post a Comment