Showing posts with label Sakina Yakubi; Afghanistan Institute of Learning; Soviet Intervention; Taliban regime; underground schools. Show all posts
Showing posts with label Sakina Yakubi; Afghanistan Institute of Learning; Soviet Intervention; Taliban regime; underground schools. Show all posts

Sunday, June 24, 2012

एक आहे याकुबी


हिटलरच्या जुलमी नाझीवादाविरुद्ध सातत्याने लिहिणाऱ्या ब्रेतोल्त ब्रेख्त या प्रसिद्ध जर्मन कवीने म्हटले होते की, "अंधारमय काळामध्ये गाणी गुणगुणल्या जातील का? हो, अंधारमय काळाबद्दलची गाणी गुणगुणल्या जातील!" जर्मनीच्या त्या काळ्याकुट्ट काळामध्ये प्रतीरोधाच्या धारेतून ना एखादा गांधी जन्माला आला, ना नेल्सन मंडेला, ना ऑंग स्यान स्यू की. मात्र, हजारो सामान्य जर्मन नागरिकांनी हिटलरच्या ज्यू-द्वेषाच्या धोरणांचा आपापल्या परीने विरोध करत आणि शक्य होईल तितक्या ज्यूंचे प्राण वाचवत माणुसकीची ज्योत तेवत ठेवली होती. हिटलरच्या जर्मनीमध्ये जे झाले तसेच काहीसे अफगाणिस्तानमध्ये तालिबानी शासनाच्या काळात घडले होते.  तालिबानने, इस्लामिक कट्टरवादाचा पुरस्कार करतांना, महिलांचे जीवन नरकमय करून ठेवले होते. जिथे महिलांना मुक्तपणे बाजारात किव्हा रस्त्यांवर फिरण्याची मुभा नव्हती, तिथे त्यांच्या शिक्षणाबद्दल तर विचारता सोय नव्हती. अफगाणिस्तानात, विशेषत: राजधानी काबूलमध्ये, सन १९६० आणि १९७० च्या दशकांमध्ये, इतर कुठल्याही लोकशाही व्यवस्थेप्रमाणे, महिला स्वातंत्र्याचा आणि प्रगतीचा अनुभव घेत होत्या. मात्र, त्यानंतरच्या भीषण यादवी युद्धाच्या काळात महिलांची अतोनात अधोगती झाली आणि १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात तालिबानचे शासन आल्यानंतर महिलांना सार्वजनिक जीवनातून पूर्णपणे माघार घ्यावी लागली होती. तालिबानने मुलींना शाळेत जाण्यावर बंदी आणली आणि तो वर कार्यरत असलेली विद्यालये उद्ध्वस्त केली. अशा काळात, सकेना याकुबी या अफगाण महिलेने स्थापन केलेल्या अफगाणिस्तान इंस्टीट्युत ऑफ लर्निंग (ए. आय.एल.) या संस्थेने मुलींच्या शिक्षणाच्या गुप्त शाळा चालवत स्त्री-शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली. सन १९९५ ते २००१ या तालिबानी-शासन काळात सकेना याकुबी यांच्या प्रयत्नांनी एकूण ८० भूमिगत बालिका विद्यालये चालवण्यात येत होती, ज्यातून तीन हजारहून अधिक मुलींना शिक्षण देण्यात आले. सतत शोषण, युद्ध, दुष्काळ, टंचाई यांच्या छायेत वावरणारे समुदाय तग कशा प्रकारे धरतात याचे उत्तर सकेना याकुबीच्या कार्यात शोधता येईल.       

सन १९९५ मध्ये, डॉ. सकेना याकुबी यांनी, अफगाणी महिलांना शिक्षिकेचे प्रशिक्षण देण्यासाठी, अफगाण मुला-मुलींच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी, तसेच महिला आणि मुलांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देत प्राथमिक वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी ए. आय.एल. ची स्थापना केली होती. सकेनाच्या नेतृत्वात या संस्थेने लवकरच अफगाणिस्तान पाळे-मुळे धरलीत. स्थानिक महिला आणि स्थानिक समुदायांना आपल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेत, सकेनाने ए. आय.एल. ही सर्वसामान्य अफगाणी जनतेची संस्था असल्याची भावना निर्माण करण्यात यश मिळवले. सकेनाने स्थानिक समुदायांच्या समस्यांची स्वत: मांडणी न करता, समुदायातील लोकांकडून, विशेषत: महिलांकडून त्यांचे प्रश्न वदवून घेतले. साहजिकपणे, आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षा हे मुद्दे सगळीकडे पुढे आलेत. समुदायाच्या स्तरावर हे प्रश्न सोडवण्यासाठी काय काय करता येऊ शकते याचा सकेनाने सविस्तर आढावा घेतला. प्रश्न एकाच प्रकारचे असले, तरी त्यांचे समाधान वेगवेगळ्या समुदायांसाठी वेगवेगळ्या स्वरूपात सादर केल्यास आवश्यक ते परिणाम मिळू शकतात याची तिला जाणीव होती. त्यामुळे तिने 'वन साईझ फिट्स ऑल' तत्वाने समाधान सुचवण्याऐवजी, प्रत्येक प्रश्नांची त्या-त्या समुदायातील लोकांना काय उत्तरे अपेक्षित आहेत याचा विचार करत उपाययोजना आखण्याची पद्धत आणली. या निर्णय-प्रक्रियेत महिलांना अग्रक्रमाने प्राधान्य देण्यात आले. अमंलबजावणीच्या दोऱ्या सुद्धा स्थानिक महिलांच्या हाती देण्यात आल्या. ए. आय.एल. ची जबाबदारी या महिलांना प्रशिक्षित करण्यापुरती मर्यादित ठेवण्यात आली. परिणामी, आज  सकेनाच्या प्रयत्नाने युद्ध-ग्रस्त अफगाणिस्तानात  प्रशिक्षण केंद्रे, शाळा आणि वैद्यकीय-उपचार केंद्रे यातून स्वयंसेवी महिलांची मोठी फळी उभी राहिली आहे. ए. आय.एल.  ने सुरु केलेल्या 'अफगाणी महिला प्रशिक्षण केंद्राच्या' धर्तीवर आज या देशात इतर स्वयंसेवी संस्थांनी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्रे सुरु केली आहेत. ए. आय.एल. ने शिक्षण आणि आरोग्यासह, अफगाणी महिलांना मानवी अधिकारांबद्दल माहिती पुरवण्याचे कार्य धडाडीने हाती घेतले आहे. मानवी अधिकारांबद्दल महिलांना सुसज्ज करणारी ही अफगाणिस्तानातील पहिलीवहिली संस्था आहे. महिलांमधील नेतृत्वक्षमता विकसित करण्यावर ए. आय.एल. चा विशेष भर आहे.
 
ए.आय.एल.च्या कामाप्रमाणे सकेनाची जीवन-कथा सुद्धा रोचक आहे. पश्चिमी अफगाणिस्तानातील हेरात प्रांतात जन्मलेल्या सकेनाने सन १९७७ मध्ये पदवीच्या शिक्षणासाठी तडक अमेरिका गाठली. तत्पूर्वी तिचे शिक्षण मुल्ला-मौलवी आणि स्थानिक शाळांच्या सानिध्यात झाले होते.  तिच्या कुटुंबातील उच्च-शिक्षणाचा आग्रह धरणारी ती पहिलीच होती. कॅलिफोर्निया-स्थित पैसिफिक विद्यापीठातून तिने जैवशास्त्रात पदवी संपादन केली आणि लोम-लिंडा विद्यापीठातून 'सार्वजनिक आरोग्य' विषयात उच्च-पदवी मिळवली. बालपणी सार्वजनिक आरोग्य प्रणाली शिवाय होणारे सामान्य माणसांचे, विशेषत: महिलांचे, हाल तिने जवळून अनुभवले होते. तिच्या आईने जन्मास घातलेल्या एकूण १५ मुलांपैकी फक्त ५ मुले किशोर वयात येईपर्यंत बचावली होती, ज्यापैकी एक सकेना होती. त्यामुळे या क्षेत्रात काम करण्याची ओढ तिच्यात निर्माण झाली होती. सकेनाने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही वर्षे डी'एट्र विद्यापीठात शिकवण्याचे काम केले. दरम्यानच्या काळात अफगाणिस्तानातील अशांततेचा  स्फोट होऊन भयान परिस्थिती निर्माण होऊ लागली होती. सन १९७९ मध्ये सोविएत फौजा अफगाणिस्तानात शिरल्यानंतर माजलेल्या यादवीने त्रस्त अफगाणी शरणार्थ्यांचे लोंढे पाकिस्तानच्या सीवार्ती भागात येऊ लागले होते. या लोंढ्यांतून मुजाहिदीन तयार करण्यासाठी अमेरिकेने डॉलर्स आणि पाकिस्तानने त्यांची यंत्रणा कामास लावली होती. मात्र, शरणार्थी महिला आणि मुलांच्या दयनीय स्थितीत सुधारणा करण्याकडे या देशांनी दुर्लक्ष केले होते. या काळात, सकेनाचे कुटुंबसुद्धा निर्वासित होऊन पाकिस्तानच्या पेशावर शहरातील शरणार्थी छावणीत दाखल झाले होते. सन १९९२ मध्ये सकेना पेशावरच्या शरणार्थी शिबिराला भेट द्यायला आली. तिने तत्काळ आपल्या कुटुंबियांची रवानगी अमेरिकेला केली. स्वत: मात्र शरणार्थी महिला आणि मुलांच्या कल्याणासाठी पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात तंबू रोवला. तिने सुरुवातीच्या काळात, अफगाण शरणार्थी शिबिरात पुनर्वसनाचे काम करणाऱ्या  संयुक्त राष्ट्राच्या संस्थांसोबत भरीव कार्य केले. तिने 'डारी' या अफगाणिस्तानातील भाषेतील ८ शिक्षक प्रशिक्षण पुस्तिका प्रकाशित केल्या. मात्र, सन १९९५ च्या सुमारास संयुक्त राष्ट्राच्या संस्थांनी त्यांचे बस्तान गुंडाळण्यास सुरुवात केली. याने विचलीत न होता, सकेनाने आपली संस्था स्थापन करत त्या मार्फत काम करण्यास सुरुवात केली.

सन २००१ मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वातील नाटो फौजांनी तालिबानला सत्तेतून हुसकावून लावल्यानंतर, जगाने सकेनाच्या कार्याची नोंद घेण्यास सुरुवात केली. एकीकडे तिला नव्या अफगाण सरकारचा राजाश्रय मिळाला तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय मदतीचा ओघ सुरु झाला. या संधीचे सकेना आणि तिच्या सहकाऱ्यांनी अक्षरश: सोने केले. दर वर्षी ए.आय.एल. ची सेवा सुमारे ३,५०,००० महिला आणि मुलांपर्यंत पोचत आहे. ए.आय.एल.च्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ७०% महिला आहेत. समुदाय-केंद्रित आणि समुदायाच्या सहकार्याने काम करण्याची पद्धत ए.आय.एल.ने सोडलेली नाही. कोणत्याही प्रकल्पामध्ये सामुदायिक मानवी भांडवल ९० ते १०० टक्के आणि सामुदायिक आर्थिक भांडवल ३० ते ५० टक्के असण्याचा पायंडा ए.आय.एल.ने मोडलेला नाही.

सन २००१ नंतर सकेनाला अनेक प्रतिष्ठीत पुरस्कार मिळाले आहेत. अलीकडच्या काळातील राजकीय घटनांनी मात्र सकेना काहीशी अस्वस्थ आहे. अमेरिकेने तालिबानशी संधी करण्यासाठी चालवलेले प्रयत्न तिला मान्य नाहीत. अमेरिकी योजनेनुसार तालिबानची अफगाणिस्तानच्या सत्तेत भागीदारी झाल्यास महिलांच्या भोगी पूर्वाश्रमीचे हाल येतील अशी तिची रास्त भीती आहे. काही तालिबानी 'चांगले' आहेत या पाश्चिमात्यांच्या विश्लेषणावर सकेनाचा विश्वास नाही. राजकीय निर्णयामुळे महिलांवर होणाऱ्या परिणामांचा विचार राजकीय पटाचे सूत्रधार फारसा करत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. तालिबानशी हातमिळवणी केल्यास, सकेना आणि तिच्या सहकाऱ्यांनी महिलांची स्थिती सुधारण्यासाठी आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांवर पाणी फेरले जाऊ शकते, याचा विचार अफगाण सरकार आणि अमेरिकेने केल्यास ती सकेना याकुबीला तिच्या कामाची मिळालेली खरी पावती असेल.