Showing posts with label Russia Putin Duma Communist Party Medvedev Oil. Show all posts
Showing posts with label Russia Putin Duma Communist Party Medvedev Oil. Show all posts

Thursday, March 8, 2012

रशियात पुटीनशाहीचा विजय

रशियामध्ये व्लादिमिर पुटीन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकत पुढील ६ वर्षांसाठी आपले एकछत्री राज्य पुर्नस्थापित केले आहे. ४ मार्च रोजी झालेल्या निवडणुकीत पुटीन यांना ६३.६% मते मिळाल्याचे रशियाच्या केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर आता त्यांची राष्ट्राध्यक्षपदाची ३ री कारकीर्द सुरु होणार आहे. यापूर्वी, सन २००० ते २००४ आणि सन २००४ ते २००८ अशा राष्ट्राध्यक्षपदाच्या २ लोकप्रिय कारकीर्दीनंतर रशियाच्या राज्यघटनेनुसार त्यांना सलग तिसऱ्यांदा या सर्वोच्च पदाची निवडणूक लढवणे शक्य नव्हते. त्यामुळे, सन २००८ मध्ये पुटीन यांनी त्यांच्या युनायटेड रशिया पक्षाचे मेदवेदेव यांना ४ वर्षांसाठी राष्ट्राध्यक्ष होण्याची संधी दिली होती. मेदवेदेव यांच्या सद्य-प्रशासनात पुटीन पंतप्रधानाच्या भूमिकेत आहेत. रशियाच्या संसदेत युनायटेड रशिया पक्षाला असलेल्या दोन त्रीत्युयांश बहुमताचा फायदा घेत पुटीन यांनी घटना दुरुस्तीद्वारे सन २०१२ नंतर राष्ट्राध्यक्षपदाची कारकीर्द ४ ऐवजी ६ वर्षांची असेल अशी तरतूद करून घेतली होती. ३ महिन्यापूर्वी झालेल्या संसदीय निवडणुकीत युनायटेड रशिया पक्षाला दोन त्रीत्युयांश बहुमत गमावत साध्या बहुमतावर समाधान मानावे लागले होते. संसदीय निवडणुकीत मोठ्या प्रमाणात धांदली झाल्याचे आरोप करत मागील ३ महिन्यात पुटीन विरोधकांनी विरोध प्रदर्शनांचा धूमधडाका उडवून दिला होता. त्यामुळे पुटीन यांना ही निवडणूक कठीण जाईल असे भाकित वर्तवण्यात येत होते. प्रत्यक्षात, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या साम्यवादी पक्षाच्या गेन्नादी झ्युगानोव यांना १७.९% मतांवरच समाधान मानावे लागले. झ्युगानोव हे बोरिस येल्तसिन यांच्या काळापासून राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याने मतदार त्यांना कंटाळले आहेत असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. झ्युगानोव यांनी लढाऊपणे रशियात साम्यवादी पक्षाची पुन्हा स्थापना केली आणि पक्षाचा जनाधारसुद्धा वाढवला. मात्र, दुसऱ्या फळीचे सशक्त नेतृत्व त्यांना अद्याप तयार करता आलेले नाही. या निवडणुकीत ७.९% मते घेत तिसऱ्या क्रमांकावर आलेले धनाढ्य अपक्ष उमेदवार मिखाईल पोखोरोव यांना पुटीन यांनी विरोधकांची मते विभाजित करण्यासाठी उभे केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. सोविएत संघाच्या विघटनानंतर येल्तसिन यांच्या आततायी धोरणांमुळे सरकारी उपक्रम कवडीमोलाने विकण्यात आल्याने काही जन क्षणात धनाढ्य उद्योगपती झाले होते. अशा सर्वांची जनमानसातील प्रतिमा भ्रष्ट आणि लालची अशी आहे. पोखोरोव त्याच श्रेणीतील असल्याने त्यांना विरोध करणाऱ्यांची सहानुभूती साहजिकच पुटीन यांना मिळाली असावी असे विश्लेषकांचे मत आहे.

रशियाच्या सन १९९५ च्या राष्ट्राध्यक्षीय निवडणूक कायद्यानुसार, अधिकृत पक्ष किव्हा मतदारांच्या गटांना आपल्या उमेदवारांचे नाव निवडणूक आयोगाकडे नोंदवून त्यांच्या समर्थनार्थ १० लाख मतदारांच्या सह्या गोळा कराव्या लागतात. यापैकी एका प्रांतातून ७ टक्क्यांपेक्षा जास्त सह्या असू नये असा नियम आहे. फक्त एकाच शहरात/प्रांतात लोकप्रिय असलेले किव्हा एकाच वांशिक गटाचे समर्थन असलेले उमेदवार राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीच्या रिंगणात उतरू नयेत यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. एकूण मतदारांपैकी ५०% मतदारांनी मतदान केले तरच निवडणूक वैध मानण्यात येते. एकूण मतदानापैकी ५० टक्क्यांहुन अधिक मते घेणारा उमेदवार विजयी ठरतो. कुणालाही ५० टक्क्यांहून अधिक मते मिळवण्यात यश आले नाही तर सर्वाधिक मते घेणाऱ्या २ उमेदवारांमध्ये मतदानाची दुसरी फेरी होते. या दुसऱ्या फेरीत मतदारांना मतदानाच्या वेळी 'दोन्हीपैकी कुणीच नाही' असा पर्यायही उपलब्ध असतो. मात्र, दुसऱ्या फेरीत ५० % मते मिळवण्याची अट नसल्याने सर्वाधिक मते घेणारा उमेदवार विजयी होतो. 'दोन्हीपैकी कुणीच नाही' या पर्यायाला सर्वाधिक मते मिळाल्यास काय होणार, या बाबत निवडणूक कायद्यात स्पष्टता आढळत नाही. राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार जन्माने रशियन असणे गरजेचे नसले तरी उमेदवारी अर्ज भरण्याच्या निदान १० वर्षे आधीपासून तो किव्हा ती रशियन नागरिक असणे आवश्यक आहे.

एकूण ६५% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर, पुटीन यांना पहिल्या फेरीतच ६३.६% मते मिळाल्याने दुसऱ्या फेरीत जाण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली नाही. पुटीन यांना पराभूत करणे शक्य नाही याची जाणीव विरोधकांना होती. त्यामुळे पहिल्या फेरीत त्यांना ५० टक्क्यांहून अधिक मते मिळू नये यावर विरोधकांनी लक्ष केंद्रित केले होते. पुटीन विरोधात कुणालाही मत द्या अशी भूमिका नागरी समाजाच्या पुटीन-विरोधी गटाने घेतली होती. दुसऱ्या फेरीचा सामना करावा लागणे यात पुटीन यांचा नैतिक पराभव होता. मात्र, मतदारांनी बदलावाऐवजी स्थैर्याला प्राधान्य देत पुटीन यांना तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपद बहाल केले. विरोधकांमधील एकीचा अभाव, पुटीन-विरोधी आंदोलनाचे मर्यादित महानगरी स्वरूप, पुटीन-पूर्व काळातील अनागोंदी आणि आर्थिक विवंचनेच्या आठवणी इत्यादी कारणांमुळे मतदारांचे समर्थन मिळवणे पुटीन यांना शक्य झाले. प्रचार काळात वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका लेखात पुटीन यांनी म्हटले आहे, "१९९० च्या दशकात लोकशाहीच्या झेंड्याखाली आपल्याला आधुनिक सरकार मिळाले नाही, उलट अनेक गट आणि अर्धसामंती वर्गांच्या संघर्षात रशियन समाज होरपळून निघाला. आपल्याला उत्तम दर्ज्याचे राहणीमान मिळाले नाही, न्याय्य आणि स्वतंत्र समाज मिळाला नाही, उलट सामाजिक संघर्ष आणि हाल-अपेष्टा पदरी पडल्यात. सामान्य माणसांच्या हिताकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि बळजबरीने राज्य करणाऱ्या उच्चभ्रू वर्गाची सत्ता बघावयास मिळाली. आज पुन्हा रशियन समाज अस्थिरतेच्या वळणावर उभा आहे. २ किव्हा ३ चुकीची पाउले उचलल्यास पुर्वाश्रमीचे भोग परत नशिबी येणार." अशा प्रकारचा प्रचार सामान्य रशियन नागरिकांच्या हृदयाला न भिडल्यास नवल ठरावे.

६ वर्षांनी परिस्थिती अनुकूल असल्यास चौथ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची तयारी पुटीन यांनी आतापासून दाखवली आहे. त्यात त्यांना यश आल्यास सोविएत संघाचे सर्वेसर्वा जोसेफ स्टालिन यांच्या पेक्षा जास्त काळ सर्वोच्च पदावर राहण्याच्या विक्रमाची नोंद पुटीन यांच्या नावावर होईल. मात्र, पुटीन विरोधकांनी निवडणूक निकाल मान्य करण्यास नकार देत , संसदीय निवडणुकीप्रमाणे या वेळीसुद्धा मोठ्या प्रमाणात मतदानाच्या वेळी धांदली झाल्याचे आरोप केले आहे. निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवणाऱ्या अनेक संस्थांनी सुद्धा या आरोपांना पुष्टी दिली आहे. पुटीन-विरोधी इंटरनेट कार्यकर्ता एलेक्शी नैवल्नीने म्हटले आहे की त्याच्या वेब साईटवर मतदानात घोटाळ्याच्या ६,००० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. गोलोस या निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवणाऱ्या गटाने ३,००० तक्रारी नोंदवल्या आहेत. गोलोस च्या सूत्रांनी सांगितले की प्रत्यक्षात पुटीन यांना ५०.३% मते मिळाली असावीत, पण सरकारी यंत्रणेच्या सहाय्याने पद्धतशीरपणे हा आकडा फुगवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, पुटीन यांना ६ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण न करू देण्याचा मनोदय विरोधक व्यक्त करत आहेत. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की या पूर्वी विरोधकांनी केलेल्या आरोपांची दखल घेत यावेळी १,८०,००० मतदान केंद्रांवर कॅमेरे लावण्यात आले होते आणि पारदर्शी मतपेट्या वापरण्यात आल्या होत्या.

विरोधकांच्या आंदोलनातील धार काढून घेण्यासाठी राजकीय सुधारणा लागू करणे हे पुटीन यांच्या पुढील सर्वात मोठे आव्हान आहे. त्याबरोबर, रशियाला जागतिक राजकारणात मानाचे स्थान मिळवून देण्याचा संकल्प पुटीन यांनी प्रचार काळात व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या ओबामा प्रशासनाने पुटीन यांच्या निवडीला आव्हान न देण्याचे सूचित करत त्यांच्या नेतृत्वाला एक प्रकारे मान्यता दिली आहे. अमेरिकी सरकारने अद्याप अधिकृतपणे पुटीन यांचे अभिनंदन केले नसले तरी लवकरच होऊ घातलेल्या G-८ या विकसित राष्ट्रांच्या संमेलनात ओबामा आणि पुटीन यांची भेट होईल असे म्हटले आहे. सिरीया आणि इराण या दोन्ही देशांशी सुरु असलेल्या संघर्षातून तोडगा काढण्यासाठी पाश्चिमात्य देशांना रशियाच्या सहकार्याची गरज आहे. मात्र, पुटीन यांनी पूर्वीपासूनच पाश्चिमात्य देशांचे अनुकरण आणि तुष्टीकरण न करण्याचे धोरण अंमलात आणले आहे. पूर्व युरोप, मध्य आशिया आणि आर्क्टिक प्रदेश या भागात रशियाच्या हितांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे पुटीन यांचे धोरण आहे. युरोपीय संघाच्या धर्तीवर पूर्वाश्रमीच्या सोविएत गणराज्यांची आर्थिक एकजूट उभी करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प पुटीन यांनी हाती घेतला आहे. नाटोला आळा घालण्यासाठी रशियाची चीन बरोबरची सामरिक भागीदारी मजबूत करण्यासह 'शांघाई कॉपरेशन ऑरगनायझेशन' या रशिया, चीन, कझाकस्तान, ताजिकिस्तान, किर्गिजीस्तान, उझबेकिस्तान या ६ देशांच्या संघटनेला महत्व देण्याचे पुटीन यांचे धोरण आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत चीन आणि रशियाने सिरीयात सरकार बदलाच्या अमेरिका आणि युरोप धार्जिण्या ठरावाला विरोध करत नजीकच्या भविष्यात पाश्चिमात्य देशांना जागतिक राजकारणात मोकळीक राहणार नाही असे सुचीतच केले आहे. पुटीन यांच्या नेतृत्वाखाली रशियाचे परराष्ट्र धोरण अधिक कणखर होत जाणार यात शंका नाही. भारताचे पुटीन यांच्या बरोबरचे संबंध आदराचे आणि सौहार्दाचे आहेत. मात्र, मागील काही वर्षात भारताच्या परराष्ट्र धोरणाचा कल पाश्चिमात्य देशांकडे झुकत असल्याने रशियाच्या आक्रमक पवित्र्यांनी भारताची अडचण होण्याची शक्यता आहे. सिरीयाबाबतच्या ठरावात भारत आणि रशियाची भूमिका एकमेकांविरुद्ध होती, तर इराण विषयी दोन्ही देश एकाच बाजूला आहेत. भारत २ वर्षांकरीता संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचा सदस्य झाला असल्याने आगामी काळात पुटीन यांच्या रशिया बरोबरचा संवाद वाढवणे क्रमप्राप्त झाले आहे.

Wednesday, December 14, 2011

रशियात पुतीन यांच्या राजकीय अंताची सुरुवात?

(Published in Maharashtra Times on 13th Dec. 2011)

अरबस्तानात वाहत असलेले प्रस्थापितांच्या विरोधाचे आणि सत्ता बदलाचे वारे आता विशालकाय रशियाच्या भूमीवर सुद्धा वाहू लागले आहेत. कुणाच्या गावीही नसतांना आणि कुणाला फारसे अपेक्षितही नसतांना रशियातील मतदारांनी सत्ताकांक्षी पंतप्रधान व्लादिमिर पुतीन यांच्या युनायटेड रशिया या राजकीय पक्षाला संसदीय निवडणुकीत चपराक लगावली आहे. अधिकृतरीत्या जाहीर झालेल्या निकालानुसार युनायटेड रशियाला रशियन संसद म्हणजेच ड्युमा मधील दोन त्रीतुयांश बहुमत गमावत साध्या बहुमतावर समाधान मानावे लागत आहे. विरोधकांचा आणि युरोपिअन निरीक्षकांचा आरोप आहे की सत्ताधारी पक्षाने खोटे मतदान आणि मतमोजणीत धांदली करत अंदाजे १५ ते २० टक्क्यांनी निकाल आपल्या बाजूने फिरवला आहे. या आरोपात जर तथ्य असेल तर याचा सरळ सरळ अर्थ होतो की रशियन मतदारांनी सत्ताधारी युनायटेड रशियाला पूर्णपणे नाकारलेच आहे. पुतीन यांच्या या पक्षावर निवडणुकीत धांदली करण्याचे आरोप वारंवार होत आले आहेत. मात्र या वेळेस त्याला धार लाभली आहे ती निवडणुकीत ध्यानी मनी नसतांनाही लक्षणीय प्रमाणात पीछेहाट झाल्याने आणि निकाल जाहीर झाल्यानंतर विरोधकांच्या उत्स्फूर्त निदर्शनांना लाभलेल्या प्रतिसादाने.

मागील संसदीय निवडणुकीत ६४% मते मिळवीत ड्युमातील ४५० पैकी ३१५ जागा जिंकणाऱ्या युनायटेड रशियाला या वेळी ५० टक्के मते आणि २३८ जागांवरच समाधान मानावे लागत आहे. राज्यघटनेत बदल करण्यासाठी आवश्यक असलेले / बहुमत गमावल्याने युनायटेड रशियाला महत्वाच्या विधेयकांना पारित करवून घेण्यासाठी इतर पक्षांची मदत घेण्याची मशक्कत करावी लागणार आहे. याही पेक्षा महत्वाचे म्हणजे पुढील वर्षीच्या अध्यक्षीय निवडणुकीत व्लादिमिर पुतीन यांची उमेदवारी युनायटेड रशियाने जाहीर केल्यानंतर त्यांना संसदीय निवडणुकीत हा फटका बसला आहे. याचा अर्थ पुतीन यांना अध्यक्षीय निवडणूक जिंकणे तेवढेसे सोपे राहिलेले नाही आणि पहिल्या फेरीत ५०% मते मिळवता आल्यास निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीत जाण्याची नामुष्की बलाढ्य आणि आता पर्यंत अपराजित राहिलेल्या पुतीन यांच्यावर ओढवू शकते. रशियन राजकीय निराक्षकांच्या मते पंतप्रधान पुतीन आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी आपल्या पदांची अदलाबदल करण्याचा घेतलेला निर्णय मतदारांना फारसा रुचलेला नाही. पुतीन यांनी सन २००० ते २००८ या काळात सलग दोनदा राष्ट्राध्यक्ष पद उपभोगल्यानंतर रशियाच्या घटनेनुसार सलग तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदी उभे राहणे त्यांना शक्य नव्हते. त्या मुळे त्यांनी त्या वेळेचे पंतप्रधान मेदवेदेव यांना राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार बनवीत स्वत: पंतप्रधान झालेत. आता वर्षानंतर परत राष्ट्राध्यक्ष बनण्याचा पुतीन यांचा मार्ग घटनेनुसार मोकळा झाला असला तरी अनेक मतदारांना तो रुचलेला नाही असे निरीक्षकांचे मत आहे. या दरम्यानच्या काळात ड्युमातील / बहुमताचा फायदा घेत युनायटेड रशियाने राष्ट्राध्यक्ष पदाची कारकीर्द वर्षांहुन वाढवून वर्षे करवून घेतली. म्हणजेच ५९ वर्षीय पुतीन यांनी पुढची १२ वर्षे तेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष होणार असे गृहीतच धरले होते.

निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणुकीत झालेल्या धान्दलींच्या विरोधात विरोधी पक्षांच्या नेतृत्वात मोस्कोसह काही शहरात उत्स्फूर्त निदर्शने झालीत. त्याला प्रतिकार करण्यासाठी पुतीन यांच्या पक्षानेसुद्धा स्वत:च्या समर्थकांना रस्त्यावर उतरवले. यानंतर विरोधकांनी शनिवार १० डिसेंबरला परत मोठ्या प्रमाणात निदर्शने केलीत. निरीक्षकांच्या मते शनिवारी झालेली निदर्शने ही सरकार विरोधातील मागील २० वर्षातील सर्वात मोठी निदर्शने होती आणि राजकीय पक्षांच्या समर्थकांसह अनेक सामान्य नागरिक ही त्यात सहभागी झाले होते. या वेळी सत्ताधारी पक्षाने सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली असली तरी स्वत:च्या समर्थकांना परत रस्त्यावर उतरवून वातावरण अधिक तापवणेच पसंद केले. सोविएत संघाचे शेवटचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव यांनी सुद्धा निवडणुकीत अफरातफरी झाल्याचा आरोप करत विरोधकांना बळ पुरवले. दुसरीकडे पंतप्रधान पुतीन यांनी अमेरिकी परराष्ट्र मंत्री हिल्लरी क्लिंटन यांचे नाव घेत अमेरिकेचा विरोध प्रदर्शनांना आशीर्वाद असल्याचा आरोप केला आहे. तत्पूर्वी क्लिंटन यांनी रशियन संसदीय निवडणुका मुक्त आणि योग्य मार्गाने झाल्या नसल्याची टिप्पणी केली होती.

व्लादिमिर पुतीन यांच्याबद्दलची अमेरिकेची नापसंदी नवी नाही. बोरिस येल्त्सिन यांचे अनुसरण करता राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पुतीन यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देत निर्णय घेण्यास सुरुवात करून अमेरिकेची नाराजी बरीच आधी ओढवून घेतली होती. यामुळे रशियन जनतेत पुतीन यांना मानाचे स्थान मिळाले. याला जोड मिळाली ती तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमतीत झालेल्या प्रचंड भाव वाढीची. पुतीन यांनी याचा पुरेपूर फायदा घेत युरोपियन देशांकडून तेल आणि नैसर्गिक वायूच्या निर्यातीचा भरपूर मोबदला वसूल केला आणि रशियात आर्थिक सुबत्ता आणली. याच्या बदल्यात रशियन मतदारांनी सुद्धा पुतीन यांना भरभरून मते दिलीत. मात्र सरकारी खजिना भरला गेला तरी त्याचा सामाजिक सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी उपयोग करण्याकडे पुतीन यांच्या पक्षाने दुर्लक्षच केले. यामुळे काही नागरिकांना सोविएत संघाचा काळ जास्त चांगला असल्याची जाणीव होऊ लागली. सोविएत संघाच्या पतनाला या वर्षी २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त्याने रशियात करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात सुमारे २०% लोकांनी त्यांचे जीवनमान सोविएत काळात जास्त चांगले होते असे नोंदवले आहे. पुतीन-मेदवेदेव यांच्या काळात रशियन अर्थव्यवस्था तेल आणि नैसर्गिक वायू तसेच लष्करी युद्ध सामग्रीच्या निर्यातीवर मोठ्या प्रमाणात निर्भर झाली. मात्र यामुळे उद्योजकतेला फारसी चालना नाही मिळाली आणि बेरोजगारीचा दरही कमी नाही झाला. उद्योजकता नसल्याने रोजगार नाही आणि राज्याने पुरवलेली सामाजिक सुरक्षा यंत्रणाही नाही अशा परिस्थितीचे राजकीय असंतोषात आता रूपांतरण होत आहे.

या असंतोषाचा सर्वाधिक फायदा मिळाला आहे तो साम्यवादी पक्षाला. रशियन डयुमात साम्यवादी पक्ष आधी सुद्धा सर्वात मोठा विरोधी पक्ष होता. मात्र मागील निवडणुकीत १२% मते मते मिळवणाऱ्या या पक्षाने या वेळेस १९% मते मिळवीत ५७ जागांवरून ९२ जागांवर मुसंडी मारली आहे. महत्वाचे म्हणजे काही प्रांतांमध्ये साम्यवादी पक्षाने आघाडी घेत सरकार स्थापण्याचीही तयारी केली आहे. सोविएत संघाच्या पतनानंतर १९९३ मध्ये नव्याने स्थापन झालेल्या साम्यवादी पक्षाचे नेतृत्व तेव्हापासूनच गेन्नदी झ्युगानोव यांच्याकडे आहे. तेच पुढील वर्षीच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत साम्यवाद्यांचे उमेदवार असतील. निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जस्ट रशिया पक्षाला १३.२५% मतांसह ६४ जागा तर प्रखर राष्ट्रवादी उजव्या विचारसरणीच्या लिबरल डेमोक्रटीक पक्षाला ११.६८% मतांसह ५६ जागा मिळाल्या आहेत. सत्ताधारी युनायटेड रशिया वगळता इतर सर्वच पक्षांच्या जनाधारात वाढ झालेली आहे. मात्र मागील वेळेप्रमाणे या वेळी सुद्धा डयुमात ४च पक्षांचे प्रतिनिधी असतील. एकंदरीत या निवडणुकीने विरोधी पक्षांच्या अंगात नव्याने उत्साह आणि बळ संचारले आहे आणि निवडणुकीतील अफरातफरीचे आरोप जर खरे असतील तर रशियात प्रथमच राष्ट्राध्यक्षीय निवडणूक रंगतदार होऊ घातली आहे असे म्हणावयास हरकत नाही.