Thursday, November 15, 2012

मुखवट्या मागील चेहरा


राजकीय दृष्ट्या विजनवासात असतांना, वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतरही, ब्रजेश मिश्रा यांचे जाणे त्यांचे चाहते, स्पर्धक आणि विरोधक या सगळ्यांना चटका लाऊन गेले. संपूर्ण आयुष्य प्रशासनिक सेवेत काढल्यानंतर भारतीय राजकारणाची सुज्ञ जाण असलेले आणि अखेरच्या टप्प्यात पुरते ६ वर्षे सत्तेच्या केंद्रस्थानी राहत राजकारणाला धोरणात्मक कलाटणी देणारे ब्रजेश मिश्रा नावाचे उमदे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाला आत्मविश्वासाचे बळ देत महत्वाकांक्षेची भरारी घेण्यास उद्द्युत करण्यामागे मिश्रा यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती. सन १९९१ ते १९९८ दरम्यानच्या राजकीय आणि धोरणात्मक अनिश्चिततेच्या काळानंतर केंद्रीय राजकारणाला स्थैर्य देण्याचे काम अटल बिहारी वाजपेयी यांनी केले होते,  तर धोरणात्मक नवदृष्टी लावण्याची जबाबदारी ब्रजेश मिश्रा यांनी खंबीरतेने पार पाडली होती. वाजपेयींच्या पंतप्रधान पदावरील काळात त्यांनी ब्रजेश मिश्रांवर पूर्ण विश्वास दाखवत त्यांची आपल्या मुख्य सचिव पदासह नंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या नव्याने निर्मित पदावर सुद्धा नियुक्ती केली होती. मुळात, भारतासारख्या विशाल आणि जागतिक सत्ता होण्याची आस असलेल्या देशापुढे सुरक्षेची अनेक आव्हाने उभी असल्याने पंतप्रधानांना वेळोवेळी सल्ला देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची नितांत आवश्यकता आहे, हे ब्रजेश मिश्रा यांनी ताडले होते. स्वातंत्र्यानंतर अनधिकृतपणे कुणी न कुणी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची भूमिका निभावत आले होते. नेहरूंच्या काळात परराष्ट्र धोरणात केंद्रीय मंत्री कृष्ण मेनोन यांचा शब्द अंतिम असायचा, तर इंदिरा गांधींनी श्री. पी.एन. हक्सर यांना हा सन्मान दिला होता. मात्र, अधिकृत पदाशिवाय नियोजन आणि उत्तरदायित्व यांची कमी सतत जाणवत असे. ही कमी दूर करण्यासाठी, अमेरिकी राज्यपद्धतीच्या धर्तीवर भारतात सुद्धा असे कायदेशीर पद निर्माण करण्यासाठी त्यांनी धोरणकर्त्यांमध्ये चर्चा घडवून आणली आणि वाजपेयी सरकारने हे पद तयार करत खुद्द मिश्रा यांची पहिले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली. वाजपेयींच्या नेतृत्वात पोखरण इथे अण्वस्त्र चाचण्या घेण्यामध्ये आणि त्यानंतर जागतिक टीकेला धीर-गंभीरतेने उत्तर देण्यात मिश्रा यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. साहजिकच नव्या पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडणे अपेक्षित होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचे कार्यक्षेत्र पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रीमंडळाला केवळ सल्ला देण्याचे असले तरी मिश्रा यांनी स्व-कर्तुत्वाने या पदाची गरिमा वाढवत त्याला संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री पदाच्या तोडीचे बनवले. अर्थात, पंतप्रधानांचे मुख्य सचिवपदही त्यांच्याकडे असल्याने आपल्या सल्ल्यांचे रुपांतर धोरणांमध्ये करवून घेण्याची कामगिरी त्यांनी लीलया पार पाडली. तसेच, धोरणात्मक निर्णयांची अमंलबजावणी करण्यासाठी नोकरदारांची नकेल सुद्धा त्यांच्या हातात असल्याने प्रत्येक निर्णय धडाडीने राबवणे त्यांना शक्य झाले.

सन १९९१ नंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात मुलभूत बदल झाले असून भारताला जुन्या मानसिकतेतून बाहेर पडत नव्या मार्गांवर चालण्याची जोखीम उचलावीच लागेल हे ब्रजेश मिश्रा यांनी ताडले होते. तसेच, जागतिक सत्ता बनण्याचा मार्ग सरळसोट आणि सुलभ कधीच नसतो, तर त्यासाठी खाच-खळग्यातून मार्गक्रमण करत स्वत:ची वाट बनवावी लागते हे मिश्राजींना उमगले होते. वाजपेयी सरकारने सूत्रे हाती घेण्याआधी ज्या बाबी अनेकांना कळत होत्या पण त्या दिशेने वळण्याचे धारिष्ट्य होत नव्हते, त्यावर पाऊले उचलण्यास ब्रजेश मिश्रांनी तत्काळ सुरुवात केली होती. आपणास जग कसे हवे आहे, या ऐवजी जग जसे आहे त्यात राष्ट्रहित कसे साधता येईल याचा विचार करत निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी राज्यकर्त्यांवर बिंबवले होते. आदर्शवाद आणि यथार्थवादामध्ये त्यांनी साहजिकच वास्तविकतेचा स्विकार करण्यावर भर दिला. परिणामी, नव्या आंतरराष्ट्रीय राजकीय व्यवस्थेत भारताचे स्थान निर्माण करण्यासाठी प्रस्थापित जागतिक सत्तांसोबत संबंध बळकट करणे आवश्यक असल्याचे त्यांचे प्रामाणिक मत होते. द्वि-ध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा अंत होऊन अमेरिकेच्या वर्चस्वातील एक-केंद्रीय व्यवस्थेचा उगम झाला असला तरी ही तात्पुरती व्यवस्था असून नजीकच्या भविष्यात त्याची जागा बहु-ध्रुवीय संरचनेने घेतली जाईल याची त्यांना खात्री होती. या संभाव्य बहु-ध्रुवीय व्यवस्थेत आपले स्थान भक्कम करण्याची संधी भारताला चालून आल्याने त्याने जागतिक शक्ती प्रमाणे वर्तवणूक करण्यास सुरुवात केली पाहिजे असे त्यांचे मत होते.

वाजपेयींच्या पोखरण अण्वस्त्र चाचणी, अमेरिका, फ्रांस, इंग्लंड आणि युरोपीय संघ यांच्याशी द्वी-पक्षीय संबंधांना बळकटी देणे, श्री लंकेशी मुक्त व्यापार करार करणे इत्यादी महत्वपूर्ण बाबी मिश्रांच्या पुढाकाराने आणि नियोजनाने सुरळीत पार पडल्यात. पोखरण नंतर जागतिक व्यासपीठांवर भारताचे एकटेपण दूर करण्यासाठी ब्रजेश मिश्रा यांनी घेतलेल्या प्रयत्नांची फळे आजही चाखायला मिळत आहेत. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे अमेरिका आणि इतर विकसित देशांनी भारतावर लादलेले तांत्रिक निर्बंध दूर होण्याची प्रक्रिया वेगात सुरु झाली. या संबंधी पाश्चिमात्य आणि इतर प्रगत देशांशी वाटाघाटी करतांना त्यांनी कुठेही पडते घेतले नाही कि भारताच्या मुलभूत भूमिकांमध्ये बदल केला नाही. परिणामी, अण्वस्त्र प्रसार बंदी करारावर भारत सही करणार नाही हे अंत: अमेरिकेला मान्य करावे लागले. त्याचबरोबर, पोखरण नंतर भारतावर अतोनात टीका करणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या देशांना त्यांची जागा दाखवून देण्यात ब्रजेश मिश्रांनी कमी केले नाही. भारताच्या आर्थिक विकासाचा लाभ उठवण्यासाठी ज्यावेळी ऑस्ट्रेलियाचे वरिष्ठ मंत्री भारताच्या दौऱ्यावर  आले होते, त्यावेळी त्यांना भारतीय नेत्यांची भेट घेण्यासाठी ताटकळत ठेवत ऑस्ट्रेलियाने भारतावर विनाकारण केलेल्या जहाल टीकेचा सूड उगवत मिश्रांनी सर्व देशांना कडक संदेश दिला होता. पोखरण नंतर भारताने चीन च्या अण्वस्त्रांच्या भीतीमुळे अण्वस्त्र चाचणी केल्याचे पत्र अमेरिकेला पाठवले  होते. अमेरिकेने दुष्टपणे पत्राचा मजकूर न्यू यॉर्क टाईम्स मध्ये देत भारत आणि चीन दरम्यानचे वितुष्ट वाढवण्याचा प्रयत्न केल्यानंतर, स्वत: ब्रजेश मिश्रा यांनी चीन  सोबतचे संबंध सुरळीत राहतील याची दक्षता घेतली होती. परिणामी, कारगिल युद्धाच्या वेळी भारताला अडचणीत आणण्याऐवजी चीन ने तठस्थपणाची भूमिका घेतली होती. आंतरराष्ट्रीय राजकारणात मित्र आणि शत्रू निर्माण करता येतात, मात्र शेजारी बदलता येत नाहीत आणि त्यामुळे शेजारी देशांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणे नेहमीच राष्ट्रहिताचे आहे असे ब्रजेश मिश्रा यांचे ठाम मत होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी पाकिस्तान आणि चीन या दोन्ही शेजाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे चीनशी सीमा प्रश्नावर रखडलेली बोलणी नव्या जोमाने सुरु झाली. दोन्ही देशांनी सीमा-प्रश्नावर चर्चा आणि वाटाघाटी करण्यासाठी उच्च-स्तरीय विशेष प्रतिनिधी नेमण्याची योजना मान्य केली. पुन्हा, वाजपेयींनी भारताचे विशेष प्रतिनिधी होण्याचा मान ब्रजेश मिश्रा यांना दिला. 

ब्रजेश मिश्रांची राजकीय विचारसरणी नेहमीच उत्सुकतेचा आणि शंकेचा विषय राहिली आहे. कॉंग्रेस पक्षातर्फे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मंत्री पद भूषवलेल्या द्वारका प्रसाद मिश्रा यांचे पुत्र असलेल्या ब्रजेश मिश्रांनी सक्रीय राजकारणाचा मार्ग कधीच चोखाळला नाही. सन १९५१ मध्ये ते भारतीय परराष्ट्र सेवेची परीक्षा उत्तीर्ण होत सरकारी सेवेत रुजू झाले, आणि निवृत्त होईपर्यंत मतभेद असले तरी सरकारी धोरणांची अमंलबजावणी करण्याला प्राध्यान्य दिले. इंदिरा गांधींच्या परराष्ट्र धोरणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पी.एन.हक्सर यांच्या चमूत ब्रजेश मिश्रांचा सहभाग होता. निवृत्तीनंतर ते वाजपेयींच्या प्रभावाने भारतीय जनता पक्षाकडे आकृष्ट झाले. वाजपेयी सरकारची आणि त्यामुळे त्यांची सुद्धा कारकीर्द संपल्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले भारत-अमेरिका अणु संधीच्या निमित्त्याने! त्यांनी भाजपच्या भूमिकेशी फारकत घेत डॉ.  मनमोहन सिंग यांच्या पुढाकाराने होऊ घातलेल्या अणु संधीस पाठींबा दिला. याबद्दल सरकारने त्यांना पदम -विभूषण हा भारत-रत्न नंतरचा सर्वोच्च नागरी सन्मान देत गौरव केला. मात्र, मिश्रांनी पुरस्कारासाठी सरकार-धार्जिणी भूमिका घेतली असे म्हणणे म्हणजे त्यांचा विश्वास असलेल्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा अवमान ठरेल. त्याच्या मते ज्या-ज्या वेळी राष्ट्र-हितासाठी जी-जी भूमिका आवश्यक होती ती त्यांनी घेतली, आणि म्हणूनच मित्र आणि विरोधक असे सर्वांमध्ये मानाचे स्थान मिळवले.                             

राजकीय त्सुनामीच्या प्रतीक्षेत चिनी सागर


आंतरराष्ट्रीय राजकारणात अनेक राजकीय ज्वालामुखी सुप्त अवस्थेत असतात. मात्र, विविध देशांच्या राष्ट्रहितांमधील संघर्ष वाढत जाऊन सुप्त ज्वालामुखीचे खद्खदनाऱ्या लाव्हांमध्ये रुपांतर होण्यास फारसा कालावधी लागत नाही. महाकाय चीनच्या दक्षिण आणि पूर्व दिशांना पसरलेल्या आणि अनेक देशांच्या किनार्यांपर्यंत पोहोचलेल्या सागराला वरील विवेचन तंतोतंत लागू होते. अगदी काल-परवा पर्यंत सुप्तावस्थेत असलेल्या दक्षिण चीन सागरातील आंतरराष्ट्रीय समस्यांनी आता डोके वर काढण्यास सुरुवात केल्याने, या क्षेत्रातील देशांसह भारत, अमेरिका आणि जागतिक व्यापारी समुहाची डोकेदुखी वाढली आहे. द्वितीय महायुद्धाच्या काळापासून वादग्रस्त असलेल्या दक्षिण चीन सागरातील द्विप-समूहांमुळे चीनचे अनेक शेजारी देशांशी असलेले संबंध तणावग्रस्त झाले आहेत. जागतिक पटलावर महाशक्तीच्या रुपात उदयास येऊ घातल्यानंतर प्रथमच चीनने या भू-क्षेत्रातील आपल्या सार्वभौमित्वाच्या दाव्यांच्या समर्थनार्थ बाह्या सरसावल्या असल्याने, त्याच्या वर्तवणूकीकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे. चीन शिवाय, आशियान हा १० देशांचा आर्थिक दृष्ट्या संपन्न गट, चीन चा परंपरागत शत्रू आणि अमेरिकेशी संरक्षण संधी असलेला जपान, तसेच अमेरिकी समर्थनाच्या जोरावर साम्यवादी चीन मध्ये विलयीकरणास विरोध करत असलेला तैवान; हे सगळे दक्षिण चीन सागरातील विवादांमध्ये अडकलेले असल्याने, या समस्यांना जागतिक संघर्षाचे वलय लाभले आहे.  
या वर्षीच्या जून महिन्यात, चीन आणि फिलिपिन दरम्यानच्या स्कारबॉरोग या शेवाळीत समुद्र किनारपट्टीच्या मालकी हक्कावरून या दोन देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या काळात, चिनी आणि फिलिपिनी नौसेनेच्या बोटी या विवादित प्रदेशात एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या होत्या. आठवडाभराच्या तणावपूर्ण स्थितीनंतर, आधी फिलिपिनने आणि मागोमाग चीनने वाईट हवामानाचा दाखला देत आपापल्या बोटी माघारी वळवल्याने तात्पुरता तणाव निवळला असला तरी नजीकच्या भविष्यात संघर्षाचे सावट अद्याप कायम आहे. या घटनेची चर्चा पूर्ण निवळली नसतांनाच चीन आणि विएतनाम दरम्यानच्या स्प्राईटली आणि पैरासेल द्वीप-समूहाच्या सार्वभौमित्वाबद्दलच्या जुन्या वादाने उचल खाल्ली. या द्वीप-समूहांच्या भागात तेल आणि नैसर्गिक वायूंचे मुबलक साठे असल्याने दोन्ही देशांनी अलीकडच्या काळात या बेटांवर आपला हक्क बजावण्याच्या दिशेने पाउले टाकण्यास सुरुवात केली होती. विएतनामच्या संसदेने या बेटांवर सार्वभौम हक्क सांगणारा प्रस्ताव पारीत करताच, चीनने आपल्या राजकीय यंत्रणेत या दोन बेटांना देऊ केलेल्या प्रशासनिक स्तरात वाढ करत ‘प्री-फेक्चर’ चा दर्जा देऊ केला आणि गवर्नरची नियुक्ती करण्याची घोषणा केली. या शिवाय, चीन सरकारच्या तेल-खनन आणि निर्मिती उद्योगाने या द्वीप-समूहाभोवतीच्या तेल क्षेत्रातील खनन कामाच्या आंतरराष्ट्रीय निविदा जारी करत आपला हक्क बळकट करण्याचा प्रयत्न केला. विएतनामने सुद्धा भारताच्या ओएनजीसी सोबत सहकार्याचा करार करत, ओएनजीसीला विवादित क्षेत्रांमध्ये तेल-खनन कार्य करण्यासाठी आमंत्रित केले. साहजिकच, चीनने भारत सरकारकडे याबाबत तीव्र निषेध नोंदवला. यानंतर, भारताने, ‘दक्षिण-पूर्व चिनी सागर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने महत्वाचा असल्याने कुणा एका देशाची या जल-प्रदेशावर मक्तेदारी असू शकत नाही’, अशी जाहीर भूमिका घेत चीनला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, चीनशी असलेल्या  द्वि-पक्षीय संबंधांवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून भारताने या विवादित क्षेत्रात तेल-खनन करण्याची योजना सध्या तरी थंड बस्तानात गुंडाळून ठेवली आहे. आता संभाव्य चिनी धोक्यापासून रक्षण करण्यासाठी विएतनाम ने अमेरिकेशी संरक्षण क्षेत्रातील सलगी वाढवली आहे. खरे तर, सन १९७० च्या दशकातील विध्वंसक अमेरिकी हस्तक्षेपानंतर, स्वतंत्र समाजवादी विएतनाम ने या भांडवलशाही महासत्तेशी केवळ नाममात्र संबंध ठेवले होते. पण आता राष्ट्रीय सार्वभौमित्वाच्या बचावासाठी विएतनाम ने अमेरिकेशी सर्वांगीण मैत्रीची दारे उघड केली आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणात कुणी कायमचा शत्रू नसतो आणि कुणी कायमचा मित्र नसतो – सर्वात महत्वाचे असते ते राष्ट्राच्या सार्वभौमित्वाचे रक्षण, या सिद्धांताची पडताळणी विएतनाम-अमेरिका मैत्रीच्या पायाभरणीने पुन्हा एकदा झाली आहे. 
फिलिपिन आणि विएतनामशी निर्माण झालेले तणाव जणू अपुरे होते की, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात   चीन आणि जपान दरम्यानच्या विवादित बेटांवरून  दोन देशांमध्ये कमालीचे तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले. चीनमध्ये डीओउ आणि जपानमध्ये सेनकाकू नावाने ओळखल्या जाणाऱ्या द्वीप-समूहांच्या मालकी हक्कावरून दोन्ही देशांमध्ये वादाच्या फैरी झडत असतात आणि अधून-मधून त्याला उग्ररूप प्राप्त होत असते. काल-परवापर्यंत, सेनकाकू द्वीप-समूहाचा मालकी हक्क असल्याचा दावा जपानचा एक धनाढ्य उद्योगपती करत होता, तर चीन आणि तैवानचा या द्वीप—समूहावर कायदेशीर अधिकार असल्याचा दावा आहे. जपानच्या केंद्रीय सरकारने अलीकडेच या द्वीप-समुहाला उद्योगपती कडून विकत घेत त्याचे राष्ट्रीयीकरण केल्याचे घोषित केले. याची चीनमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. चीनच्या १०० हून अधिक शहरांमध्ये राष्ट्रवादी नागरिकांनी जपान-विरोधी उग्र प्रदर्शने केलीत. जपानी मालावर बहिष्काराच्या आवाहनांनी चिनी वेब साईट्स भरून गेल्यात, आणि प्रदर्शनकर्त्यांनी जपानी कंपन्यांच्या दुकानांची नासधूस केली तसेच जपानी नागरिकांवर हल्ले सुद्धा केलेत. मोठ्या शहरांमध्ये प्रदर्शनांना सहसा परवानगी न देणारया साम्यवादी सरकारने यावेळी बघ्याची भूमिका घेतली. जपान विरुद्ध सशस्त्र कारवाई करण्याची गरज पडल्यास, चीन मधील जनतेचे आपल्याला पूर्ण समर्थन आहे हे दाखवण्यासाठी अशी उत्स्फूर्त प्रदर्शने घडणे सरकारच्या सोयीचेच ठरले आहे. 
या सर्व वादांमधील छुपा पक्ष म्हणजे अमेरिका आहे. फिलिपिनची अमेरिकेशी शीत-युद्ध काळापासून संरक्षण संधी असल्याने, चीनच्या बलाढ्य लष्करी सज्जतेपासून फिलिपिनचे रक्षण करण्याची जबाबदारीसुद्धा अमेरिकेच्या खांद्यावर आहे. दक्षिण चीन सागरातील तणावाची परिस्थिती बघता आता, फिलिपिन प्रमाणे सिंगापूर सुद्धा अमेरिकेशी असलेली संरक्षण सज्जतेची संधी पुनर्जीवित करण्याच्या विचारात आहे. दक्षिण चीन सागरातील घटनाक्रम ज्या दिशेने मार्गक्रमण करतो आहे ते बघता, लवकरच अमेरिकेची या भागातील लष्करी उपस्थिती आणि प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या आगामी संरक्षण धोरणाच्या चर्चांमधून याचा जाहीर सुतोवाच करण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पुढील २० वर्षांत संरक्षण खर्चात लक्षणीय कपात करण्याचा संकल्प व्यक्त केला असला, तरी याच काळात आशियातील अमेरिकेची सामरिक शक्ती वाढवण्यावरसुद्धा भर दिला आहे. दक्षिण चिनी सागरातील राजनैतिक संकटामुळे अमेरिकेला ही संधी आपसूकच प्राप्त होते आहे. अमेरिकेने फिलिपिन, सिंगापूर आणि विएतनामशी संरक्षण संबंध मजबूत करण्याची तयारी चालवली असल्याने, तसेच अमेरिकेची जपान आणि तैवानशी आधीपासून उच्च-स्तरीय संरक्षण संधी असल्याने, आपली चहू बाजूंनी कोंडी करण्यात येत आहे ही चीन ची भावना प्रबळ होत आहे. परिणामी, चीन ने एकीकडे संरक्षण सज्जता वाढवण्याचे प्रयत्न जोमात सुरु केले आहेत, तर दुसरीकडे दक्षिण चीन सागरातील प्रश्नांवरून आशियान संघटनेत फुट पाडण्याची उक्ती अवलंबली आहे. आशियानच्या १० पैकी कंबोडिया, लाओस आणि म्यानमार या ३ देशांना भरघोस आर्थिक सहाय्य देऊ करत आशियानचा उपयोग चीन-विरोधी एकजूट दाखवण्यासाठी होणार नाही याची काळजी चीन ने घेतली आहे. दक्षिण चीन सागरातील प्रत्येक विवाद द्वि-पक्षीय चर्चांच्या माध्यमातून सोडवण्यात यावेत असा चीन चा आग्रह आहे, तर चीनचा महाकाय आकार आणि शक्ती पुढे पिटुकले असलेल्या देशांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आशियान आणि अमेरिकेचा सहभाग हवा आहे. 
आजवर दक्षिण हिंद सागरातील लक्ष्मण रेषा सांभाळल्या जात असल्याने या भू क्षेत्रातील शक्ती संतुलन कायम होते. मात्र, सर्व संबंधीत देशांचा संयमाचा तोल आता ढळू लागला आहे. या देशांतील पेटलेल्या जनमताचा विचार करता संघर्षाची एक ठिणगी सुद्धा व्यापक युद्धाचा भडका उडण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. भौगोलिक अंतरामुळे संभाव्य संघर्षात भारताचा सहभाग अपेक्षित नसला तरी, राजनैतिक संघर्षाचे चटके भारतीय उपखंडापर्यंत पोहोचणार हे नक्की! या दृष्टीने भारताने आतापासून आपले धोरण ठरवण्यास सुरुवात करणे इष्ट, अन्यथा चिनी सागरात उसळू पाहणाऱ्या राजकीय 'त्सुनामी'ची झळ भारताच्या या क्षेत्रातील आर्थिक-व्यापारी हित-संबंधांना लागण्यास वेळ लागणार नाही.             
                          

नेपाळमध्ये लोकशाहीचे त्रिशंकूपर्व


राज्यव्यवस्थेचे, राजेशाहीतील निश्चिंत अंधारमय स्थैर्यातून बाहेर पडून लोकशाहीच्या अनिश्चिततेच्या विकासमय जगामध्ये होणारे स्थित्यंतर, हे प्रत्येक समाजासाठी अत्यंत क्लेशदायक असते. सन २००६ पासून नेपाळची जनता या राजकीय सत्याचाकटू-अनुभव घेत आहे. नेपाळच्या राजकीय पक्षांना, राजेशाहीच्या संपूर्ण उच्चटनासाठी दाखवलेली अभूतपूर्व एकजूट टिकवता न आल्याने, राजेशाहीचे जोखड झुगारून ६ वर्षे झाली असली,  तरी नेपाळच्या लोकशाही क्रांतीला अद्याप आकार-उकार आलेला नाही. नेपाळमध्ये गेली ६० वर्षे राजेशाही विरुद्ध लोकशाहीवादी असा संघर्ष सुरु होता, मात्र लोकशाहीवादी गटांमधील दुहींमुळे, तसेच भारतासारख्या बलाढ्य देशाच्या मध्यस्थीमुळे, नेहमीच राजघराण्याचे फावत  आले होते. खरे तर, भारताने सातत्याने पाठपुरावा केलेल्या द्वि-स्तम्भीय राज्यपद्धतीला नेपाळच्या राजघराण्याने योग्य प्रकारे अमंलात आणले असते तर, राज घराण्याला आज प्रमाणे विजनवासात जाण्याची पाळी आली नसती. नेपाळमधील अविकसित राजकीय व्यवस्था आणि राजघराण्याशी बांधील जमीनदारी प्रथा यामुळे तिथे गणतंत्र प्रणाली स्थापन करणे म्हणजे अस्थिरतेला निमंत्रण देणे आहे; त्यामुळे राजाने घटनात्मक प्रमुखाची भूमिका सांभाळत बहु-पक्षीय निवडणुकांतून निवडून आलेल्या सरकारला जास्तीत जास्त अधिकार हस्तांतरीत करावे असा भारताचा आग्रह असे! मात्र, राजेशाहीने लोकनियुक्त सरकारांविरुद्ध कट-कारस्थाने करत त्यांना डळमळीत करण्याचेच काम केले. परिणामी, राजेशाहीविरुद्धचा रोष शिगेस पोचल्याने भारताने आपली भूमिका बदलत गणतंत्र स्थापनेच्या मागणीस पाठींबा देण्याची व्यावहारिक भूमिका स्वीकारली होती. 
भारताने आपल्या भूमिकेत बदल करण्यामागे नेपाळच्या पक्षीय राजकारणातील घडामोडींचा मोठा प्रभाव होता. माओवादी पक्ष आणि राजेशाही यांच्यातील एक तपाच्या हिंसक संघर्षानंतर, माओवाद्यांनी सशस्त्र मार्गाचा त्याग करत इतर लोकशाहीवादी पक्षांशी आघाडी स्थापन केली होती. मोबदल्यात, इतर पक्षांनी, द्वि-स्तम्भीय राज्य पद्धतीचा पाठपुरावा न करता माओवाद्यांच्या राजेशाहीच्या हकालपट्टीच्या  मागणीला पूर्ण समर्थन जाहीर केले. सन २००६ च्या सर्व-पक्षीय करारानुसार, निवडणुकांमध्ये सहभागी होण्यास होकार देणे आणि बहु-पक्षीय संसदीय प्रणाली स्थापन करण्यावर भर देणे, हे माओवादी पक्षाच्या विचारसरणीमध्ये घडलेले मोठे परिवर्तन होते. माओवाद्यांनी केलेल्या वैचारिक घुमजावाने एकीकडे चीनची कोंडी झाली, तर दुसरीकडे भारतातील माओवाद्यांना चपराक बसली. या संधीचा लाभ घेत भारताने माओवाद्यांच्या पुढाकाराने स्थापन लोकशाही आघाडीस पाठींबा दिला. या आघाडीस जनतेकडून ना भूतो ना भविष्यती समर्थन मिळाल्याने तत्कालीन राजा ग्यानेंद्रला पायउतार होण्यावाचून पर्याय उरला नाही.    .     
या पुढील घटनाक्रमातून मात्र भारताद्वारे पूर्वी व्यक्त होत असलेली अस्थिरता आणि दिशाहीनतेची भीती रास्त होती हे सिद्ध होऊ लागले. लोकशाहीवादी गणतंत्राच्या स्थापनेसाठी ४ वर्षे पूर्वी निर्वाचित बहु-पक्षीय घटना सभेला, अंतरिम (कामचलावू) राज्यघटना तयार करत, नेपाळला धर्मनिरपेक्ष गणतंत्र घोषित करण्यापलीकडे मजल मारता आलेली नाही. घटना सभेच्या स्थापनेच्या वेळी दोन मुद्दे सर्वात महत्वाचे होते. एक, माओवादी पक्षाच्या सशस्र सेनेला नि:शस्त्र करत कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करणे आणि दोन, संघराज्यात्मक पद्धतीचा विकास करणे! नेपाळचे शाही सैन्य आणि माओवादी सैन्य यांच्यादरम्यान सुमारे १२ वर्षे सतत संघर्ष सुरु होता. सन २००६ मध्ये माओवादी मुख्य प्रवाहात सामील झाल्यावर त्यांच्या सशस्त्र तुकड्यांचे काय करायचे हे एक कोडेच होते. 'एक राज्य - दोन लष्कर' अशी परिस्थिती नेपाळमध्ये निर्माण झाली होती. त्यांचे नेपाळच्या शाही सैन्यात विलीनीकरण करून संपूर्ण सैन्याची पुनर्रचना करण्याची माओवादी पक्षाची इच्छा होती. मात्र, असे झाल्यास नेहमीकरता माओवाद्यांची लष्करावर आणि त्या माध्यमातून सत्तेवर पकड बसेल अशी इतर पक्षांची रास्त भीती होती. वर्षभरापूर्वी सत्ता सूत्रे हाती घेतलेल्या बाबुराम भट्टाराय यांनी हा पेच सोडवण्यास प्राधान्य देत माओवादी सैन्याचा प्रश्न जवळपास मार्गी लावला आहे. बहुतांश माओवादी लढवय्यांनी ठोस रकमेच्या मोबदल्यात निवृत्ती पत्करल्याने इतर पक्षांच्या शंकेचे आपसूकच निरसन झाले आहे. मात्र, संघराज्यात्मक रचनेबाबत राजकीय पक्षांमध्ये कमालीचे मतभेद असल्याने घटना सभेस राज्यघटनेचे प्रारूप तयार करणे शक्य झाले नाही.  राजेशाहीचा अंत होऊन लोकशाही प्रक्रिया सुरु झाल्यावर नेपाळमधील वंचित समाज आणि मागासलेल्या प्रदेशांच्या अस्मितेने उसळी घेतली. नव्या नेपाळमध्ये समान अधिकार आणि विकासाच्या संधी उपलब्ध असलेली व्यवस्था निर्मिती झाली तरच ती राजेशाहीपेक्षा जास्त चांगली पद्धती असेल अशी ठाम भूमिका मधेशी पक्ष तसेच विविध जनजातींच्या प्रतिनिधींनी घेतली. माओवाद्यांनी या भूमिकेला पाठींबा दिला, तर नेपाळी कॉंग्रेस आणि साम्यवादी पक्षाने कधी उघड तर कधी छुपा विरोध दर्शवत एककेंद्री राजकीय व्यवस्था कायम करण्याचे प्रयत्न केलेत. घटक राज्यांची संख्या आणि सीमा निर्धारित करण्यावरून राजकीय पक्षांमधील मतभेद अधिक गडद झाले आहेत.    
या राजकीय पार्श्वभूमीवर, या वर्षी,  नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने, अनेक मुद्द्यांवर अनिर्णयात्मक पेचात अडकलेल्या घटना सभेस मुदतवाढ देण्यास ठाम नकार दिल्याने, तिथे गंभीर पेचप्रसंग उभा राहिला आहे. नेपाळचे पंतप्रधान बाबुराम भट्टाराय यांनी घटना सभा भंग करत त्याच्या नव्याने निवडणुका घेण्याचे फर्मान काढले आहे. मुळात, नेपाळच्या अंतरिम राज्यघटनेमध्ये घटना सभेच्या पुन्हा निवडणुका घेण्याबाबत कुठलीही तरतूद नसल्याने इतर पक्षांनी सुरुवातीला निवडणुकांना विरोध दर्शविला आणि भट्टाराय यांना काळजीवाहू पंतप्रधान म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. घटना सभेने राज्यघटनेची निर्मिती केल्यानंतर, नेपाळी कॉंग्रेसच्या नेतृत्वात एकत्रित सरकारची स्थापना करत सार्वत्रिक निवडणुका घ्यायच्या, अशा प्रकारचा करार नेपाळमधील संसदीय पक्षांनी केला होता. यानुसार आता भट्टाराय यांनी पायउतार होत नेपाळी कॉंग्रेसकडे सरकारचे नेतृत्व सोपवावे अशी या पक्षाची मागणी होती. मात्र, राज्यघटना निर्मिती झालीच नसल्याने पूर्वीचा करार आता लागू होऊ शकत नाही अशी भूमिका माओवादी पक्षाने घेतली आहे. या काळात, नेपाळी कॉंग्रेसला पंतप्रधानपदासाठी पक्षांतर्गत एकाच नावावर सहमती बनवता आली नाही, त्यामुळे सरकारला नेतृत्व देण्याचा त्यांचा दावा कमकुवत झाला; आणि महत्वाचे म्हणजे नेपाळच्या पदच्युत राजाने देशाच्या प्रशासनात महत्वाची भूमिका बजावण्याची इच्छा जाहीर केली, ज्यामुळे सर्व राजकीय पक्षांची राजेशाहीच्या संभाव्य पुनर्वसनाविरुद्ध एकजूट झाली. परिणामी, आता अखेर सर्व महत्वाच्या पक्षांनी घटना सभेच्या निवडणुका पुन्हा घेण्याच्या निर्णय मान्य केला आहे.  
राजकीय पक्षातील सततच्या वादावादीमुळे जनतेचा भ्रमनिरास होऊ लागला आहे. परिणामी, नेपाळचे पदच्युत राजे ग्यानेद्र यांनी पश्चिम नेपाळचा दौरा केला असता त्यांना लोकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. राजेशाहीची पुनर:स्थापना होऊ नये यासाठी आता राजकीय पक्षांना पुन्हा कंबर कसावी लागणार आहे. निवडणुकीच्या जवळच असलेल्या घोडा-मैदानात सगळेच राजकीय पक्ष उतरणार आहेत. या संधीचा उपयोग राजकीय पक्ष राजेशाहीविरुद्ध जनमत सदृढ करण्यासाठी करतात, की एकमेकांवर चिखलफेक करत राजेशाहीची सत्तेत परतण्याची वाट स्वत: तयार करून देतात हे लवकरच कळेल.      

अवघडलेला ड्रेगन


चीनमध्ये राजकीय नेतृत्व परिवर्तनाची प्रक्रिया नियमित आणि सुरळीत करण्याच्या  साम्यवादी पक्षाच्या महत्वाकांक्षी योजनेत सतत व्यत्यय येत आहेत. चीनचे नवे मनोनीत अध्यक्ष, क्शी जीनपिंग, अचानक २ आठवड्यांसाठी सगळ्यांच्या नजरेआड झाल्याने पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांनी एकच खळबळ माजवली. २ सप्टेंबर ला 'भूमिगत' झालेले क्शी, काही घडलेच नसल्याच्या अविर्भावात १५ सप्टेंबरला पुन्हा अवतीर्ण झाले. मात्र, या दरम्यानच्या काळात, त्यांच्या असण्या-नसण्या विषयी शक्य ते सर्व तर्क-कुतर्क लावण्याची मोकळीक आणि त्यातून चीनच्या दुखत्या जखमेवर बोट ठेवण्याची संधी परकीय प्रसार माध्यमांना मिळाली. खरे तर, चीनचे विद्यमान उपाध्यक्ष असलेले क्शी २ आठवडे लोकांपुढे आले नसते तरी फारसे कुणाच्या ध्यानी सुद्धा आले नसते. पण या काळात त्यांनी ३ परदेशी नेत्यांसोबतच्या पूर्व नियोजित बैठका रद्द केल्यामुळे, पाश्चिमात्य जगाने त्यांच्या सार्वजनिक अनुपस्थितीची गंभीर दखल घेतली. सन २०१३ पासून १० वर्षे या व्यक्तीच्या हाती चीनची सत्ता सूत्रे राहणार असल्याने आता त्यांच्या प्रत्येक हालचालीवर आणि विधानावर विश्लेषकांची बारीक नजर आहे. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात पडद्यामागे काय घडामोडी घडल्यात हे निदान क्शी यांचा निर्धारित राजकीय कार्यकाळ संपेपर्यंत पडद्याआड राहण्याचीच जास्त शक्यता आहे. मात्र, चीनमधील सत्तांतराची प्रक्रिया अद्यापही विवादास्पद आहे हे या प्रकरणातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अशा विवादित प्रक्रियेदरम्यान अंतर्विरोधातून साम्यवादी पक्षाचा डोलारा कोसळू शकतो ही पाश्चिमात्यांची आशा मात्र केवळ भाबडेपणा आहे, हे सुद्धा तेवढेच खरे आहे.
चीनच्या साम्यवादी पक्षाच्या वाटेला जन्मापासूनच वैचारिक संघर्ष आणि त्यातून गटा-तटाच्या राजकारणाने ग्रासले आहे. क्रांती साठी संघर्षाच्या काळात आणि समाजवादी राज्य-व्यवस्थेची स्थापना केल्यापासून ते आज गायत, चीनच्या साम्यवादी पक्षात अनेक धोरणात्मक संघर्ष झालेत; ज्यांनी सांस्कृतिक क्रांतीच्या काळात हिंसक रूप सुद्धा धारण केले. मात्र पक्षाच्या अनेक धुरिणांनी राजकीय अत्याचाराच्या काळातही पक्ष न सोडता, पक्षांतर्गत संघर्ष जारी ठेवला होता. परिणामी, प्रत्येक वेळी साम्यवादी पक्ष वैचारिक संघर्षाच्या निखारयातून तावून-सलाखून बाहेर पडला; आणि चीन मधील समाजवादी राजवट कोसळेल असे भवितव्य वर्तवणाऱ्या पंडितांच्या आशेवर नेहमीच पाणी पडले. १९६०-७० च्या दशकात माओ च्या एककल्ली कारभाराला आव्हान देत हाल-अपेष्टा सहन करणारे डेंग क्शिओपिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सन १९७८ नंतर सत्तेत जम बसवल्यावर चीनमध्ये बहु-पक्षीय लोकशाहीला वाव मिळण्याची शक्यता निर्माण आली होती. मात्र, डेंग यांनी साम्यवादी पक्षाच्या लेनिनवादी पक्ष-प्रक्रियेला पुनश्च प्रस्थापित करत, बहुपक्षीय आणि सार्वत्रिक मतदानाच्या राजकीय व्यवस्थेच्या मागण्या धुडकावून लावल्यात.  चीनच्या विकासासाठी साम्यवादी पक्षाचे एक छत्री राज्य आवश्यक असल्याचे त्यांनी जनमनावर ठसवले. आपल्या सिद्धांतावर कायम राहत त्यांनी, लोकशाहीच्या मागणीसाठी तियानमेन चौकात डोके वर काढत असलेले विद्यार्थांचे बंड चिरडून टाकले. मात्र, याच काळात डेंग यांनी साम्यवादी पक्षांतर्गत चर्चा, वाद-विवाद आणि नेतृत्व विकास या प्रक्रिया पद्धतशीर आणि चाकोरीबद्ध साच्यात सुरु करण्याची बीजे रोवलीत. डेंग यांना स्वत: आपल्या कार्यकाळात नेतृत्व परिवर्तनाच्या खाज-खळग्यातून मार्गक्रमण करावे लागले आणि आर्थिक सुधारणांचे समर्थक आणि साशंक यांच्या दरम्यान तारेची कसरत करावी लागली. परिणामी, डेंग यांना 'सर्वोच्च नेतेपद' प्राप्त झाले असतांनाही चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान यांच्या मानेवर कायम पदच्युत होण्याची टांगती तलवार असायची. 
माओच्या निधनानंतर त्याने मनोनीत केलेल्या, पण फारशी नेतृत्व क्षमता नसलेल्या, हुआ गुओफेंगने सन १९७६ ते १९८१ असे चीनचे राष्ट्राध्यक्ष पद भूषवले. सन १९७८ नंतर सत्ता-सूत्रे डेंग च्या हाती असली, तरी माओ चा प्रतिनिधी आणि सर्व गटांमधील तडजोडीमुळे हुआ ला पदावर कायम राहता आले. पण पक्षात निर्णय मात्र बहुमताने होत असल्याने, या काळात खऱ्या अर्थाने चलती डेंग ची होती. सन १९८१ मध्ये डेंग ने पक्षांतर्गत संपूर्ण नियंत्रण मिळवल्यानंतर हुआ ला पायउतार व्हावे लागले आणि धडाडीने आर्थिक सुधारणा राबवणारे हू याओबांग राष्ट्राध्यक्ष झाले. हू च्या काळात, आर्थिक सुधारणांमुळे एकीकडे विषमता वाढीस लागली तर दुसरीकडे राजकीय स्वातंत्र्याचे वारे वाहू लागलेत. यामुळे निर्माण झालेल्या असंतोषामुळे साम्यवादी पक्षाला आव्हान मिळण्यास सुरुवात झाल्याने, सन १९८७ मध्ये पक्षातील 'कट्टरपंथीयांनी' हू ची उचलबांगडी केली आणि झायो झियांग सर्वसंमतीचे उमेदवार म्हणून राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले. मात्र, या बदलाने जमिनीवरील परिस्थितीत फार फरक न पडता नववर्गातील असंतोषाने 'तिआनमेनकडे' कूच केली. सन १९८९ मध्ये परिस्थिती हाताबाहेर गेल्याने झायो झियांग ला तत्काळ पदच्युत करण्यात आले आणि जियांग झेमिन यांची राष्ट्राध्यक्षपदी वर्णी लागली. या संपूर्ण काळात, डेंग ने 'मध्यवर्ती लष्कर समितीचे' प्रमुखपद स्वत:कडे राखून ठेवले आणि त्या माध्यमातून साम्यवादी पक्षावर आणि सरकारवर आपले प्रभुत्व कायम ठेवले. 
'तियानमेन घटनेनंतर' डेंग-जियांग जोडीने, एकीकडे 'आर्थिक सुधारणांचे समर्थक पण बहु-पक्षीय लोकशाहीचे विरोधक' असलेल्यांना पक्ष आणि सरकारमध्ये वरचे स्थान देण्यास सुरुवात केली आणि दुसरीकडे नेतृत्व परिवर्तनाची काही मार्गदर्शक तत्वे बनवलीत. यात प्रामुख्याने समावेश होता: तुलनेत तरुण नेत्यांना संधी द्यायची; साधारण वयाच्या ७० व्या वर्षी त्यांना निवृत्त करायचे; पदाचा कार्यकाळ ५ वर्षांपुरता मर्यादित करायचा; मोठ्या पदावर दोन पेक्षा जास्त कार्यकाळ द्यायची नाहीत इत्यादी. डेंग-जिआंग यांच्या योजनेनुसार, राष्ट्राध्यक्ष, मध्यवर्ती लष्करी समितीचे प्रमुखपद आणि पक्षाचे महासचिव पद एकाच व्यक्तीकडे ठेवायचे असे अलिखितपणे ठरवण्यात आले. यानुसार, डेंग ने सन १९९२ पर्यंत मध्यवर्ती लष्करी समितीचे प्रमुखपद स्वत:कडे राखले आणि पक्षाच्या अधिवेशनात जिआंग च्या महासचिव पदावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर ते पद त्याच्या सुपूर्द केले. जिआंग ने राष्ट्राध्यक्षपद सोडल्यानंतर, २ वर्षे  मध्यवर्ती लष्करी समितीचे प्रमुखपद आपल्याकडे ठेवले आणि सन २००४ मध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष हु जिंताव  यांना हे पद मिळाले. सन २००२ मध्ये जिआंग झेमिन यांच्याकडून हु जिंताव यांच्याकडे झालेले सत्तार्पण, हे चीनच्या ५,००० हुन अधिक वर्षांच्या इतिहासातले पहिले सुनियोजित-शांततापूर्ण नेतृत्व परिवर्तन होते. हा अपवाद नसून, चीनचे राजकारण आता साम्यवादी पक्षाच्या प्रभुत्वात स्थिरावले आहे, हे जगापुढे ठसवण्यासाठी पुढील सत्तांतर तेवढ्याच सुबकपणे पार पाडण्याचे आव्हान सध्याच्या नेतृत्वापुढे उभे ठाकले आहे. 
सन २००७ च्या १७ व्या पंचवार्षिक पक्ष अधिवेशनात क्शी जिनपिंग आणि ली केचीआंग यांचा पोलीट ब्युरोच्या ९-सदस्यीय स्थायी समितीमध्ये समावेश करत त्यांना सरकारमध्ये अनुक्रमे उप-राष्ट्राध्यक्षपद आणि उप-पंतप्रधानपद देण्यात आले. सन २०१२ च्या ऑक्टोबर मध्ये होऊ घातलेल्या पक्षाच्या १८ व्या अधिवेशनात क्शी पक्षाचे महासचिव होण्याचे आधीच निश्चित करण्यात आले आहे, आणि पुढील वर्षी मार्च मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय संसदेच्या अधिवेशनात क्शी राष्ट्राध्यक्षपदाची आणि ली पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. सध्याच्या ९-सदस्यीय स्थायी समितीतील हे दोघे वगळता इतर ७ नेते निवृत्त होणार आहेत आणि त्यांच्या जागी वर्णी लागण्यासाठी दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरु आहे. अशा क्षणी क्शी २ आठवडे 'नाहीसे' झाले होते आणि ऑक्टोबर मधील अधिवेशनाच्या तारखांची अधिकृत घोषणा सुद्धा अद्याप करण्यात आलेली नसल्याने या नेतृत्व बदलाबाबत अफवांना महापूर आला होता. क्शी यांनी आता स्वत:चे जनदर्शन घडवल्याने या अफवांना आहोटी लागली असली तरी शंकेची पाल अखेरपर्यंत मनात चुकचुकत राहणार हे नक्की!      

Thursday, September 6, 2012

नाम परिषदेतील भारताची कमाई


१२० देशांच्या गट-निरपेक्ष आंदोलनाची (नाम) १६ वी त्री-वार्षीक परिषद् अनेक अर्थांनी महत्वपूर्ण ठरली. नव्या जागतीक परिस्थितीमध्ये गट-निरपेक्षता संदर्भहीन ठरली आहे, असा सुर अनेक अभ्यासक लावत असतांना, नाम च्या तेहेरान परिषदेस ३१ राष्ट्र-प्रमुख, इतर ८९ सदस्य देशांचे वरिष्ठ प्रतिनिधी, २० पेक्षा जास्त देशांचे निरीक्षक आणि संयुक्त राष्ट्राचे महासचिव यांनी उपस्थिती लावत या आंदोलनाचे महत्व अधोरेखीत केले. संयुक्त राष्ट्र संघटनेनंतर सर्वाधीक देशांची सदस्यता असलेल्या नाम चे अस्तित्व अणि उद्दिष्टे नेहमी वादग्रस्त ठरली आहेत. त्यात, यंदाची परिषद् इराण च्या राजधानीत भरवण्यात आल्याने त्याला संभाव्य अमेरिका-इराण आणि इस्राएल-इराण युद्धाची, तसेच अरब देशांमध्ये घडत असलेल्या राजकीय उलथा-पालथीची पार्श्वभूमी लाभली होती. भारतातर्फे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांनी परिषदेस हजर राहत गट-निरपेक्ष आंदोलनाप्रतीची कटीबद्धता व्यक्त केली.  या निमित्त्याने डॉ. मनमोहन सिंग यांनी, सलग तिसऱ्या नाम परिषदेस उपस्थित राहण्याचा दुर्मिळ योगसुद्धा  साधला. सन २००६ च्या हवाना परिषदेत आणि सन २००९ च्या शर्म-एल-शेख परिषदेत डॉ. सिंग जातीने उपस्थित होते. डॉ. मनमोहन सिंग यांनी तेहेरान परिषदेच्या निमित्त्याने पुन्हा एकदा भारतासाठी असलेले नाम चे महत्व आंतरराष्ट्रीय समुदायापुढे ठसवून दिले. नाम चा संस्थापक सदस्य असणे आणि पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या, 'महाशक्तींच्या लष्करी गटा-तटाच्या राजकारणापासून नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांना दूर ठेवण्याच्या' धडपडीचे नाम हे फलीत असणे, एवढेच या मंचाचे भारतासाठी महत्व नाही. भारताच्या आजच्या परराष्ट्र धोरणांना नाम तेवढेच पोषक आहे जेवढे २० वर्षांपूर्वी होते! 

शीत युद्ध संपले असले, तरी बड्या राष्ट्राची शीत युद्ध-कालीन मानसिकता कायम आहे. शीत युद्धानंतर अमेरिकेने नॉर्थ एटेलांतीक ट्रीटी ऑरगनायझेशन (नाटो) ला बरखास्त न करता त्या द्वारे युगोस्लाविया, अफगाणिस्तान, लिबिया या देशांमध्ये सशस्त्र हस्तक्षेप घडवून आणले. दुसरीकडे रशियाने पूर्वाश्रमीच्या सोविएत संघातील गणराज्यांशी लष्करी संधी करत नाटो ला समर्थ पर्याय उभे करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. गरीब आणि विकसनशील देशांना आपल्या फायद्यासाठी लष्करी गठबंधनात येण्यास भाग पाडायचे, तसेच आपल्याला पूरक नसणारया राजवटी सशस्त्र हस्तक्षेपाने उलटवून टाकायच्या हे बड्या राष्ट्राचे जुने धोरण अद्याप कायम असल्याने, गट-निरपेक्ष आंदोलनाची गरज आधी सारखी आजही आहे असे भारताचे मत आहे. जगात केवळ एक महासत्ता असो अथवा दोन किंव्हा त्याहून जास्त महासत्ता असो, विकसनशील देशांनी या पैकी कुठल्याही महासत्तेशी लष्करी आणि सामरिक संधी करणे हे त्यांच्या विकासाला मारक आणि स्वातंत्र्यावर घाला आणणारे ठरण्याची जास्त शक्यता आहे, हे भारताचे मत अद्याप कायम आहे. उदाहरणार्थ, भारत जर नाटो चा सदस्य असता तर भारताला अफगाणिस्तान आणि लिबिया या देशांतील सशस्त्र मोहिमांमध्ये सहभागी होणे भाग पडले असते, मग त्यात भारताचे राष्ट्रीय हित समाविष्ट असो किंव्हा नसो! विकसनशील राष्ट्रांनी बड्या राष्ट्रांच्या प्रलोभनाला, तसेच दबावाला, बळी न पडता आपले सामरिक स्वातंत्र्य जपावे या साठी गट-निरपेक्ष आंदोलनाच्या आधाराची आवश्यकता आहे. नजीकच्या भविष्यात जागतिक राजकारणात अमेरिका आणि चीन अशी दोन सत्ता-केंद्रे अस्तित्वात येण्याची दाट शक्यता आहे, तेव्हा गट-निरपेक्ष आंदोलनाची धग कायम ठेवत, इतर देश या दोन पैकी एका देशाच्या गटात सहभागी होणार नाही हे सुनिश्चित करणे भारताच्या हिताचे आहे. 

तेहेरान परिषदेत केलेल्या भाषणात, डॉ.  मनमोहन सिंग यांनी पाश्चिमात्य देशांच्या एकतर्फी आणि मनमानी लष्करी कारवायांना असलेला भारताचा विरोध स्पष्ट करत अनेक छोट्या आणि विकसनशील देशांचा विश्वास संपादन केला. भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाची चुणूक दाखवत, डॉ सिंग यांनी, येत्या काळात सिरीया मध्ये बाह्य शक्तींच्या हस्तक्षेपाला विरोध दर्शविला. सिरीया किव्हा इतर अरब देशांमधील राजकीय बदलाची प्रक्रिया त्या-त्या देशांमधील लोकांनी आपणहून सोडवणे आवश्यक आहे, अन्यथा घडून येणारा बदल दिर्घकालीन न राहता यादवी-सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन त्या देशांच्या अर्थ-व्यवस्थेची राखरांगोळी होईलच, पण अल-कायदा सारख्या जहाल संघटनांना आपले जाळे पसरवण्यास मोकळा वाव मिळून आंतरराष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येईल, या परिपक्व भूमिकेतून डॉ. सिंग यांनी भारताचे भूमिका स्पष्ट केली. या सोबत, पैलेस्तीन प्रश्नावर पैलीस्तीनी लोकांच्या स्वातंत्र्याला केंद्र स्थानी ठेऊन समाधान शोधले जात नाही, तो वर अरब प्रदेशांत शांतता राबू शकत नाही, तसेच इस्लामिक दहशतवादाचा एक प्रमुख स्त्रोत बंद होणार नाही या कडे डॉ. सिंग यांनी लक्ष वेधले.

भारताला विद्यमान जागतिक व्यवस्थेत, म्हणजे संयुक्त राष्ट्र, जागतिक बैंक, आंतरराष्ट्रीय नाणे निधी यामध्ये, बदल घडवून आणत त्यातील आपले अधिकार आणि जबाबदारी वाढवायची आहे. या संस्थांच्या सुधारणांना बड्या राष्ट्रांकडून फारसे समर्थन प्राप्त नाही, तेव्हा हे बदल घडवून आणण्यासाठी भारताला संयुक्त राष्ट्रातील अन्य देशांच्या समर्थनाची गरज आहे. नाम परिषदेत हे समर्थन प्राप्त करण्याची संधी डॉ. सिंग यांनी गमावली नाही. आपल्या संबोधनात त्यांनी आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये आजच्या परिस्थितीनुसार बदल घडवून आणत विकसनशील देशांना जास्तीत जास्त वाटा देण्याची मागणी पुढे रेटली. बड्या राष्ट्रांच्या धोरणांनुसार चालणाऱ्या जागतिक बैंक आणि आंतरराष्ट्रीय नाणे निधी वरील विकसनशील देशांचे परावलंबित्व संपवण्यासाठी,  डॉ. सिंग यांनी विकसनशील देशांच्या नव्या बैंकेची संकल्पना मांडली. भारत सदस्य असलेल्या 'ब्रिक्स' देशांच्या गटाने या संदर्भात या आधीच ठोस सुरुवात केली आहे. त्याला इतर विकसनशील आणि गरीब देशांचे समर्थन मिळवण्याचे महत्वपूर्ण काम डॉ. सिंग यांनी तेहेरान परिषदेत केले. 'ब्रिक्स' देशांपैकी केवळ भारत हा नाम चा मूळ सदस्य आहे. 'ब्रिक्स' गटातील दक्षिण आफ्रिकेने वंशवादी राजवटीच्या समाप्तीनंतर नाम चे सदस्यत्व घेतले आहे, तर ब्राझील आणि रशिया हे देश नाम मध्ये निरीक्षक आहेत आणि नाम बाबत चीन ची भूमिका नेहमीच द्विधा राहिलेली आहे. त्यामुळे इतर विकसनशील देशांचे नेतृत्व करण्याची संधी आपसूक भारताला मिळाली आहे.

नाम परिषदेच्या निमित्याने यजमान देशांशी द्वि-पक्षीय संबंध मजबूत करण्याच्या संधीचा भारताने नेहमीच पुरेपूर लाभ उचलला आहे. त्याशिवाय, इतर देशांच्या प्रमुखांशी चर्चा करणे आणि त्या-त्या देशांशी सलोखा वाढवणे या परिषदेच्या निमित्याने साध्य होते. डॉ. सिंग आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ जरदारी यांच्या भेटीबद्दल बरीच उत्सुकता होती. मात्र, या भेटीतून विशेष काही साध्य झाले नाही. फक्त, डॉ. सिंग पाकिस्तान दौऱ्यावर जातात का आणि गेले तर कधी, या बाबतची उत्सुकता आणखी ताणल्या गेली आहे. तेहेरान परिषदेच्या पार्श्वभूमीवर इराणशी झालेली व्यापक द्वि-पक्षीय चर्चा ही भारतासाठी मोठी उपलब्धी आहे. मागील काही वर्षांपासून भारताचे अमेरिकेशी मैत्रीपूर्ण संबंध वाढीस लागल्यानंतर इराणशी असलेल्या सलोख्याला ओहोटी लागली होती. खरे तर, इराण हा भारताचा परंपरागत व्यापारी मित्र आहे आणि आता उशिराने का होईना दोन्ही देशांनी व्यापारी संबंध पुन्हा दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. या साठी, इराणने तेल-वाहू जहाजांना पूर्ण इंशुरेंस ची सोय करण्याची जबाबदारी उचलली आहे. शिवाय, तेलाच्या रक्कमेची मोठी टक्केवारी भारतीय रुपयांच्या स्वरूपात स्वीकारण्याची तयारी दाखवली आहे. याशिवाय, इराणने छबहार बंदर विकसित करण्याच्या भारताच्या  इच्छेला हिरवा कंदील दाखवला आहे. या बंदरामार्गे अफगाणिस्तानातून आयात-निर्यात करण्यासाठी योजना बनवण्यासाठी या तीन देशांची कार्य समिती स्थापन करण्यात आली आहे. भारतासाठी नाम परिषदेच्या निमित्याने घडलेल्या या महत्वपूर्ण घडामोडी आहेत. तेहेरान परिषदेवर अमेरिका आणि युरोपीय संघाची खप्पा मर्जी असली, तरी मुळात बड्या राष्ट्रांच्या मनमानीला मोकळा वाव असू नये हे गट-निरपेक्षतेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या दृष्टीकोनातून, तसेच विकसनशील देशांपुढे सामुहिक अजेंडा ठेवणे आणि इराणशी द्वि-पक्षीय संबंध वृद्धिंगत करण्याच्या दिशेने पाऊले पडल्याने भारतासाठी तेहेरान परिषद निर्विवादपणे यशस्वी ठरली आहे. 

नाम' मध्ये काय ठेवलय?


गट-निरपेक्षता हवी आहे का; ती फायद्याची आहे  का; खरी गट-निरपेक्षता शक्य आहे का इत्यादी नेहमीच्या प्रश्नांच्या घोळात नाम ची १६ वी त्री-वार्षिक परिषद तेहरान इथे पार पडली. सन १९६१ मध्ये बेलग्रेड इथे गट-निरपेक्षता आंदोलनाची अधिकृत मुहूर्तमेढ रोवतांना सुद्धा हेच प्रश्न विचारण्यात आले होते आणि तेव्हा पासून आतापर्यंत या प्रश्नांचे पूर्ण समाधानकारक उत्तर मिळाले नसले तरी नाम ची सदस्यता सातत्याने वाढतच आहे. ज्या शीत युद्धाच्या प्रकोपासून दूर राहण्यासाठी नाम ची सुरुवात झाली होती, ते शीत युद्ध इतिहास जमा झाले असले तरी नाम अद्याप कायम आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस इराणची राजधानी तेहेरान इथे भरलेल्या १६ व्या नाम परिषदेस ३१ राष्ट्र-प्रमुख, इतर ८९ सदस्य देशांचे वरिष्ठ प्रतिनिधी, २० पेक्षा जास्त देशांचे निरीक्षक आणि संयुक्त राष्ट्राचे महासचिव हजर होते. रशियाने परिषदेस शुभेच्छा दिल्या होत्या, तर अमेरिकेने इराण ला पुढील ३ वर्षांसाठी नाम चे अध्यक्ष घोषित करत तेहेरान इथे परिषद बोलावण्याच्या निर्णयावर प्रश्न उभे केलेत. तेहरान परिषदेबाबत अमेरिका आणि रशियाने घेतलेल्या या परस्पर विरोधी भूमिकांमध्ये नाम ची प्रासंगीकता दडलेली आहे.    

शीत युद्ध संपले असले, तरी बड्या राष्ट्राची शीत युद्ध-कालीन मानसिकता कायम आहे. शीत युद्धानंतर अमेरिकेने नॉर्थ एटेलांतीक ट्रीटी ऑरगनायझेशन (नाटो) ला बरखास्त न करता त्या द्वारे युगोस्लाविया, अफगाणिस्तान, लिबिया या देशांमध्ये सशस्त्र हस्तक्षेप घडवून आणले. दुसरीकडे रशियाने पूर्वाश्रमीच्या सोविएत संघातील गणराज्यांशी लष्करी संधी करत नाटो ला समर्थ पर्याय उभे करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. गरीब आणि विकसनशील देशांना आपल्या फायद्यासाठी लष्करी गठबंधनात येण्यास भाग पाडायचे, तसेच आपल्याला पूरक नसणारया राजवटी सशस्त्र हस्तक्षेपाने उलटवून टाकायच्या हे बड्या राष्ट्राचे जुने धोरण अद्याप कायम असल्याने, गट-निरपेक्ष आंदोलनाची गरज आधी सारखी आजही आहे. जगात केवळ एक महासत्ता असो अथवा दोन किंव्हा त्याहून जास्त महासत्ता असो, विकसनशील देशांनी या पैकी कुठल्याही महासत्तेशी लष्करी आणि सामरिक संधी करणे हे त्यांच्या विकासाला मारक आणि स्वातंत्र्यावर घाला आणणारे ठरण्याची जास्त शक्यता आहे. उदाहरणार्थ, भारत जर नाटो चा सदस्य असता तर भारताला अफगाणिस्तान आणि लिबिया या देशांतील सशस्त्र मोहिमांमध्ये सहभागी होणे भाग पडले असते, मग त्यात भारताचे राष्ट्रीय हित समाविष्ट असो किंव्हा नसो! विकसनशील राष्ट्रांनी बड्या राष्ट्रांच्या प्रलोभनाला, तसेच दबावाला, बळी न पडता आपले सामरिक स्वातंत्र्य जपावे या साठी गट-निरपेक्ष आंदोलनाच्या आधाराची आवश्यकता आहे. नजीकच्या भविष्यात जागतिक राजकारणात अमेरिका आणि चीन अशी दोन सत्ता-केंद्रे अस्तित्वात येण्याची दाट शक्यता आहे, तेव्हा गट-निरपेक्ष आंदोलनाची धग कायम ठेवत, इतर देश या दोन पैकी एका देशाच्या गटात सहभागी होणार नाही हे सुनिश्चित करणे भारताच्या हिताचे आहे. नाम चा संस्थापक सदस्य असणे आणि पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या, 'महाशक्तींच्या लष्करी गटा-तटाच्या राजकारणापासून नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांना दूर ठेवण्याच्या' धडपडीचे नाम हे फलीत असणे, एवढेच या मंचाचे भारतासाठी महत्व नाही. भारताच्या आजच्या परराष्ट्र धोरणांना नाम तेवढेच पोषक आहे जेवढे २० वर्षांपूर्वी होते!  

साहजिकपणे, भारताचा तेहेरान परिषदेतील सहभाग सर्वोच्च पातळीवर होता. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांनी परिषदेस हजर राहत गट-निरपेक्ष आंदोलनाप्रतीची भारताची कटीबद्धता व्यक्त केली.  या निमित्त्याने डॉ. मनमोहन सिंग यांनी, सलग तिसऱ्या नाम परिषदेस उपस्थित राहण्याचा दुर्मिळ योगसुद्धा  साधला. सन २००६ च्या हवाना परिषदेत आणि सन २००९ च्या शर्म-एल-शेख परिषदेत डॉ. सिंग जातीने उपस्थित होते. जागतिक राजकारणात नव्याने पुढे आलेल्या 'ब्रिक्स' गटातील देशांपैकी केवळ भारत हा नाम चा मूळ सदस्य आहे. 'ब्रिक्स' गटातील दक्षिण आफ्रिकेने वंशवादी राजवटीच्या समाप्तीनंतर नाम चे सदस्यत्व घेतले आहे, तर ब्राझील आणि रशिया हे देश नाम मध्ये निरीक्षक आहेत आणि नाम बाबत चीन ची भूमिका नेहमीच द्विधा राहिलेली आहे. त्यामुळे, नाम च्या माध्यमातून इतर विकसनशील देशांचे नेतृत्व करण्याची संधी आपसूक भारताला मिळाली आहे. भारताला विद्यमान जागतिक व्यवस्थेत, म्हणजे संयुक्त राष्ट्र, जागतिक बैंक, आंतरराष्ट्रीय नाणे निधी यामध्ये, बदल घडवून आणत त्यातील आपले अधिकार आणि जबाबदारी वाढवायची आहे. या संस्थांच्या सुधारणांना बड्या राष्ट्रांकडून फारसे समर्थन प्राप्त नाही, तेव्हा हे बदल घडवून आणण्यासाठी भारताला संयुक्त राष्ट्रातील अन्य देशांच्या समर्थनाची गरज आहे. नाम परिषदेत हे समर्थन प्राप्त करण्याची संधी भारताने गमावली नाही. भारताने आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये आजच्या परिस्थितीनुसार बदल घडवून आणत विकसनशील देशांना जास्तीत जास्त वाटा देण्याची मागणी पुढे रेटली. बड्या राष्ट्रांच्या धोरणांनुसार चालणाऱ्या जागतिक बैंक आणि आंतरराष्ट्रीय नाणे निधी वरील विकसनशील देशांचे परावलंबित्व संपवण्यासाठी,  भारताने विकसनशील देशांच्या नव्या बैंकेची संकल्पना मांडली. भारत सदस्य असलेल्या 'ब्रिक्स' देशांच्या गटाने या संदर्भात या आधीच ठोस सुरुवात केली आहे. त्याला इतर विकसनशील आणि गरीब देशांचे समर्थन मिळवण्याचे महत्वपूर्ण काम भारताने  तेहेरान परिषदेत केले.

तेहेरान परिषदेत केलेल्या भाषणात, डॉ.  मनमोहन सिंग यांनी पाश्चिमात्य देशांच्या एकतर्फी आणि मनमानी लष्करी कारवायांना असलेला भारताचा विरोध स्पष्ट करत अनेक छोट्या आणि विकसनशील देशांचा विश्वास संपादन केला. भारताने आपल्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाची चुणूक दाखवत, येत्या काळात सिरीया मध्ये बाह्य शक्तींच्या हस्तक्षेपाला विरोध दर्शविला. सिरीया किव्हा इतर अरब देशांमधील राजकीय बदलाची प्रक्रिया त्या-त्या देशांमधील लोकांनी आपणहून सोडवणे आवश्यक आहे, अन्यथा घडून येणारा बदल दिर्घकालीन न राहता यादवी-सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन त्या देशांच्या अर्थ-व्यवस्थेची राखरांगोळी होईलच, पण अल-कायदा सारख्या जहाल संघटनांना आपले जाळे पसरवण्यास मोकळा वाव मिळून आंतरराष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येईल, या परिपक्व विचारांतून भारताने आपली भूमिका स्पष्ट केली. .

तेहेरान परिषदेच्या पार्श्वभूमीवर इराणशी झालेली व्यापक द्वि-पक्षीय चर्चा ही भारतासाठी मोठी उपलब्धी आहे. मागील काही वर्षांपासून भारताचे अमेरिकेशी मैत्रीपूर्ण संबंध वाढीस लागल्यानंतर इराणशी असलेल्या सलोख्याला ओहोटी लागली होती. खरे तर, इराण हा भारताचा परंपरागत व्यापारी मित्र आहे आणि आता उशिराने का होईना दोन्ही देशांनी व्यापारी संबंध पुन्हा दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. या साठी, इराणने तेल-वाहू जहाजांना पूर्ण इंशुरेंस ची सोय करण्याची जबाबदारी उचलली आहे. शिवाय, तेलाच्या रक्कमेची मोठी टक्केवारी भारतीय रुपयांच्या स्वरूपात स्वीकारण्याची तयारी दाखवली आहे. याशिवाय, इराणने छबहार बंदर विकसित करण्याच्या भारताच्या  इच्छेला हिरवा कंदील दाखवला आहे. या बंदरामार्गे अफगाणिस्तानातून आयात-निर्यात करण्यासाठी योजना बनवण्यासाठी या तीन देशांची कार्य समिती स्थापन करण्यात आली आहे. भारतासाठी नाम परिषदेच्या निमित्याने घडलेल्या या महत्वपूर्ण घडामोडी आहेत.

भारताला  जागतिक शक्तीच्या रुपात स्वत:ला प्रस्थापित करावयाचे असेल तर दुसऱ्या-तिसऱ्या कोणत्याही जागतिक सत्ता-केंद्राभोवती न घुटमळता स्वत:चे आगळे वेगळे स्थान निर्माण करणे आवश्यक आहे. नाम ची पायाभरणी झाली होती त्यावेळी भारताचे चांगले हेतू होते, पण त्याला पूरक शक्ती नव्हती. आज भारताची शक्ती कित्येक पट वाढली आहे, आणि नाम च्या माध्यमातून आपल्या हेतूंना आंतरराष्ट्रीय राजकारणात  अंमलात आणण्याचे मार्ग भारताला शोधावयाचे आहेत. याची सुरुवात तेहेरान परिषदेत झाली आहे, पण सातत्य कायम राखणे गरजेचे आहे.     

मंगळाच्या राशीला पृथ्वीचे योग


एके काळी समुद्र उल्लंघन निषिद्ध मानणाऱ्या भारताने स्वातंत्र्यानंतर कात टाकत विज्ञान आणि तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीच्या जोरावर आता मंगळ ग्रहाला गवसणी घालण्याचे ध्येय निश्चित केले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था, म्हणजे इस्रोच्या मंगळायानाच्या प्रस्तावाला सरकारने मान्यता देत, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी स्वतंत्रता दिनी केलेल्या भाषणात भारताच्या मंगळ मोहिमेचा शंखनाद केला. अमेरिका, रशिया, जापान, चीन आणि युरोप पाठोपाठ मंगळावर संशोधनासाठी मानव-विरहीत यान पाठवणारा भारत सहावा देश ठरणार आहे. चंद्रायनच्या यशस्वी झेपेनंतर इस्रोचे संशोधनयान आता मंगळाच्या घिरट्या घालण्यासाठी नोव्हेंबर २०१३ मध्ये अवकाशात झेपावणार आहे. चंद्राच्या ध्रुवावर पाण्याचे पुरावे शोधण्यात चंद्रयान मोहिमेला ऐतिहासिक यश मिळाले होते. इस्रोचे मंगळायन यापेक्षा अधिक यशस्वी होऊन, माणसाच्या पाऊलखुणा उमटवण्याच्या मोहिमेतील मैलाचा दगड ठरेल अशी अपेक्षा करूया! 

अगदी अलीकडे, अमेरिकी संशोधन संस्था, नासाच्या 'क्युरॉसिटी' रोव्हरने मंगळ ग्रहावर, अत्यंत कठीण परीक्षांचा सामना करत, यशस्वीरीत्या लंगर टाकल्याने भारतासह जगभरातील शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास बळावला आहे. क्युरॉसिटी' ला मंगळावर उतरवण्याचा उपक्रम नासाचा असला, तरी यात भारतासह अनेक देशांच्या वैज्ञानिकांचे भरघोस योगदान आहे. यापैकी, शास्त्रज्ञ अमिताभ घोष हे नासाच्या त्या महत्वपूर्ण चमूत सहभागी होते, ज्याने क्युरॉसिटीची मंगळावरील गेल विवरातील उतरण्याची नेमकी जागा निश्चित केली होती. घोष यांनी सांगितले की, पृथ्वीपासून २४,७८,३८,९७६ किमी दूरीवर असलेल्या या जागेचा भूतकाळ ओलाचिंब असण्याची शक्यता असल्याने त्या जागेची निवड करण्यात आली. निरीक्षणांतून असे आढळले होते की या ठिकाणी माती आणि सल्फेटचे  थर आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागावर अश्या प्रकारचे थर पाण्यामुळे निर्माण झाले आहेत. मंगळावरील अशा जागेचे परीक्षण केल्यास या ग्रहावर पूर्वी पाणी उपलब्ध होते की नाही याबाबत निश्चित पुरावे मिळू शकतील. गेल विवराच्या मध्यभागी मंगळाचा पृष्ठभाग पर्वतासारखा उंचावला असून, क्युरॉसिटी कालांतराने यावर चढाई करणार आहे. या पर्वताच्या माथ्यावर वेगवेगळे थर वैज्ञानिकांना आढळले असून, प्रत्येक थर हा मंगळावर विविध काळखंडातील वातावरणाची साक्ष देणारा ठरू शकतो.

क्युरॉसिटी प्रत्यक्ष मंगळावरील जीवनाचा शोध घेणार नाही, पण जीवनाच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेली रसायने काही मात्रेत तरी उपलब्ध आहेत का याबाबत संशोधन करणार आहे. मंगळ संशोधनाच्या सुरुवातीच्या काळात, म्हणजे सन १९७६ मध्ये नासाच्या वायकिंग मिशनने या ग्रहावर जीवनाच्या शक्यतेबाबत प्रयोग केले होते. या प्रयोगांमधून मंगळावर सध्या कुठल्याही प्रकारे जीवन अस्तित्वात असल्याचे सिद्ध झाले नाही असे नासाने अधिकृतरीत्या स्पष्ट केले होते. मात्र, या मोहिमांतील प्रयोगांची रूपरेखा तयार करणाऱ्या चमूचे प्रमुख, गिल्बर्ट लेवीन अजूनही दावा करतात की त्यांना मंगळावर जीवनाचे प्रमाण सापडले होते. सन १९७६ च्या मोहिमांमध्ये २ अवकाशयाने एकाचवेळी मंगळावर उतरली होती आणि त्यांनी बरेच प्रयोग केले होते. यापैकी एका प्रयोगामध्ये पृथ्वीवरून नेलेली प्रोटीनची मात्रा मंगळाच्या मातीत मिसळण्यात आली आणि मातीतील जीवाणू त्याचे प्राशन करून कार्बन डायऑक्षाइड सोडतात का हे तपासण्यात आले. आश्चर्य म्हणजे, शास्त्रज्ञांना कार्बन डायऑक्षाइड सोडण्यात येत असल्याचे ध्यानात आले. ती माती तापवल्यानंतर ही प्रक्रिया बंद पडली. मात्र, वायकिंगच्या इतर कोणत्याही प्रयोगांना इतपत यश मिळू शकले नाही. त्यामुळे, अत्यंत अत्यल्प प्रमाणात सोडण्यात आलेला कार्बन डायऑक्षाइड हा जीवाणूंनी सोडला होता की विशिष्ट प्रकारच्या मातीत प्रोटीन मिसळल्याने झालेली रासायनिक प्रक्रिया होती हे नक्की कळू शकले नाही. मंगळावरील मातीचे संपूर्ण ज्ञान नसल्याने याबाबत तर्क लावणे सुद्धा शक्य नाही. त्यात,  'जीवनाच्या' व्याख्येबद्दल शास्त्रज्ञांमध्ये अजूनही एकमत नाही, आणि जीवनाचे किती विविध प्रकार विश्वात अस्तित्वात असू शकतील याबाबत अनेकानेक मते आहेत. त्यामुळे, यानंतर नासाने मंगळावर प्रत्यक्ष जीवनाचा शोध घेणे थांबवले.

मंगळाला जवळीक करणारे वातावरण पृथ्वीवर ज्या ठिकाणी आहे, तिथे कशा प्रकारचे जीवन अस्तित्वात आहे याचा सुद्धा शास्त्रज्ञांनी शोध लावण्याचा प्रयत्न करत, तसाच काही प्रकार मंगळावर असू शकेल का असा प्रश्न उपस्थित केला. मंगळ अत्याधिक थंड आणि कोरडा ग्रह आहे. यापैकी कोरडेपणा हा जीवनाच्या अस्तित्वातील जास्त मोठा अडथळा आहे, कारण पाण्याशिवाय जीवन अस्तित्वात असू शकत नाही या संकल्पनेस तडा जाईल असे कुठलेही पुरावे अद्याप शास्त्रज्ञांकडे नाहीत. चिली देशातील अटाकामा वाळवंट हे पृथ्वीवरील सर्वात कोरडे स्थान म्हणून ओळखले जाते. गेली कित्येक वर्षे अंतराळ-जैवशास्त्रज्ञ अटाकामाच्या जमिनीत काही जीवाणू तग धरून आहेत का याचा शोध घेत होते. त्यांना यश मिळत नसल्याने मंगळावर जीवाणूंच्या अस्तित्वाची शक्यता सुद्धा जवळपास मावळली होती. पण, सन २००६ मध्ये स्पेनच्या विद्यापीठातील एका रसायनतज्ञांना तिथल्या मिठाच्या खडकासारख्या मातीत जीवाणूंचे अनेक नवे प्रकार आढळलेत आणि याप्रमाणे मंगळावरसुद्धा जीवाणू कुठल्या ना कुठल्या स्वरूपात सापडू शकतील या धारणेस बळ मिळाले.

अणुउर्जेवर कार्यान्वित क्युरॉसिटी किमान १ वर्षे ९ महिने मंगळावर अहोरात्र कार्यरत असणार आहे. मंगळावरील जीवनसापेक्षतेचा शोध लावण्याच्या दृष्टीने क्युरॉसिटीचे प्रयोग किती मदतगार सिद्ध होतात हे काही वर्षांनीच कळू शकेल. मात्र, सुमारे ८९० किलो वजनाची ही कारच्या आकाराची प्रयोगशाळा यशस्वीपणे मंगळावर उतरवण्यात यश आल्याने, भविष्यात मानवजातीने या ग्रहावर तंबू ठोकण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल पुढे पडले आहे. सन २०३० पर्यंत मंगळ जिंकण्याच्या नासाच्या महत्वकांक्षेला ओबामा प्रशासनाने नुकताच हिरवा कंदील दिला आहे. मंगळावरील मानवाची स्वारी ही चंद्रावरील यात्रेसारखी अगदी कमी काळाची न राहता तो एक प्रदीर्घ प्रयोग ठरणार आहे. मानवी यानाला मंगळावर पोचायला किमान ६ महिने लागतील आणि तिथले अंतराळवीरांचे वास्तव्य तब्बल १८ महिन्याचे असण्याचे संकेत नासाकडून देण्यात येत आहेत. आजपासून १८ वर्षांनी होऊ घातलेल्या प्रस्तावित मंगळ - यात्रेतील प्रवाश्यांच्या भोजनाबाबत आधीच संशोधन सुरु झाले आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन केंद्रात ठाण मांडून बसणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी नासाच्या मेनूकार्ड वर १०० हुन अधिक पदार्थ आहेत. पण, हा मेनू मंगळावर निरुपयोगी ठरेल कारण ते सर्व पदार्थ पृथ्वीवर तयार करून अंतराळ केंद्रात नियमितपणे पोचवण्यात येतात. ही सुविधा मंगळावरील वैज्ञानिकांना उपलब्ध नसेल. मात्र, आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्राप्रमाणे मंगळ पूर्णपणे गुरुत्वाकर्षण-रहित नाही. त्यामुळे, तिथे प्रेशर कुकरच्या वापरासह भाज्या-फळे चिरायचे पर्याय विकसित करण्याच्या प्रयत्नात नासाचे तज्ञ आहेत. सध्या नासाच्या १७ बिलियनच्या आर्थिक तरतुदींपैकी मंगळ ग्रहावर अंतरीक्ष यात्रींच्या खाण्या-पिण्यासंबंधीत मेनू तयार करण्यावर १ मिलियन एवढी रक्कम खर्च होते आहे.  

येत्या दिवसांमध्ये मंगळावर वसाहत निर्माण करण्याच्या दृष्टीने अमेरिका, युरोप, रशिया आणि चीन हे देश प्रयत्नांची पराकाष्ठा करतील यात शंका नाही. या शर्यतीत जपान सुद्धा उतरला आहे आणि भारताने आपण मागे राहणार नाही याचा सुतोवाच केला आहे. मात्र, मंगळ मोहिमांवर होणारा अवाढव्य खर्च ध्यानात घेता, मंगळावर कूच करण्याबाबत आंतरराष्ट्रीय स्पर्धा निर्माण होणे मानव जातीच्या हिताचे नाही. त्या ऐवजी संयुक्त राष्ट्राच्या नियंत्रणाखाली सर्वदेशीय सहकार्याने मंगळावर पोहोचणे सोयीस्कर आणि हितावह आहे. अन्यथा, पृथ्वीवरील विविध देशातील शत्रुत्व मंगळावर पोहोचण्यात वेळ लागणार नाही. यापूर्वी, पृथ्वी भोवतालच्या अंतरिक्षाचा व चंद्राचा उपयोग अण्वस्त्रे तैनात करण्यासाठी करू नये, तसेच फक्त शांततापूर्ण मानवी हिताच्या प्रयोगांसाठी करण्यात यावा यासाठी आंतरराष्ट्रीय दबावातून बड्या राष्ट्रांना करार करावा लागला होता. आता पुन्हा त्याच प्रकारचा करार मंगळाच्या बाबतीत करण्याची वेळ आली आहे. माणसाला पृथ्वीतलावरील कारभारात सामंजस्य दाखवणे अद्याप तेवढेसे जमले नसले, तरी मंगळाबाबतच्या व्यवहारात सर्व देश परिपक्वता दाखवतील अशी आशा करूयात!