स्विस बँक म्हटले की कमालीची
गुप्तता आणि जगभरातील अति-धनाढ्य मंडळींची काळा-पांढरा पैसा जमा ठेवण्याची जागा अश्या कल्पना लगेच डोक्यात येतात. बॉन्ड-पटातील नायक सुद्धा कधी कधी जागतिक
गुन्हेगारी टोळीचा छडा लावण्यासाठी स्विस बँकेच्या दारी येतो असे चित्रवण्यात येते किव्हा 'दा विन्ची कोड' या गाजलेल्या सिनेमातील रहस्याचा पर्दाफाश पैरिस मधील स्विस बँकेच्या यांत्रिक सेफ्टी डिपोझिट उघडल्यानंतर होतो असे दाखवण्यात आले आहे. यामुळे बँकेभोवतीचे रहस्यमय वलय अधिकच वाढले आहे. जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीतले सर्वाधिक बहुमताचे राजीव
गांधी यांचे सरकार सन १९८९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभूत होण्याला 'बोफोर्स लाचेतून कमावलेला सत्ताधिशांचा पैसा स्विस बँकेत जमा आहे' हा प्रचार मोठ्या प्रमाणात कारणीभूत
होता, तर अलीकडच्या काळातील भ्रष्टाचार विरोधी आंदोलनांतील अग्रक्रमातील
मागणी आहे की भारतीयांचा स्विस बँकेत जमा असलेला काळा पैसा परत आणून राष्ट्रीय विकास कामात
वापरण्यात यावा. शेजारच्या पाकिस्तानात देखील सर्वोच्च न्यायालय आणि सरकार
यांच्यातील वादाचा मुख्य आणि गंभीर मुद्दा आहे की राष्ट्राध्यक्ष झरदारी यांच्या स्विस बँकेतील खात्यांची माहिती जाहीर करण्याची
विनंती करणारे विनंतीपत्र पंतप्रधान गिलानी यांनी स्विस अधिकाऱ्यांना लिहावे की नाही. साहित्य, चित्रपट, राजकारण अशा सगळ्या क्षेत्रात
वारंवार उल्लेखली जाणारी स्विस बँक आहे तरी काय?
स्विस बँक ही एकच बँक नसून अंदाजे
४०० बँकांचे जाळे आहे. यापैकी युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंड आणि क्रेडीट सुसे ग्रुप
या दोन सगळ्यात मोठ्या बँक 'बिग२' नावाने ओळखल्या जातात आणि स्वित्झर्लंडच्या ५०% बँक क्षेत्रावर
त्यांचा ताबा आहे. ग्राहक आपल्या गरजेनुसार योग्य त्या बँकेत खाते उघडू
शकतात. केवळ भ्रष्टाचारी आणि गुन्हेगार यांची स्विस बँकांमध्ये खाती असतात हा चुकीचा समज आहे. अनेक सामान्य
स्विस नागरिक तसेच दुसऱ्या देशातील नागरिकांची या बँकांमध्ये खाती आहेत. अनेक
स्विस बँकांमध्ये e-मेल द्वारे (पूर्वी फैक्स) खाते उघडता येते आणि या साठी अनेक एजन्सी मदतीस तत्पर असतात. इतर देशांमध्ये बँकेत खाते उघडण्यासाठी ज्या आवश्यकता पूर्ण
कराव्या लागतात त्या सगळ्या स्विस बँकेतील खात्यांसाठी सुद्धा पूर्ण कराव्या
लागतात.
'करंट', 'सैलरी' आणि 'सेविंग्स' खात्यांव्यतिरीक्त 'नम्बर्द' (numbered) खाती, ज्या मध्ये ग्राहकाचे नाव कुठेही नमूद केलेले नसते, म्हणजेच गोपनीय खाती, ही स्विस बँकांची विशेषता आहे. गोपनीय खाते उघडण्यासाठी ग्राहकाला
बँकेला भेट देणे आणि $ १,००,००० एवढी किमान रक्कम जमा करणे
आवश्यक असते. एक सोन्याची चावी आणि १० अंकी क्रमांक, जो फक्त ग्राहकाला माहिती असतो, या द्वारे हे खाते चालवले जाते. असे
असले तरी बँकेच्या सर्वोच्च पातळीवर प्रत्येक क्रमांक कोणत्या ग्राहकाच्या नावावर
आहे हे नमूद केलेले असते. मात्र, स्विस कायद्यानुसार या संबंधातली माहिती स्विस न्यायालयाच्या
निर्देशाशिवाय जाहीर करणे दंडनीय गुन्हा आहे. एक डॉक्टर आणि रुग्ण, किव्हा एक वकील आणि वादी/प्रतिवादी यांच्या दरम्यान गोपनीयता राखण्याचे जे नैतिक मूल्य आहे, त्याच प्रमाणे स्विस बँकांमध्ये ग्राहक आणि बँक
यांच्या दरम्यानच्या व्यवहारांची गोपनीयता बाळगली जाते. परदेशी नागरिकांच्या बँक खात्यांबद्दल माहिती हस्तांतरीत करण्याचे निर्देश देण्याचे
न्यायालयीन मापदंड निश्चित करण्यात आले आहेत. ग्राहकावर गुन्हेगारी स्वरूपाचा खटला
दाखल असेल (दिवाणी नाही), ग्राहकावरील गुन्हा स्विस कायद्यानुसार आणि ग्राहकाच्या देशातील
कायद्यानुसार - असा दोन्ही देशातील कायद्यानुसार- दंडनीय असेल, आणि जाहीर केलेली माहिती फक्त त्या
विशिष्ट खटल्यासाठी वापरण्यात येणार असेल तर स्विस न्यायालय त्या खात्यासंदर्भातील
माहिती संबंधित देशाच्या शोध यंत्रणेला पुरवण्याचे निर्देश देऊ शकते. या साठी त्या
देशाचा स्वित्झर्लंड सरकारशी या संदर्भात द्विपक्षीय करार असणे गरजेचे आहे. गोपनीय खाती १० वर्षेपर्यंत वापरली न गेल्यास, त्या खातेधारकाला शोधून काढणे
बँकेवर बंधनकारक आहे. खातेधारक मृत झाला असेल आणि त्याने खाते उघडतांना वारस नेमला नसेल तर तो पैसा बँकेकडे निपचित (dormant) अवस्थेत पडून
राहतो. स्विस बँकेत कुठल्याही देशाच्या चलनात व्यवहार करता येतो. मात्र, स्विस चलनात व्यवहार केल्यास व्याजावर विशिष्ट कर आकाराला जातो. त्यामुळे, बहुतांश परदेशी ग्राहक अमेरिकी डॉलर, ब्रिटीश पौन्ड्स किव्हा युरो
मध्ये व्यवहार करणे पसंद करतात. हा परकीय चलनातला पैसा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत
गुंतवून नफा कमावला जातो. स्विस बँकांच्या गोपनियतेचा फायदा साहजिकच भ्रष्टाचारी, गुन्हेगार आणि काळाबाजार करणारे
घेतात. त्या शिवाय, अनेक ग्राहक असे असतात ज्यांना काही न काही कारणांनी आपली सगळी संपत्ती जाहीर करायची नसते.
उदाहरणार्थ - प्रसारमाध्यमांचे मालक/संपादक यांच्यावर त्यांच्या व्यवसायात बदनामीचा खटला दाखल होण्याची वेळ येऊ
शकते. अशा वेळी नुकसान भरपाई ची शिक्षा थोठावतांना न्यायालय संपादकाच्या/मालकाच्या घोषित संपत्तीच्या प्रमाणात दंड
आकारू शकतात. लोकप्रिय सिने-अभिनेता किव्हा साहित्यिक/कलाकाराला आपल्या पत्नीला घटस्फोट द्यायचा झाल्यास त्याला त्याच्या घोषित संपत्तीच्या प्रमाणात पोटगी देणे भाग पडू शकते.
उद्योगपतींच्या वैध उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात कर बसू शकतो. हे सगळे टाळण्यासाठी स्विस बँकेचा उपयोग करण्यात येतो.
स्विस बँकेच्या गोपनीय खात्यात साठवलेला पैसा स्वदेशी परत आणणे
म्हणजे स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्याचा प्रकार होऊ शकतो. कारण त्याचा
स्रोत जाहीर करणे आणि त्यानुसार कर भरणे क्रमप्राप्त आहे, किव्हा कायदेशीर कारवाईला तोंड
द्यावे लागू शकते. परिणामी, गोपनीय खात्यातील पैसा परदेशातच गुंतवण्यात येतो. स्विस बँक्स आणि स्विस
आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून ही गुंतवणूक करता येते. ग्राहकाला या गुंतवणुकीतून होणाऱ्या नफ्याचा
काही भाग वैध मार्गाने कर भरून स्वदेशी आणता येऊ शकतो. अर्थात, या बाबतीत सगळेच गोपनीय असल्याने या
फक्त अटकळी आणि शक्यता आहेत.
मुळात भारतासारख्या देशातले नागरिक गोपनीय खात्यात पैसा जमा कुठल्या
मार्गाने करतात याबाबत अद्याप फारशी स्पष्टता नाही. स्विस बँकांच्या आणि/किव्हा स्विस बँकांशी व्यापारी करार
असणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय बँकांच्या शाखा भारतासारख्या देशात कार्यरत आहेत. मात्र, या सगळ्या शाखांना त्या-त्या
देशातील नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे, त्यांच्या द्वारे स्विस बँकेच्या गोपनीय खात्यात पैसा पाठवणे शक्य असले तरी हा पैसा बाहेर कुणी
पाठवला आहे याची माहिती मिळवणे शोध यंत्रणेच्या अखत्यारीतील आहे. अर्थात पैसा
कुणाच्या खाती जमा होत आहे ही माहिती पैसा पाठवणाराच देऊ शकतो. पण पैसा जमा
करणाऱ्या व्यक्तीने माहिती दिली म्हणून पैसा ज्याच्या खाती जमा होणार आहे त्याचावर
गुन्हा सिध्द होत नाही. त्या क्रमांकाचे खाते या व्यक्तीचे आहे याचा पुरावा कुठेच उपलब्ध नाही. शिवाय, पैसा ज्याच्या खाती जमा होणार आहे
तो स्वत:चा गोपनीय क्रमांक न देता, त्याच्या परदेशी भागीदाराचा गोपनीय क्रमांक देऊ शकतो. एकाच
व्यक्तीने एकाच बँकेतून गोपनीय खात्यात पैसा जमा करण्याऐवजी, काही व्यक्ती अनेक बँकांमधून थोड्या थोड्या प्रमाणात पैसा जमा करू शकतात. अवैध
मार्ग म्हटले की ही गुंतागुंत अटळ आहे.
याशिवाय दुसरे मार्गसुद्धा असू शकतात. आंतरराष्ट्रीय
सहभागाच्या सौद्यांमध्ये, जसे की युरोपीय कंपनीकडून सुरक्षा उपकरणे विकत घेणे, लाच घेणारी भारतीय व्यक्ती मध्यस्थांना परस्पर स्विस बँकेत लाचेची रक्कम जमा करण्यास
सांगू शकते. साखर किव्हा गव्हाच्या आयातीला परवानगी दिल्यास ज्या परदेशी
कंपन्यांकडून आयात होणार आहे त्यांना परस्पर स्विस बँकेत कमिशन जमा करण्यास
सांगितले जाऊ शकते. याशिवाय, हवालाचे परंपरागत मार्ग स्विस बँकेत पैसा जमा करण्यासाठी अवलंबिले
जाऊ शकतात. सिने-अभिनेता आपल्या निर्मात्याला आणि क्रिकेट खेळाडू आपल्या आंतरराष्ट्रीय प्रायोजकाला करारात नमूद निधीव्यतिरिक्त
अतिरिक्त धन आपल्या गोपनीय खात्यात जमा करण्यास सांगू शकतो. या साठी करारातील
निधीची रक्कमच मुळात कमी ठेवली जाऊ शकते.
वित्तीय जागतिकीकरणामुळे स्विस बँकांमध्ये धन जमा करणे अधिकच
सोपे झाले आहे. स्विस बँकांची गोपनियता कमी करण्यासाठी युरोपीय संघ, अमेरिका आणि भारतासारख्या देशांचा
दबाव वाढत आहे. मात्र, स्विस अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात बँकिंग सेवांवर आधारीत
असल्याने स्वित्झर्लंडच्या बँकिंग व्यवस्थेत नजीकच्या काळात मुलभूत बदल घडणे
अपेक्षित नाही. स्विस जनतेचे मत बँक खात्यांची गोपनीयता राखण्याच्या बाजूनेच आहे. सन १९८४ मध्ये
स्वित्झर्लंडमध्ये घेण्यात आलेल्या सार्वमतात 73% मतदारांनी गोपनीयतेच्या बाजूने कौल दिला होता. त्यामुळे स्विस बँकांभोवतीचे रहस्यमय वलय सध्यातरी कायम राहणार आणि त्यातून भारत-पाकिस्तान सारख्या देशात उद्भवणारी राजकीय वादळे सुद्धा येत राहणार.
No comments:
Post a Comment