Showing posts with label Taliban. Show all posts
Showing posts with label Taliban. Show all posts

Thursday, April 19, 2012

अफगाणिस्तानचा रक्तरंजित वसंत

तालिबान आणि हक्कानी गटाने अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात संयुक्तपणे केलेल्या हल्ल्यांमुळे अमेरिकेसह दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील देशांना चक्रावून टाकले आहे. काबुलसह अफगाणिस्तानात ३ इतर ठिकाणी सशस्त्र हल्ले केल्यानंतर तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले की नाटो-विरोधी गटांकडून लवकरच सुरु करण्यात येणार असलेल्या 'वासंतिक आक्रमणाचा' (Spring Offensive) संदेश देण्यासाठी हे हल्ले चढवण्यात आले आहेत. नजीकच्या भविष्यात काबुलवर ताबा मिळवणे शक्य नसले तरी, करझाई यांच्या सुरक्षा यंत्रणेला राजधानीच्या रक्षणात गुंतवून अफगाणिस्तानच्या इतर प्रांतांमध्ये आपले समांतर सरकार स्थापन करायचे हा तालिबानच्या 'वासंतिक आक्रमणामागचा' उद्देश स्पष्ट आहे .
काबुलवरील नव्या तालिबानी हल्ल्यांच्या आठवडाभर आधी अफगाणिस्तानच्या विशेष सुरक्षा फौजांनी कुनार प्रांतातील पाकिस्तानधार्जिण्या दहशतवादी गटांविरुद्ध मोहीम हाती घेत लक्षणीय यश मिळवले होते. याची दखल घेत तालिबानच्या नेतृत्वाने म्हटले होते की 'आतापर्यंत तालिबानचे प्रमुख लक्ष्य नाटो-सैन्य होते. मात्र गेल्या काही दिवसात अफगाणी राष्ट्रीय सैन्याने तालिबानची मोठी हानी केल्यामुळे आता त्यांच्याविरुद्ध मोर्चा वळवणे भाग आहे." अमेरिकेच्या द्रोण हल्ल्यांमुळे मुल्लाह उमरच्या नेतृत्वाखालील तालिबानची मधली फळी विस्कळीत झाली असली तरी अफगाणिस्तानात सर्वत्र हल्ले करण्याची त्यांची क्षमता अद्याप शाबूत आहे. पाकिस्तानातील मूलतत्ववादी घटकांच्या सहाय्याने तालिबान आणि हक्कानी गटाने अफगाणिस्तानच्या पूर्व आणि दक्षिण भागातील डोंगराळ प्रदेशांवरील आपला वरचष्मा कायम ठेवला आहे. या भागातील नाटोच्या आक्रमक मोहिमांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी तालिबानी आणि हक्कानी पाकिस्तानच्या वायव्य भागात शरण घेत असल्याने १० वर्षांच्या युद्धानंतरही त्यांचा बंदोबस्त करणे अमेरिकेच्या नेतृत्वातील बहुराष्ट्रीय सैन्याला शक्य झालेले नाही. जलालुद्दीन हक्कानी आणि त्याचा मुलगा सिराजूद्दिन हक्कानी यांच्याकडे अंदाजे १०,००० दहशतवाद्यांची फौज असल्याचा गुप्तचरांचा कयास असून, करझई यांच्या सरकारला सगळ्यात मोठा धोका पाकिस्तानात पाळे-मुळे असलेल्या हक्कानी गटाकडून असल्याचे सांगितले जाते.
सध्याच्या अमेरिकी योजनेनुसार, सन २०१४ मध्ये नाटो सैन्य अफगाणिस्तानातून माघार घेणार आहे. त्यानंतर, नाटोचे फक्त १५,००० सशस्त्र सैनिक अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सैन्याच्या मदतीसाठी तैनात असतील. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सैन्याची सध्याची २,४०,००० ची बळसंख्या कमी करत १,९०,००० सैन्यसंख्येवर स्थिरावण्याचा पश्चिमी राष्ट्रांचा प्रस्ताव आहे. अफगाणिस्तानच्या एकूण जीडीपी ची ८०% होईल, एवढी रक्कम नाटोच्या नेतृत्वातील बहुराष्ट्रीय सैन्यावर दर वर्षी खर्च होते आहे. सन २०१४ नंतर, अफगाण सैन्याने पूर्णपणे नाटोचे स्थान घेतल्यानंतर हा खर्च कसा भागणार या विवंचनेत करझई यांचे सरकार आहे. अफगाणिस्तानचे स्वत:चे आर्थिक उत्पन्नाचे स्रोत अत्यंत मर्यादित असल्याने राष्ट्रीय सैन्याच्या प्रशिक्षणासाठी आणि देखरेखीसाठी त्यांची भिस्त परकीय सहाय्यावर आहे. या दृष्टीने अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझई भारतासह इतर देशांशी करार करत आहेत, जेणे करून नाटो सैन्याच्या माघारीनंतर दहशतवाद विरोधी मोहिमांना खीळ बसणार नाही. मात्र, भरघोस परकीय सहाय्य मिळाले तरी अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सैन्य कितपत टिकाव धरू शकेल याबाबत सगळेच साशंक आहेत. तालिबान आणि हक्कानी गटाने मागील आठवड्यात केलेल्या हल्ल्यांचा अफगाणी फौजांनी यशस्वी सामना केला असला, तरी त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची आणि देशभक्तीची भावना कितपत जागृत होऊ शकेल हे सांगणे कठीण आहे. परिस्थिती विपरीत होत गेल्यास राष्ट्रीय सैन्याचे वांशिक आधारावर विभाजन होऊन अफगाणिस्तानातील यादवीत भर पडण्याची भीती अनेक तज्ञ व्यक्त करत आहेत. येत्या दिवसांमध्ये, पाकिस्तानची कुटनीती, तालिबान आणि हक्कानी गटाला हाताशी धरून, अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सैन्यात फुट पाडण्याच्या दिशेने कार्यरत असणार हे नक्की. साहजिकच, यात पाकिस्तानला यश आल्यास ते भारताच्या हिताचे असणार नाही. अफगाणिस्तानच्या काही प्रदेशांवर पाकिस्तानधार्जिण्या मूलतत्ववादी गटांचे वर्चस्व प्रस्थापित झाल्यास, भारतविरोधी लष्कर-ए-तोईबा सारख्या जहाल दहशतवादी संघटनांना सदस्य-भरती आणि प्रशिक्षणासह हिंसक कारवायांच्या योजना आखण्यासाठी मोकळे रान मिळू शकते. मागील काही वर्षांपासून, अफगाणिस्तानातील कुनार प्रांतात लष्कर-ए-तोईबाचे दहशतवादी तालिबानच्या मदतीने नाटो सैन्याविरुद्ध हिंसक कारवाया करत आहेत. नाटोच्या माघारीनंतर आणि अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सैन्य कचखाऊ ठरल्यास, त्यांच्या हिंसक कारवायांचा ओघ काश्मीरसह संपूर्ण भारताकडे वळण्याची शक्यता आहे. भारताप्रमाणे, रशिया, इराण, चीन आणि मध्य आशियातील अफगाण सीमेवरील देश, सन २०१४ नंतर त्यांच्या ताटात काय वाढून ठेवले आहे या चिंतेने ग्रस्त आहेत. अफगाणिस्तानात अमेरिकेच्या सैन्यतळाला सातत्याने विरोध करणारे हे देश, नाटोने अफगाणिस्तानातील यादवी न सावरता निघून जाऊ नये असे भूमिका घेत आहेत.
दुसरीकडे, तालिबानला नेस्तनाबूत करण्यात यश मिळत नसल्याने त्यांच्याशी जुळवून घ्यावे या मतप्रवाहाने गेल्या वर्षभरापासून अमेरिकेचे धोरण प्रभावीत झाले आहे. अल-कायदाशी संबंध नसलेले ते 'चांगले तालिबान' आणि अल-कायदाशी संबंध न तोडणारे ते 'दुष्ट तालिबान' अशी विभागणी अमेरिकेने केली आहे. सुरुवातीला अफगाण राष्ट्राध्यक्ष करझई, तसेच भारतानेसुद्धा, तालिबान्यांमध्ये असा फरक करण्यास विरोध दर्शविला होता. मात्र, काही काळातच त्यांना तालिबानशी बोलणी करण्याच्या अमेरिकी प्रयत्नांना दुजोरा द्यावा लागला. विशेषत: माजी अफगाण राष्ट्राध्यक्ष रब्बानी यांची, शांती-वार्ता करण्यासाठी आलेल्या तालिबानी दूताने आत्मघातकी हल्ल्यात हत्या केल्यानंतर, पाकिस्तान आणि त्यांच्या प्रभावाखालील तालिबानला विश्वासात घेतल्याशिवाय देशात शांतता नांदणे कठीण आहे असे करझई यांचे मत पक्के झाले. परिणामी, मागील काही महिन्यांपासून करझई यांच्या प्रशासनात पाकिस्तानी व्यवस्थेशी सलगी असलेल्या व्यक्तींचे महत्व वाढले आहे.
तालिबानच्या काही गटांशी अमेरिकेला चर्चा करता यावी या दृष्टीने कतार देशाची राजधानी, डोहा इथे तालिबानचे अधिकृत कार्यालय उघडण्याची सोय करण्यात आली. मात्र, या तथाकथित 'चांगल्या तालिबान्यांनी' अफगाणिस्तानच्या सध्याच्या राज्यघटनेस मान्यता देण्याचे नाकारले आहे. सन २०१४ मध्ये होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीतील सहभागाबद्दल त्यांच्याकडून अफगाण सरकारला अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. मागील दोन्ही निवडणुकांवर तालिबानने बहिष्कार टाकला होता. तालिबानने, 'चर्चेसाठी विश्वासाचे वातावरण तयार करण्यासाठी', अमेरिकेच्या ताब्यातील आपल्या ५ सहकार्यांच्या सुटकेची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण करण्यासंबंधात मतभेद होऊन, मार्च महिन्यात डोहा इथे झालेली अमेरिका आणि तालिबान दरम्यानची पहिली चर्चा फिस्कटली आणि शांती-प्रक्रियेचे भवितव्य अधांतरी लटकले. दुसरीकडे, अफगाण सरकारने तालिबानशी चर्चा करण्यासाठी सौदी अरेबियाची निवड केली आहे. त्यांच्यामधील चर्चेची पहिली फेरी सुद्धा निष्फळ ठरली आहे. या पार्श्वभूमीवर, तालिबानशी चर्चा करण्याबाबत अमेरिकेच्या राजकीय क्षेत्रात असलेल्या मतभेदांना खतपाणी घालण्यासाठी हक्कानी सारखे गट दहशतवादी हल्ले चढवतील अशी शक्यता होती आणि ती खरी ठरली. सन २०१४ नंतर अफगाणिस्तानात मोकळे रान मिळण्याची आशा असल्याने अमेरिका आणि करझई सरकारशी तालिबान समझोता करणे टाळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी गेल्या वर्षी सैन्य-परतीची जाहीर घोषणा केल्यानंतर टीकाकारांनी हाच मुद्दा मांडला होता की नाटो फौजा अफगाणिस्तानातून काढता पाय घेणार हे निश्चित ठाऊक असतांना तालिबान सहकार्याची भूमिका घेईन हा भाबडा आशावाद आहे. एकंदरीत आता अमेरिकेची, तसेच राष्ट्राध्यक्ष करझई यांची अवस्था बिकट झाली आहे. तालिबानशी चर्चेस सुरुवात करून त्यांनी मागील १० वर्षात समर्थन प्राप्त केलेल्या तालिबान-विरोधी गटांची नाराजी ओढवली आहे.
अफगाणिस्तानच्या राजकारणावर ढोबळपणे, पारंपारिक वांशिक-आदिवासी गटांचे नेते, १९७० आणि १९८० च्या दशकांत साम्यवादी राजवटीविरुद्ध लढणारे मुजाहिद्दीन गट आणि १९८० च्या दशकात अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीने उभे केलेले तालिबानी गट, अशी ३ गटांची पकड आहे. मागील १० वर्षात करझई यांनी, पारंपारिक वांशिक गटाचे नेते आणि तालिबानविरोधी मुजाहिद्दीन गटांशी समन्वय साधत, आपले स्थान टिकवून ठेवले आहे. मात्र, तालिबानने पारंपारिक वांशिक-आदिवासी नेत्यांची हत्या करण्याचे धोरण राबविले असतांना, त्यांचाशी समझोता करण्याचे प्रयत्न करझई राजवटीच्या विरोधात जाऊ शकतात. मागील एक वर्षात कंदहार प्रांतात तालिबानने १५० हून अधिक वांशिक-आदिवासी नेत्यांची हत्या केली आहे. त्यामुळे, करझई यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पश्तून जमातीमध्ये त्यांच्याविरुद्ध रोष आहे. तालिबानशी सलगी केल्यास करझई यांना समर्थन देणारे हझारा वांशिक गटाचे नेते मुहाकिक आणि उझबेक वांशिक गटावर प्राबल्य असलेले अब्दुल राशीद दोस्तम नाराज होऊ शकतात. त्यामुळे, करझई सरकारची अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी होत चालली आहे.
अमेरिकेमध्ये होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकांमध्ये ओबामा पराभूत होऊन रिपब्लिकन पक्षाची सरशी झाल्यास, नाटो सैन्याचे अफगाणिस्तानातील वास्तव्य आणखी काही काळ वाढू शकते. असे झाल्यास, अफगाण सरकार, तसेच भारत आणि इतर देशांना तालिबानविषयीचे धोरण सुनिश्चित करण्यासाठी आणखी थोडा अवधी मिळू शकतो. मात्र, ओबामांनी घोषणा केल्याप्रमाणे नाटोने सन २०१४ मध्ये माघार घेतल्यास अफगाणिस्तानचा तिढा अधिक गुंतागुंतीचा होणार आहे. त्यावेळची संभाव्य परिस्थिती ध्यानात घेत भारताने आतापासून आपल्या राजनैतिक प्रयत्नांना गती देणे गरजेचे आहे. नाटोच्या माघारीनंतर पाकिस्तानचे लष्कर आणि आई.एस.आई. ला अफगाणिस्तानात मोकळीक मिळू नये ही भारताची प्राथमिकता असणार आहे. या संबंधात पाकिस्तानवर फक्त द्वि-पक्षीय चर्चेतून दबाव आणणे भारतासाठी शक्य नाही. मात्र, अफगाणिस्तानात तालिबानची सरशी होणे ज्या शेजारी देशांच्या हिताचे नाही, त्यांच्या मदतीने पाकिस्तानातील कट्टरपंथी तत्वांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न भारत करू शकतो. या दृष्टीने, "शांघाई कोऑपरेशन ओर्गनाइज़ेशन" या चीन, रशिया आणि मध्य आशियातील ४ देशांचा समावेश असलेली संघटना तसेच भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराण असे एकूण १० देशांचे व्यासपीठ तयार करण्यासाठी युपीए सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे. अन्यथा, अफगाणिस्तानातील 'रक्तरंजित वसंता'ची झळ भारतापर्यंत पोचायला वेळ लागणार नाही.

Saturday, January 28, 2012

अमेरिका-पाकिस्तान संबंधांना लागलेले ग्रहण

(Published in Marathi Daily Deshonnati on 21/01/2012)

नुकतेच सरलेले सन २०११ हे वर्ष अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांसाठी आतापर्यंतचे सर्वात वाईट वर्ष ठरले आहे. दोन्ही देशांना एकमेकांची सगळ्यात जास्त गरज असतांना एकामागोमाग एक अनेक घटनांनी दोन्ही देशांमधील मैत्रीची जागा आता अविश्वास आणि रागाने घेतली आहे. १९ कोटी लोकसंख्येच्या पाकिस्तानला आपले आर्थिक स्थैर्य टिकवण्यासाठी आणि भारताबरोबर कायम सुरु असलेल्या शस्त्रस्पर्धेत सज्जता राखण्यासाठी अमेरिकी सहाय्याची नितांत आवश्यकता आहे. अमेरिकी अर्थ आणि शस्त्र सहाय्याशिवाय गेल्या ६० वर्षात पाकिस्तानने उभा केलेला आधुनिक लष्कराचा डोलारा सांभाळता येणे कठीण आहे; आणि अंतर्गत संसाधने लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यासाठी वळवल्यास आधीच मोडकळीस आलेली अर्थव्यवस्था कोलमडण्याची भीती आहे. दुसरीकडे अमेरिकेच्या पाकिस्तानच्या भवितव्यासंबंधी अनेक रास्त चिंता आहेत. त्या प्रत्यक्षात उतरल्यास अमेरिकेसह संपूर्ण जगालाच काही न काही प्रमाणात त्याचे परिणाम भोगावे लागतील. या चिंता खालीलप्रमाणे आहेत:

1. पाकिस्तानातील जमीनदारी अर्थव्यवस्थेमुळे फोफाळलेल्या निरक्षरता आणि बेरोजगारीचा फायदा उठवत मुलतत्ववादी इस्लामिक गट तरुणांना आपल्याकडे आकर्षित करत आहेत. ही प्रक्रिया अशीच सुरु राहिली तर कट्टर मुलतत्ववाद्यांची फळी पाकिस्तानातील सुधारणावादी आणि स्वतंत्रतावादी विचारांना चिरडून पाकिस्तानात लोकशाही रुजवण्याचे प्रयत्न तर हाणून पाडेलच, शिवाय त्याचे विपरीत परिणाम काश्मीरमध्ये अतिरेकी गट नव्याने सक्रीय करण्यात होतील.

2. पाकिस्तानातील अण्वस्त्रे दहशतवादी गटांच्या हाती लागू शकणे ही अमेरिकेची दुसरी महत्वाची चिंता आहे. पाकिस्तानकडे नेमकी किती आणि कश्या स्वरूपातील अण्वस्त्रे आहेत याची खात्रीशीर माहिती कुणाकडेच नसल्याने अमेरिकेची डोकेदुखी वाढली आहे.

3. अमेरिकेची तिसरी चिंता आहे ती पाकिस्तानी लष्कर आपला वरचष्मा कायम ठेवण्यासाठी भारताच्या कुरापती काढून युद्धजन्य परिस्थिती निर्माण करू शकते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात लष्करी संघर्षाची स्थिती निर्माण झाल्यास अमेरिकेला अफगाण सीमेवर पाकिस्तानकडून मिळणारी मदत कमी होऊ शकते; आणि परिणामी अमेरिकेची अफगाणिस्तानातील परिस्थिती अधिकच बिकट होईल.

4. अमेरिकेची पाकिस्तान संदर्भातील चौथी आणि सगळ्यात मोठी चिंता अफगाणिस्तान हीच आहे. पाकिस्तानची पश्चिम सीमा अफगाणिस्तानला लागून आहे. त्या भागात पाकिस्तानी सरकारचे वर्चस्व कमी आणि अफगाणी तालिबान, पाकिस्तानी तालिबान, हक्कानी गट आणि अल कायदाचे अद्याप शाबूत असलेले गट अशा दहशतवादी आणि मुलतत्ववादी गटांचा सूळसुळाट जास्त आहे. या शिवाय अफगाणिस्तानातील नाटो सैन्याला रसद पुरवण्याचे महत्वाचे मार्ग या भागातूनच जातात.

या सगळ्या कारणांमुळे खरे तर पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध राखत अमेरिकेला अफगाणिस्तानातील आपले उद्दिष्ट साध्य करायचे होते. मात्र मागील वर्षभरात या दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थितीच जास्त काळ होती आणि पुढील काळातही हा तणाव कमी होण्याची चिन्हे नाहीत. मागील वर्षभरात अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण होण्याची कारणे आणि घटना खालीलप्रमाणे आहेत:

१. २७ जानेवारी २०११ रोजी अमेरिकी गुप्तचर संस्था, सी.आई.ए. चा ठेकेदार रेमंड डेविस लाहोरच्या रस्त्यावरून जात असतांना २ मोटार-सायकलस्वारांनी त्याचा पाठलाग केला. वाहतुकीत अडकून पडल्यावर डेविसने त्या दोघांना गोळ्या घालून ठार केले. डेविसने मदतीस बोलावलेल्या वाहनाने गडबडीत एका आगंतुकाला चिरडून ठार केले. पाकिस्तानी प्रशासनाने डेविसवर दुहेरी खुनाचा आरोप ठेवत खटला भरला तर अमेरिकेने डेविसला राजनयिक अधिकाऱ्याचा दर्जा असल्याचा दावा करत १९६३च्या विएन्ना करारानुसार त्याच्यावर खटला भरणे पूर्णपणे चुकीचे आहे अशी ठाम भूमिका घेतली. पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी आडमुठी भूमिका घेत डेविसच्या सुटकेला विरोध केल्याने २ आठवड्यात त्यांचे मंत्रीपद गेले आणि न्यायालयाने इस्लामिक कायद्यानुसार डेविसने मृतांच्या परिवाराला आर्थिक मोबदला दिल्यानंतर त्याची सुटका केली. मात्र या काळात दोन्ही देशातील संबंध कमालीचे ताणले गेले आणि दोन्ही देशांसाठी हा त्यांच्या अधिकारांचा आणि सार्वभौमत्वाचा मुद्दा झाला.

२. २ मे २०११ रोजी अमेरिकी सैन्याच्या विशेष कृती दलाने पाकिस्तानातील अब्बोताबाद या मोठी लष्करी छावणी असलेल्या शहरात हवाई छापा मारत अल-कायद्याचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला ठार केले. या कारवाईसाठी अमेरिकेने पाकिस्तानला विश्वासात घेतले नाही आणि पाकिस्तानच्या यंत्रणेलासुद्धा कारवाई पूर्ण होईपर्यंत याचा काही सुगावा लागला नाही. या घटनेने पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे धिंडवडे उडाल्याने पाकिस्तानचे सरकार आणि लष्कर या दोघांचीही पाकिस्तानी जनतेपुढे नामुष्की झाली. तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाने 'लादेन पाकिस्तानात एवढ्या सुरक्षित स्थळी रहातच कसा होता' असा सवाल केला आणिपाकिस्तानच्या आई.एस.आई. च्या काही घटकांना यासंबंधी माहिती असल्याशिवाय हे शक्य नाही अशी शंका व्यक्त केली. या घटनेने पाकिस्तान आणि अमेरिकेच्या संबंधात पुन्हा तणाव निर्माण केला.

३. सप्टेंबर २०११ मध्ये अमेरिकेच्या काबूलमधील दूतावासावर हक्कानी गटाने हल्ला चढवला, तसेच अफगाणिस्तानातील वारदक प्रांतात अमेरिकी सैन्यावर बॉम्ब हल्ला करत ७७ सैनिकांना जायबंदी केले. हक्कानी गटाचे आई.एस.आईशी चांगले संधान असल्याने या हल्ल्यांचे बोलते धनी पाकिस्तानी गुप्तचर संस्थेतील काही अधिकारीच आहेत असा सरळ आरोप अमेरिकेने केला. यानंतर पाकिस्तानी सैन्यप्रमुख जनरल कयानी यांनी 'अमेरिका पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा अब्बोताबाद सारखी कारवाई करू शकते' अशी भीती व्यक्त करत पाकिस्तानी लष्कराला रेड अलर्ट वर ठेवले.

४. या नंतर काही दिवसांनीच अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष रब्बानी यांची, शांती-प्रक्रियेसंबंधी चर्चा करायला आलेल्या, तालिबानच्या दूतांनी आत्मघातकी हल्ल्यात हत्या केली. यामुळे अमेरिका आणि पाकिस्तान तसेच अफगाणिस्तानचे सरकार आणि पाकिस्तान यांच्यातील अविश्वास आणखीनच वाढीस लागला. पाकिस्तानच्या सरकारवर दबाव आणण्यासाठी अमेरिकी कॉंग्रेसने पाकिस्तानला देऊ केलेल्या $१.१ बिलियन रकमेच्या मदतीपैकी ६०% मदत स्थगित केली.

५. २५-२६ नोव्हेंबर २०११ च्या रात्री नाटो सैन्याने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे २४ जवान ठार झाले. या घटनेने पाकिस्तानात अमेरिका विरोधाचे तुफान उठले. पाकिस्तानने अफगाणिस्तानातील कारवायांबाबत नाटोशी असलेला समन्वय तत्काळ स्थगित केला, नाटो सैन्याला रसद पुरवणारे मार्ग बंद केले आणि द्रोण हल्यांसाठी अमेरिका वापरत असलेला बलुचिस्तानातील शम्सी हवाई तळ रिकामा करण्याचा आदेश दिला. या घटनेची नाटोने माफी मागावी अशी मागणी पाकिस्तानने केली. नाटो आणि अमेरिकेने ही मागणी धुडकावून लावली मात्र या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले. तथापि पाकिस्तानने चौकशीमध्ये सहयोग करण्यास नाकारले आणि नंतर आलेला चौकशी अहवालही फेटाळून लावला. या अहवालानुसार, नाटो सैन्यावर आधी हल्ला झाल्याने त्यांनी स्व:रक्षणात हल्ला चढवला असे म्हटले होते. मात्र या कारवाई दरम्यान नाटो आणि पाकिस्तान दरम्यान योग्य समन्वय न झाल्याने हल्ला वेळेतच थांबवता आला नाही असे स्पष्टीकरणही दिले. पाकिस्तानने मात्र 'आपल्या सैन्याकडून कुठल्याही प्रकारचा हल्ला झाला नसून नाटोच्या अधिकाऱ्यांना विनंती केल्यानंतरही त्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या छावणीवरील हल्ला थांबवला नाही' असा प्रत्यारोप केला. या घटनेच्या निषेधार्थ पाकिस्तानने अफगाणिस्तान संबंधी भरवण्यात आलेल्या बॉन परिषदेवरही बहिष्कार घातला.

या एकापाठोपाठ घडलेल्या घटनांनी दोन्ही देशांचा एकमेकांवरील विश्वास उडाला आहे. 'पाकिस्तान म्हणजे दुटप्पी, कावेबा, संशयी आणि स्वत:च्या समस्यांचाच पाढा वाचणारा देश' असे अमेरिकेचे मत या काळात दृढ होत गेले; तर 'अमेरिका म्हणजे अविश्वासू, हलक्या कानाचा, गर्विष्ठ आणि दूरदर्शीपणा नसलेला देश' असे पाकिस्तानचे मत पक्के होत गेले. दहशतवादी गटांना पाकिस्तानी सरकार नेस्तनाबूत करू शकत नाही की नेस्तनाबूत करू इच्छित नाही हे ठरवणे अमेरिकेला कठीण जात आहे. अमेरिकेची सर्व प्रकारची मदत देण्याची तयारी असतांनाही पाकिस्तानी सरकार दहशतवादी गटांची योग्य ती आणि सर्व काही माहिती पुरवत नाही असा अमेरिकेचा आरोप आहे. यामुळे दहशतवाद्यांचे जाळे उद्ध्वस्त करणे कठीण होत आहे असे अमेरिकेला वाटते.

पाकिस्तानच्या तक्रारी आणि मागण्या वेगळ्याच आहेत. त्या खालीलप्रमाणे थोडक्यात मांडता येतील:

1. पाकिस्तानी सरकारचे म्हणणे आहे की पाकिस्तानात हरकतीत असलेल्या दहशतवादी संघटना या पाकिस्तानी सरकारच्याही विरूद्धच काम करतात. त्यांच्याविरुद्ध लढणे हे पाकिस्तानी सरकारला कर्मप्राप्तच आहे, त्यामुळे पाकिस्तानी सरकारच्या हेतूवर शंका घेणे म्हणजे पाकिस्तानच्या भावनांना दुखावणे होय.

2. पाकिस्तानी लष्कराचेही असेच काही मत आहे. सुमारे दिड लाख पाकिस्तानी सैनिक अफगाण सीमेवर तैनात असून, फेडरली अडमिनीस्टर्ड ट्रायबल रिजन या प्रांतात तळ ठोकून बसलेल्या अनेकानेक तालिबानी आणि इतर इस्लामिक दहशतवादी गटांशी त्यांचे अघोषित युद्धच सुरु आहे असे पाकिस्तानी लष्कराचे म्हणणे आहे. पाकिस्तानी सैन्याने दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात आतापर्यत मोठे योगदान आणि बलिदान दिले आहे मात्र त्याची जागतिक समूहाला कदरच नाही अशी त्यांची खंत आहे. 'पाकिस्तानी हे अर्धे भावनिक आणि अर्धे बावळट असतात' असे उद्गार एका वरिष्ठ पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यानेच काढले होते. 'हा पाकिस्तानी स्वभाव लक्षात न घेता अमेरिका अरेरावीची भाषा वापरत असल्याने दोन देशांमध्ये तणाव सतत वाढत आहे' असे त्या अधिकाऱ्याचे गाऱ्हाणे होते.

3. 'अमेरिकेकडे सगळ्यात आधुनिक यंत्र-तंत्र असतांनाही त्यांना त्यांची मेक्शिकोला लागलेली सीमा पूर्णपणे बंद करता येत नाही आणि ते सुद्धा तिथे युद्धजन्य परिस्थिती नसतांना. मात्र पाकिस्तानकडून अत्यंत विपरीत भौगोलिक परिस्थिती असलेली अफगाण सीमा पूर्णपणे बंद ठेवण्याची अपेक्षा केली जाते आणि ते सुद्धा नाटो अफगाणिस्तानच्या बाजूने पाकिस्तानची सीमा बंद करू शकत नसतांना' अशी टिका पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल असिफ यासीन मलिक यांनी केली आहे.

4. अमेरिकेने अफगाणिस्तानातील आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी पाकिस्तानचा वापर केला आणि आता अफगाणिस्तानातून जाताना तो पाकिस्तानलाही वाऱ्यावर सोडून जात आहे अशी पाकिस्तानची तक्रार आहे. अमेरिकेला या युद्धात जास्तीत जास्त मदत पाकिस्तानने केली, मात्र तुलनेने जास्त फायदा भारताला मिळत आहे अशी पाकिस्तानची खंत आहे. अमेरिकेने १ लाख ७० हजार ताकदीचे अफगाण राष्ट्रीय सुरक्षा दळ आणि १ लाख ३५ हजार ताकदीचे अफगाण पोलीस दळ तयार करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत. या सुरक्षा दलाच्या तुकड्यांना प्रशिक्षण देण्यासाठी अफगाणिस्तानने भारताची मदत घेतली आहे. या प्रयत्नातून जर सशक्त अफगाण सैन्य उभे राहिलेच तर ते पाकिस्तानला नको आहे कारण त्यावर अमेरिका आणि भारताचा प्रभाव असेल आणि ते पाकिस्तानविरुद्धही वापरले जाऊ शकेल अशी त्यांना शंका आहे. अमेरिकेच्या माघारीनंतर जर अफगाणिस्तानात यादवी माजली तर ही सशस्त्र दळे सुद्धा अनेक छोट्या गटांमध्ये विभाजित होतील आणि पाकिस्तानचा त्यांच्यावर प्रभाव नसल्याने त्या डोकेदुखीच ठरतील अशा शंकेनेही पाकिस्तानला ग्रासले आहे.

5. अमेरिकेने तालिबानच्या काही गटांशी समझोता करून त्यांना अफगाणिस्तानच्या राज्यसत्तेत समाविष्ट करून घ्यावे ही पाकिस्तानची मुख्य मागणी आहे. पाकिस्तानच्या प्रभावातील तालिबान गट सत्तेत शामिल झाल्यास भारताच्या वाढत्या महत्वावर अंकुश ठेवणे सोपे जाईल आणि त्यांच्या द्वारे पाकिस्तानातील तालिबानी आणि इतर इस्लामिक मुलतत्ववादी गटांवर सुद्धा नियंत्रण ठेवता येईल असे पाकिस्तानातील धुरिणांना वाटत आहे.

पाकिस्तानच्या या मागणीला अमेरिकेने तत्वत: मान्यही केले आहे परंतु तालिबानशी वाटाघाटी करण्यासाठी आपल्या ३ अटी ठेवल्या आहेत. एक - हिंसेच्या मार्गाचा त्याग; दोन - अल कायदाशी कोणत्याही प्रकारचा संपर्क न ठेवणे; तीन - महिला स्वातंत्र्याच्या तरतुदींसह अफगाणिस्तानच्या राज्यघटनेचा स्वीकार. पाकिस्तानच्याच मध्यस्थीने काही तालिबानी तसेच हक्कानी गटाशी चर्चेत सहभागी होण्यासाठी संधानही बांधण्यात आले होते; मात्र माजी अफगाण राष्ट्राध्यक्ष रब्बानी यांची तालिबानने हत्या केल्यानंतर या दिशेने होणाऱ्या प्रयत्नांना खीळ बसली. आता नव्या वर्षात अमेरिकेने नव्या जोमाने तालिबानशी वाटाघाटी करण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. तालिबानचे गट मात्र याबाबतीत वेळकाढूपणा दाखवत आहेत. नाटो ची २०१४ अखेर पर्यंत अफगाणिस्तानातून माघार घोषित झाल्यामुळे तालिबानी गट त्या क्षणाची वाट बघत आहेत. त्यानंतर अफगाणिस्तानच्या मोठ्या प्रदेशावर प्रभुत्व निर्माण करता येईल अथवा संपूर्ण अफगाणिस्तानवरच नियंत्रण मिळवून काबूलमध्ये पुन्हा तालिबानी सरकार स्थापन करता येईल अशी आशा तालिबान्यांना आहे. स्वत:च्या प्रभावाशिवाय असे काही घडणे पाकिस्तानला मान्य नाही. या सगळ्या घटना आणि घडामोडींमुळे अमेरिका-पाकिस्तान संबंध प्रचंड ताणले गेले असले तरी हे तणाव दूर करणे हेच दोघांच्या सोयीचे आहे ह्याची दोन्ही देशांना जाणीव आहे. सद्द्य परिस्थितीत एकमेकांची साथ देण्याशिवाय दोन्ही देशांकडे पर्याय नाही. परिणामी अमेरिकेने $१.१ बिलियन रकमेच्या मदतीवर घातलेले निर्बंध सैल केले आहेत आणि अटींची पूर्तता करणे हा केवळ तांत्रिक मुद्दा असल्याचे म्हटले आहे. पाकिस्ताननेही नाटोशी समन्वय परत सुरु केला आहे. असे असले तरी अमेरिका-पाकिस्तान संबंधांना लागलेले अविश्वास आणि शंकेचे ग्रहण नजीकच्या काळात दूर होण्याची शक्यता कमीच आहे. याच्या परिणामी पाकिस्तान चीनकडे जास्त आकर्षित झाल्यास आणि भारताने अमेरिकेची कास अधिक घट्ट धरल्यास अफगाणिस्तानातील आंतरराष्ट्रीय राजकारण अधिकच गडद होईल यात शंका नाही.